अमेरिकन नाती गोती

माझ्या अमेरिकन शेजारणी दुपारी चहाला आल्या होत्या. जगभरच्या सर्वच बायकांचा जिव्हाळय़ाचा एक विषय असतो- ‘सासूू’ (म्हणजे विषय जिव्हाळय़ाचा, ‘सासू’ नव्हे!) माझी शेजारीण ‘सू’ (सू- म्हणजे सूझान) म्हणाली, ‘I told my husband the other day! I said, ‘You know , I would be very upset if you bury me next to your mom!’

मी तर ऐकून अवाक् च झाले! एकंदरीतच अमेरिकन नातीगोती मला कोडय़ात टाकतात. इथे विद्यार्थिदशेत असताना एका अमेरिकन कुटुंबात मी राहत होते. तिथे त्यांच्या नातेसंबंधांचं दर्शन मला जरा जवळून झालं! विद्यापीठाजवळच बेवर्ली आणि फ्रँक स्टॅन यांचं चार-पाच खोल्यांचं घर. घरात ते दोघेच. ‘खोली भाडय़ानं घ्या आणि स्वयंपाकघर आमचं वापरा.’ अशी योजना होती. पहिल्याच दिवशी ‘बेव’नं बजावलं, ‘फ्रीजचा हा कप्पा तुझा. माझ्या कप्प्यातलं गाजर समजा घेतलंस, तर त्या बदली दुसरं गाजर दुसऱ्यादिवसापर्यंत आणून ठेवलं पाहिजे!’ आता एका घरात माणसं राहणार म्हणजे एवढा काटेकोर औपचारिकपणा कसा सांभाळणार, हा मला पडलेला प्रश्न! मी सहजपणे म्हटलं, ‘बरं! पण माझ्या कप्प्यातला एखादा पदार्थ तुला चव घेऊन पाहावासा वाटला तर माझी काही हरकत नाही हं! उष्टय़ा हाताचे बोट त्यात बुडवू नकोस म्हणजे झालं!’
एका घरात राहायचं तर टेबलावर ‘आपापलं’ खायचं, हे मला कसंतरीच वाटे. म्हणून मी आग्रहानं माझी मटकी उसळ (‘टेस्टी नटी स्टफ’) इडली (तिच्या मते ‘कार्डबोर्ड स्टफ’) (फ्रँक आणि बेवला खाऊ घाली. मग हळूहळू दोघं जरा अघळपघळ झाली! ‘तुझ्या घरात कोण? माझ्या घरात कोण?’ अशा गप्पा वगैरे सुरू झाल्या. एक दिवस फ्रँकचा भाऊ आला. दुपारी जेवला. परत निघाला! गप्पाबिप्पा औपचारिकच! ”हा राहणार नाही?” माझा भारतीय प्रश्न! ”हो. राहणार ना, दोन दिवस. पलीकडल्या रस्त्यावर हॉटेल आहे, तिथे उतरला आहे!” सख्खा भाऊ आलेला तो हॉटेलमध्ये उतरतो, हे मला अजबच वाटलं!
बेवची आई गंभीर आजारी झाल्याचा फोन आला तेव्हा मी तासाला निघाले होते! पण बेवनं हे सांगितलं आणि मी तिच्या काळजीनं तास बुडवला आणि तिच्याजवळ म्हणून थांबले! ”अगं, आधी विमानाचं तिकीट काढ. बॅग भरायला मदत करते मी तोपर्यंत!” असं म्हणत माझी लगबग चालू होती! ”विमान कशाला? महाग पडेल. मी ट्रेननं जाते. मला स्टेशनवर तेवढं सोड!” इति बेव! मी अवाक्! ‘विमान घेतलं तर आईची भेट तरी होईल! ट्रेननं ११ तास लागतात! आणि आई आजारी असताना पैशाचा कसला हिशेब!’ एवढं बेवर्लीला ऐकवण्याचा ‘प्रेमळ’ हक्क मी एव्हाना मिळवला होता!


शेवट ती ट्रेन घेऊन गेली, पण आईची तिची भेट काही झाली नाही. याची हळहळ मलाच!

”माझी वहिनी इथल्या विद्यापीठात संशोधन करायला येणार आहे एक वर्षांसाठी!” एक दिवस मी आनंदानं बेवर्लीला ऐकवलं! ”वहिनी?- तुला कोण भावंडं वगैरे? विचारलं तेव्हा म्हणालीस, ”फक्त बहिणी आहेत. मग ही वहिनी कोण?” बेवर्लीचा प्रश्न! ”म्हणजे काय? माझ्या चुलत भावाची बायको!” माझं उत्तर! ”मग ती तुझी वहिनी नाही!” असं बेवर्लीचं ठाम उत्तर!
अमेरिकन नात्यात चुलत भावंडं असतात, पण त्यांच्या बायका किंवा नवरे आपले कोणीही नसतात!
भाचे, भाच्या असतात, पण नवऱ्याचे वेगळे आणि बायकोचे वेगळे! ..असे धडे मला हळूहळू मिळत होते!

मग ‘थँक्स गिव्हिंग’चा सण आला. या सणाला अमेरिकी लोकांचा कौटुंबिक मेळावा होतो आणि मुलं, नातवंडं मुद्दाम घरी येतात. अर्थात अमेरिकी कुटुंब म्हणजे नवरा, बायको आणि मुलं, नातवंडं! अन्य नातेवाईक त्यात येत नाहीत. मित्रही नाहीत! स्वाभाविकपणेच मी बेवर्लीला म्हणाले, ”अगं, मी चार दिवस माझ्या (‘माझ्या’वर जोर) वहिनीला भेटायला जाते मग!”
बेवर्ली म्हणाली, ”वा! वा! असं कसं? तू आता ‘घरची’ आहेस. तेव्हा तू ‘थँक्स गिव्हिंग’च्या सणाला घरीच थांबायचं!” मी चकितच झाले! पण छान वाटलं मला!
मग फ्रँक ‘रुटॅन’- त्याची बायको म्हणून ती ‘रुटीन’, त्यांची मुलं (त्याची की तिची, या प्रश्नात मी पडले नाही.) म्हणून आमच्या संगणकीय परिभाषेत लोकल सब रुटीन्स आणि मी चौथं ‘ग्लोबल सबरुटिन’ अशी आमची सणासुदीला पंगत छान रंगली!
बेव आणि फ्रँक म्हणजे रुटॅन आणि रुटीन नंतर एकदा गावाला निघाले. मी म्हटलं, ”काळजी करू नका. मी घर सांभाळीन.” बेव म्हणाली, ”चालेल. मी तुला रोजचे दोन डॉलर्स देईन बिदागी म्हणून. मांजराला खायला घालण्याचा एक आणि संध्याकाळी बाहेरचा दिवा लावण्याचा एक” ”हं?” मी पुन्हा एकदा बुचकळय़ात! मला ही ‘घरची’ म्हणते (माझी मटकीची उसळ हक्कानं फस्त करते!) आणि मांजराला खायला घालण्याचे पैसे कसले देते? आता मी घरात आहे म्हटल्यावर मांजराचं पण करणार नाही का?..

माझं शिक्षण संपलं. मी भाडय़ाची ती खोली सोडली. पण नंतरही ‘रुटॅन’ कुटुंबाशी माझा संवाद सुरूच राहिला. नाताळमध्ये एकमेकांना भेटवस्तू देणे, ‘थँक्स गिव्हिंग’च्या सणाला मी (नंतर नवऱ्यासकट!) ‘रुटॅन’कडे जेवायला जाणे, भेटकार्ड,, वाढदिवसाला फोन.. सगळं!
गेल्या वर्षी फ्रँक बराच आजारी होता, म्हणून आम्ही दोघं मुद्दाम त्यांना भेटायला गेलो! घर अजून तस्संच होतं! दोघं मात्र खूप थकलेले! ”तुझी खोली अजून तुझीच आहे! तश्शीच ठेवली आहे! आज रात्री तुम्ही तुझ्या खोलीतच राहा!” बेवर्लीनं आग्रहानं सांगितलं. आम्हीही हक्कानं राहिलो!
गप्पांच्या ओघात उरलेल्या ‘सब रुटिन्स’ची चौकशी केली. ‘मुलं आपापल्या कुटुंबात गुंतली आहेत. एलिनं एकदा सुट्टी घेतली आठ दिवस. कुरकुरत का होईना, आली मदतीला! बिल आणि एडवर्ड फिरकलेली नाहीत! मधून मधून फोन करून बाबाच्या तब्येतीची चौकशी करतात! भेटायला धावत आलीस ती तूच आणि तुझा नवरा! बेवर्लीच्या डोळय़ांत पाणी होतं!
मला पुन्हा एकदा प्रश्न पडला, ”माझं नि रुटॅन्सचं नातं काय?” 

विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्रकाशन : लोकसत्ता , लोकरंग 23 मार्च 2015)