केक,आय लव्ह यू !

सांडिएगो शहरातील अगदी भर मध्यावरील ‘पल्स’ या मेरियाट हॉटेलच्या बाराव्या मजल्यावरील खिडकीतून समोर कोरोनाडोचा दिमाखदार पूल दिसतो आहे. समुद्राच्या निळसर चकाकीचा लहान तुकडा देखील ! माझ्यासमोर कॉफीचा वाफाळता कप आणि नुकत्याच आणलेल्या सुंदर केकचा कलापूर्ण कप !……

    तासाभरापूर्वीच आम्ही या केकच्या कलावंत कृती बद्दल, केककर्तीशी गप्पा मारत होतो ! जिल ‘ओ’ कॉर्नर असे तिचे नांव !

    त्याच असं झालं की, ‘कोरोनाडो’ भागा मधील दहाव्या रस्त्याच्या एका कोपऱ्यावर एक पाटी दिसली, “केकची चव चाखा आणि पुस्तकावर केककृतीची सही घ्या – सर्वाना निमंत्रण आणि मुक्त प्रवेश …

     ‘कोरोनाडो’ हे सॅडियागो शहराच्या कुशीतले एक चिमुकले बेट ! निसर्गरम्य, निळ्या सागराने किनारलेले टुमदार घरांची वस्ती आणि पिटुकल्या बागा असलेले ! म्हणजे जणू सर्व वाद्यवृंद तयार होऊन आता प्रेक्षकांसाठी स्वरमेळाचा कार्यक्रम करणार असं वातावरण !

‘टुरिस्टां’ साठी जबरदस्त आकर्षक ‘पर्यटना’ चे मुक्त प्रवेशद्वार !

    सॅडियोगातून हा पूल बांधल्यामुळे प्रवाशांना दहा मिनिटात कोरोनाडोवर जाता येते. ‘कोरोनाडो हॉटेल’ सारखे ऐतिहासिक स्थळ, कोरोनाडोचा इतिहास सांगणारे विनामूल्य प्रदर्शन, अत्याधुनिक सार्वजनिक ग्रंथालय, हर प्रकारच्या वस्तूंची सुबक ठेंगणी दुकाने, सायकलस्वारांसाठी मार्ग, किनारपट्टीवर सर्फिंग, पोहोणे, बोटींगची करमणूक – आणि नानापरीच्या खाद्य पेयांनी सुसज्ज रस्ते – यात प्रवाशांना आणखी खूष करण्यास उन्हाळ्यात बसची विनामूल्य सरकारी सेवा ! आज सकाळपासूनच आम्ही तिकडे बागडत होतो. समुद्रदर्शक खिडकीतून बाहेर पहात दुपारचे सुग्रास जेवण झाल्यावर आम्ही विनामूल्य बसची वाट पाहण्यापेक्षा चालत चालत हे बेट पहावे असे ठरवून डुलत डुलत निघालो ! रस्ता निवांत होता. म्हणजे कॉफीचं दुकानं शोधायचं तर अर्धा मैल चालावं लागेल असं मनाशी म्हणत असतांना एका कोपऱ्यावर ही “केक” चाखण्याची अभिनव पाटी दिसली ! होती एका कलात्मक केशकर्तनालयाच्या दारात ! जरा बिचकत आत गेलो. एका कोपऱ्यात कलात्मक केकचे प्रकार मांडून केकच्या चित्रांचे एप्रन घातलेल्या प्रसन्न मुली केकचे नमुने दाखवून विचारत होत्या “कोणता हवा ?”

    दुसऱ्या कोपऱ्यात टेबलावर “ केक आय लव्ह यू” या नावाच्या पुस्तकाच्या प्रती आणि प्रेमळ अगत्यशील ‘जिल’ पुस्तक दाखवत होती. कोणी विकत घेतले तर स्वाक्षरी करून देत होती ! केकचा समाचार घेऊन मी तिला ‘केक’ सुंदर झाल्याची दिलखुलास पावती दिली! “मी सर्वेक्षण म्हणून विचारते, “या तीन प्रकारातला कोणता जास्त आवडला आणि का? “ तिने माझ्याशी संभाषणाला सुरवात केली. मी वाईनरीच्या गावातली – त्यामुळे ‘वाईन टेस्टिंग’ हा प्रकार मला माहिती. सुवास, स्वाद, जिभेच्या विविध भागांना जाणवलेल्या चवींचे पदर, नंतर रेंगाळणारा सुवास आणि चव…. इ. प्रकारे या ‘टेस्टिंग’ बद्दल बोलता येणे हा. ‘टेस्टिंग तज्ञतेचा मापक असतो अस्सा ‘सा’ लागला. मापकाच्या आधारे मी ठोकून दिले,” ‘मला ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीच्या फळांनी सजवलेला केक आवडला, खातांना ब्लूबेरीच्या मंद चवीची गाज जाणवत होती आणि नंतर हलके हलके केळे आणि व्हॅनिलाच्या लाटा जिभेवर सुरसुरून गेल्या !” केक ला मऊसर वेष्टन होते आणि ते चाखताना लोणी साखरेच्या मधुर गुदगुल्या जिभेला सुखावून गेल्या !……” इ.

     जिल एकदम खुलली. मुळात ‘मऊ लोण्यहूनी असलेली जिल साखर विरघळेल अशी हसली आणि केक- केकचे प्रकार- कृती पुस्तक या बद्दल भरभरून बोलू लागली…

     जिलचा नवरा सैन्यात (नेव्हीत) केव्हातरी ‘कोरोनाडो’ च्या मोक्याच्या बेटावर नेमणूक होऊन दोघे इथे आले. मग कधी जपानला कधी बोस्टनला….. अशी भटकंती करत आता निवृत्तीनंतर कोरोनाडोला छोटसं घर घेऊन इथेच विसावले.

    जिलला स्वयंपाक –पाककृती यांची आवड. साधारणपणे अमेरिकन महिला ‘सोयपूर्णा’ म्हणजे सोययुक्त स्वयंपाकघरे असलेल्या असल्या तरी अन्नपूर्णा नसतात. त्यांचा ‘स्वयंपाक’ म्हणजे काहीतरी ‘फिक्स’ करणं असतं. (लेट मी फिक्स अ सॅडविच फॉर डिनर ! इ. ) त्यामुळे हे मला नवलपूर्णच वाटलं.

    स्वयंपाकघरात विविध प्रयोग करत तिने केक च्या कृती तयार केल्या. मग त्यातून पुस्तक तयार झाले, “केक, आय लव्ह यू !”- लोकांना काही पदार्थ खूप आवडतात काही कमी. त्यामुळे केकच्या पुस्तकाचे तिने पदार्थानुसार भाग पडले. उदा. केळे. – मग त्यात केळ्याच्या केकच्या कृती. प्रथम करायला सोप्या मग गुंतागुंतीच्या…..वेगळेपणामुळे लोकांना हे पुस्तक चटकन घ्यावेसे वाटते. नाहीतर बाजारात केकची हजारो पुस्तके नि गुगलवर हजारो कृती !

     आता हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचावे कसे असा विचार करतांना केशकर्तनालयाच्या संचालिका असलेल्या मैत्रिणीने सुचवले की रविवारी दुपारी दुकान बंद असते. पर्यटकांच्या झुंडी या रस्त्याने जातात, तेव्हा असा पुस्तक स्वाक्षरी-विक्रीचा अभिनव कार्यक्रम करावा ! कादंबरी लिहिणारा लेखक अशा स्वाक्षरी कार्यक्रमात नमुना कादंबरीतले उतारे वाचतो- मग केककृती लिहिणाऱ्या लेखिकेने केकचे नमुने चाखायला द्यावेत !”

    हा अभिनव कार्यक्रम चविष्ट आणि लज्जतदार व्हायला आणि पुस्तक विक्री व्हायला वेळ नाही लागत.

     “केक कृतीच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम/ क्लास केलेस तर मी येईन –कारण ‘बेकिंग’ या प्रकारात मी अनभिज्ञ आहे. मी तिला म्हणाले.- तिला ही कल्पना आवडली….

    जिलने हे सहावे पुस्तक… या आधीची चार पुस्तके गोड पदार्थांना वाहिलेली आहेत, तर एकात गोडाबरोबर काही तिखट, खारे पदार्थ (अर्थात चटकदार आहेत) एका पुस्तकात लहान मुलांसकट सर्व कुटुंबासाठी पाककृती आहेत ! तर एकात ईस्टरसाठी रंगवण्याच्या अंडाकृतीसह अनेक गंमती जंमतीच्या कल्पना !

     आणि हो, एक पुस्तक आहे खास ‘फ्रेंच पेस्ट्री’ बर ! नवलपरीच्या फ्रेंच पेस्ट्रीज म्हणजे फ्रेंच पाकतज्ञ (शेफ) आणि खाद्यतज्ञ यांची खासीयत !

     ‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ हे खरं असलं तरी, ‘साखर खाणाऱ्याला कधीकधी ‘मधुमेह’ होणार हेही होऊ शकतं. त्यामुळे कमी साखरेचे किंवा विना साखरेचे पदार्थ कसे करावे याबद्दलचं जिलचं “स्वीट नथिंग” हे पुस्तकही लोकप्रिय आहे !

     प्रत्येक पुस्तकात सुरवातीला कोणते भांडे कशासाठी योग्य यांचं मार्गदर्शन. कृतीसाठी वापरण्याच्या पदार्थांची माहिती आणि योग्य पदार्थ वापरण्याची माहिती आहे. बारीक सारीक सूचना आहेत. नवशिक्यांना प्रोत्साहन आणि बुजुर्गांना बारकावे सांगणारी तंत्रे !

     पदार्थांच्या सोप्या कृती आधी आणि ते करत करत हळूहळू अवघड वळणे घेत पारंगत होण्याच्या गुरुकिल्ल्या आहेत.

     चुलीवरच्या भांड्यात आधी अंडी घालून मग त्यात हळूहळू साखर मिसळा- उलटे केले तर साखरे बरोबर अंडी जळतात.

     चॉकलेट मध्ये किंचित कॉफी मिसळा आणि लज्जत वाढवा.

     केकचे मिश्रण घट्ट झालेसे वाटले तर गरम पाणी घालत ते पातळसे करा. (गार पाणी नको).

     केकचे फ्रॉस्टिंग एक दिवस आधी करा.

     केक बनवणे अगदी सोपे – पण ‘लेअर’ म्हणजे बहुपदरी केक बनवणं ही कला आहे बरकां !

     आणि फ्रेंच पेस्ट्री बनवणं खर म्हणजे आपला पाय बनवण्या इतकं सोपं असतं- पण फ्रेंच पेस्ट्री बनवून तुम्ही एकदम ‘इंप्रेशन’ मारू शकता !

     अशा खाचा खोचा पुस्तकात जागोजागी दिसतात – आणि सजावटीसह केक आणि पदार्थांची सुंदर छायाचित्रे ! पुस्तकातला प्रत्येक पदार्थ जिलच्या कृतीनं सजीव होऊन तर येतोच पण तो तिच्या ह्रदयातून येतो !

     तिचं पाककृती प्रेम आणि ‘टेंडर लिव्हिंग केअर’ पानोपानी दिसते ! जिलशी बोलतांना सतत जाणवतं की तिचं पदार्थावर, तिच्या खास खास पाककृतींवर अगदी अपत्यवत प्रेम आहे !

    जिलला पाककृतीत  लहानपणापासून रस – त्यात अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे ‘सॅन होजे’ – कॅलिफोर्नियाचा उमदेपणा, अघळपघळपणा व्यक्तिमत्वात उतरलेला !

     मुळात इंग्लिश घेऊन बी.ए झालेली जिल लग्न होऊन नवऱ्याबरोबर  इंग्लंडला गेली ती आपल्या व्यक्तिमत्वाला (आणि रसनेला) पोषक अशा कुकिंग स्कूलमध्ये ! इंग्लंडमध्ये तिला ब्रिटीश पदार्थांमध्येही गोडी वाढली. एका कंपनीत ती मुख्य पाकतज्ञ झाली आणि कंपनीच्या खाद्यपदार्थांचा दर्जा उंचावण्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले. ‘गोल्डन डोअर, स्पा’ या प्रख्यात कंपनीत ती ‘पेस्ट्री शेफ’ म्हणून काम करू लागली.

     व्हाईट हाउसच्या पेस्ट्री शेफ बरोबर शिकण्याची संधीही तिला मिळाली. एवढं सारं ‘मधुर’ करिअर तिनं आपल्या गोजिरवाण्या मधुर मुलीच्या संगोपनासाठी बदललं आणि मग ती संसार सांभाळून पाककृती करणे, पुस्तके लिहिणे, मासिकात लिहिणे हे करू लागली नवऱ्याची फिरती असल्यामुळे आपले स्वयंपाकघर आपल्या पाठीवर घेऊन हिंडता हिंडता तिने ‘पेस्ट्री तज्ञ’ म्हणून पुष्कळ यश मिळवले आणि आता कोरोनाडो या चिमुकल्या बेटावर ती मजेत पेस्ट्री आणि केक लोकांना खिलवते आहे !

     तिच्या पुस्तकातला एकतरी केक करून अनुभवण्याच भरघोस आश्वासन देऊन मी तिचा निरोप घेतला आणि माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी केक बनवण्याचे वर्ग सुरु करण्याचं आश्वासन देऊन जिलने मला प्रेमळ निरोप दिला !

    तो केक घेऊन मी हॉटेलवर आले. मस्त कॉफी बनवली. ..खिडकीशी असलेल्या टेबलावर कॉफी चा वाफाळता कप आहे. समोर कोरोनाडोचा पूल आणि समुद्र ! कॉफीच्या कडवट चवी मागून केक मधल्या बदामाची चव जिभेवर अलगद विसावते आहे आणि केकच्या मधला गोडीचा मुलायम लेप जिभेला सुखावून जातो आहे !

     या केकवर खरोखर शतदा प्रेम करावे !

                                      -विद्या हर्डीकर सप्रे.