ती माझ्यासमोर बसलेली . नजर खाली, बोटे सफाईने फोनवर फिरत असतात; आणि एक डोळा समोरच्या मॉनिटर ..वरच्या मजल्यावर झोपलेल्या बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ! अशा एकूण मल्टीटास्किंग मध्ये आमचीही संभाषणाची गाडी पुढे सरकते…. पुढच्या पिढीची ही नवी माणसे ! त्यांचे शब्दप्रयोग वापरत त्यांच्याशी गप्पा मारायचा माझा प्रयत्न.. नवे चेहेरे-नव्या ओळखी- नवे विषय-नव्या गप्पा. तसे मला नवे अनुबंध जोडायला, म्हणजे आताच्या पिढीच्या भाषेत नवी कनेक्शन्स करून ‘व्हाटस् अप’ वर नाहीतर फेसबुकवर त्यांना टाकायला आवडते ! लहानपणी काच कमळासाठी जेवढ्या असोशीनं रंगीबेरंगी बांगड्या गोळा करायला आवडे – तसेच ! त्याचे पुढे काय करायचे हा प्रश्न मात्र अगदी मनाच्या मागच्या कोपऱ्यात गुपचूप उभा असतो.
आता समोर बसलेली ही माझ्या भारतातल्या मैत्रिणीच्या सुनेची बहीण ! मी आलेली असते भारतातून मुलाकडे लॉसएंजिल्सला आलेल्या माझ्या मैत्रिणीला भेटायला. या मुलीला कौतुकाने खाली बोलवून माझ्या मैत्रिणीने नुकतीच तिची ओळख करून दिलेली असते. “ही आमच्या चिंटूची मेव्हणी आस्था. अग, हे लोक तिकडे सियाटल जवळ असतात. सुट्टी म्हणून आले आहेत दोन दिवस. बोल पाच मिनिट.. आलेच मी” म्हणत माझी मैत्रीण गुडुप!
“नाव काय म्हणालीस तुझ ?”
“आस्था.”
“वा. वेगळ आणि छान नाव आहे. …बाळही गोड आहे तुझ. फोटो पाहिलेत. … केव्हा आलात तुम्ही अमेरिकेत ? … कुठली तू मुंबईची का ग? .. आणि करियर, सध्या काय ?….आवडत का या देशात ? … तुमच्या गावात मराठी मंडळ आहे का ग ? .. मग जाता का तुम्ही मंडळाच्या कार्यक्रमांना ?…. हो का ?…. अग मग ते अमेक तमके तुमच्याच गावातले. ते भेटले का ?.. नसले तर मी फोन पाठवते तुला. … ”
कोणतातरी संभाषणाचा धागा पकडण्याचे माझे प्रयत्न! मधून मधून “कूल” आणि “ऑसम” म्हणायला विसरायचं नाही. यांना आपल्याशी बोलण्यात रस आहे (तरी) का असला प्रश्न गुपचूप सुद्धा मनात आणू न देता “ आम्ही तुमच्या आई बाबा पिढीचे असलो तरी इथले रहिवासी आहोत बरं का ! आम्हीही इथे करियर केलं आहे – चांगली घर दारं नोकऱ्या केल्या आहेत. मराठी मंडळ सुरु करणारे ते आम्हीच बरं का- आम्ही आहोत म्हणून तुम्ही येऊ शकलात- तुम्ही आमच्या खांद्यावर उभे आहात. संभाषणात इ- इ.” शेखी मिरवण्याचा माझा अप्रत्यक्ष आणि (अ) सफल प्रयत्न –
“तुम्ही ? आणि ‘आय. टी’. तल्या ?” मध्येच मान वर करून आस्था विचारते. “आमचे प्लॅटफॉर्म, बिटफॉर्म शब्द तुम्हाला माहिती दिसतात –की फेकताय काहीतरी “ अशा आशयाची नजर !”
हाताची बोटे बहुदा ‘काय बोअर चाललंय !आता सटकणारे इथून पुढच्या मिनिटाला “असं कोणाला तरी टाईप करत असणार. तेवढ्यात माझी मैत्रीण कॉफी घेऊन बाहेर. आस्था सटकू पहाते. “अग बस ना. तुझी कॉफीची वेळ म्हणून मुद्दाम तुझाही कप घेऊन आले. बाळ झोपल आहे, तर निवांतपणे कॉफी पिऊन मग पळ.” “ असं म्हणत मैत्रीण आस्थाला आग्रहान बसवून घेते.” तिला संभाषणात ओढून घेण्यासाठी मैत्रीण मला म्हणते, “ अग तू आनंदीबाई जोशींची समाधी पाहून आलीस ना ? मग आस्थाला दाखव ना फोटो. जरा माहिती असली की तो आनंदीबाईंचा सिनेमा पहायला उत्साह वाटेल या मुलांना.”
– मग मी तो विषय पकडून (बुडत्याला) काडीचा आधार घेत फोटो दाखवते. मैत्रीण आस्थाला कौतुकाने सांगते, “अग आनंदीबाई म्हणजे “फर्स्ट लेडी डॉक्टर फ्रॉम इंडिया बरं का! अग, तुमच्या पिढीला या गोष्टी सांगतच नाहीत. (तुमचा काय दोष !) पण तुम्हाला समजायला हव्यात.!”
आस्था म्हणते, “हो” true !”
फोटो निरखून बघते. पटकन म्हणते, “मी पहिले काही एपिसोड्स ऑफ ‘उंच माझा झोका.’
फोटोतील जन्ममृत्यू ची वर्षे पहात आस्था उद्गारते,” ओ ! शी वॉज ओन्ली २३ ?”
मी सांगते- “हो ना. पण “ही आनंदीबाई. ही ‘उंच माझा झोकातली’ नव्हे. तू पाहलेस ना एपिसोड्स त्या रमाबाई रानडे ! या आनंदीबाई जोशी.”
मग काय वाटतं कोणास ठाऊक ! तिची उत्सुकता किंचित वाढते आहे हे जाणवून मी उत्स्फूर्तपणे एक दुसरा फोटो दाखवते ! (लेट मी शो यू what’s in my खजिना ! चा भाव खाते ! )
मला कुणीतरी पाठवलेला आणि मी ती भावना जपून ठेवण्यासाठी whats app च्या कप्यात साठवलेला फोटो – अंगभर दागिने घातलेला सात आठ वर्षाच्या मुलीचा!
“ओ ! हाऊ क्युट ! हा आनंदीबाईचा फोटो ? लग्नातला ? –इतक्या लहानपणी लग्न होत मुलींची ?”
“हो. आनंदीबाईंच लग्न असच लहानपणी झालं होतं पण या फोटोतली मुलगी आनंदीबाई नव्हे बरका. या मुलीचं लग्न झालेलं नव्हतं – तेव्हा सगळ्याच समृद्ध घरातल्या मुली-सुना नेहमी दागिने घालत ! फक्त लग्नसमारंभात नव्हे. – “बरका या मुलीचे वडील डॉक्टर होते. ‘विश्राम रामजी घोले’ – १८५० ते १९०० त्या पन्नास वर्षातले! मला नक्की नाही आठवत. पण आठवते ती या ‘बाहुली’ची गोष्ट ! या मुलीचं नाव काशीबाई. त्या काळात मुलींच्या शाळा नव्हत्या. तेव्हा मुलींना शिकवतही नसत. पण या आपल्या मुलीला शिकवायचे असे डॉ. घोले यांनी ठरवले ते समाजाच्या मागास विचारसारणीविरुद्ध बंड करून शिकले होते. पुढे आले होते. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व फार वाटे. त्यातही स्त्रियांना शिक्षण देण्याची विशेष गरज त्यांना जाणवत होती. पण घरचे काही लोक जुन्या विचारांचे. त्यांना नाही आवडले. पण विश्रामजींच्या पुढे चालेना ! मग नात्यातल्या कोणीतरी या नऊ वर्षाच्या कोवळ्या मुलीला अन्नातून कुटलेल्या काचा घातल्या – गेली बिचारी. तिच्या स्मरणार्थ वडिलांनी हौद बांधला- त्याला पुण्यात बाहुलीचा हौद म्हणत- अग, मी रोज त्या हौदावरून जाई ! पण मलाही माहिती नव्हती- त्या मागची ही कथा ! माझा कंठ भरून आला. .. –मी सांगत होते आणि आस्था मान वर करून एकाग्रतेन ऐकत होती !
- “oh ! so she was sacrificed ! for education ?” आस्था उत्स्फूर्तपणे
म्हणाली आणि एकदम ओक्साबोक्शी रडू आलं तिला ! –
“हो ना. सनातनी समाजाने, आंधळेपणे स्त्री शिक्षणाच्या वेदीवर घेतलेला तो भयंकर बळी होता.” मलाही गहिवरून आल. तरीही मी बोलतच राहिले..
“we are here today because these women were there yesterday ! we owe them our gratitude and much more! आपण त्यांच्या खांद्यावर उभे आहोत.” मी बोलत होते – पण पुढे माझ्याने बोलवेना. आम्ही दोघी एकमेकींच्या डोळ्यातल्या आसवात आपली प्रतिबिंब पहात होतो ! –
माझं आस्थाशी एकदम, अचानक आणि हळूवार ‘कनेक्शन’ झालं !
तिनं माझा whats app नं घेतला. email घेतली. मग मला ती खूप प्रश्न विचारायला लागली ! मग मन आवरून मी तिला सांगतच राहिले. “अग, हे वडील इतके निश्चयी होते की –एक मुलगी गेली म्हणून डगमगले नाहीत ! त्यांनी हिच्या धाकट्या बहिणीला शिकवलं. पदवीधर केलं. त्या गंगूबाई. त्या तर पुढे इतक्या मोठ्या झाल्या की त्यांनी परदेशात जाऊन वेद आणि गीता यावर व्याख्याने दिली. आणि बरंका, पुण्यातील पहिली मुलींची शाळा हुजूरपागा – ती स्थापन करण्यात विश्राम रामजी यांचा मोठा सहभाग होता. मी त्याच शाळेची विद्यार्थिनी.”
-“आपण किती टेकन इट फॉर ग्रँटेड नाही का ?” आस्था म्हणाली.
“ हो ना ! – पण खरचं हे सर्व तुमच्या पिढीला माहिती पाहिजे ! तुम्हालाच का पण अमेरिकेत जन्मलेल्या आमच्या मुलांच्या पिढीला सुद्धा हे माहिती पाहिजे. “
“ हो. ट्रू. . सांगता का या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना ? “
“ हो. प्रयत्न करतो ग आम्ही. एकदा तर आमच्या दुसऱ्या पिढीला हे सांगावं म्हणून आम्ही त्याच्या संमेलनात “तेजोमयी” असं पोस्टर प्रेझेटेशन केलं. ते होत, समाजावर काही ठसे उमटवणार्या; परिणाम करणाऱ्या मराठी स्त्रियांबद्दल !- ‘तेजस्वी आणि मातृमयी’ म्हणून तेजोमयी.
आम्हाला त्याचं एक इंग्लिश पुस्तक करायची फार ईच्छा आहे. तस झालं तर ते त्यांच्या पर्यंत आणि तुमच्या पर्यंतही पोहोचेल. नाही का? “ मी सांगत होते.
-“हो, मला मदत करायला आवडेल. पण माझी मुलगी खूप छोटी आहे. कसं जमेल ? “- आस्था म्हणाली !-
माझ्या मनात सरकन ‘तेजोमयी’ चे दिवस सरकून गेले ! अमेरिकेत आल्यावर पुष्कळ वर्षे मी म. टा. पोस्टाने मागवत असे. कारण तेव्हा आतासारखं महाजाल नव्हत. त्यामुळे ऑन लाईन वाचायची सोय नव्हती. त्यातले अरुणा ढेरेचे महाराष्ट्रातल्या स्त्रियांवरचे लेख मी जपून ठेवले होते.
मी हा प्रकल्प करत होते त्यात मी संदर्भ म्हणून तेव्हा ते लेख चाळले. त्यात मला ही बाहुलीच्या हौदाची गोष्ट सापडली. मला ती अगदी भिडली. म्हणून मी हीच गोष्ट माझ्या ऑफिसातल्या अमेरिकन बाईला सांगितली – पण ती सांगताना माझ्या डोळ्यात पाणी का आलं ते तिला समजेना !
पोस्टर्सची माहिती सांगताना दुसऱ्या पिढीच्या आमच्या मुली सुरवातीला “हे कशाला” असा मख्ख चेहेरा करून उभ्या- तेव्हा मी त्यांना “आपण यांच्या खांद्यावर उभ्या” हाच मुद्दा सांगितला होता – तेव्हा त्यांना “कनेक्शन” झालं !- एका मुलीनं “झाशीची राणी !- ओ ! दॅटस मी ! – मॉम calls मी झाशीची राणी “- असं स्वतःच connection केलं होतं-
मराठीपण आणखी आणखी पातळ होत चाललं आहे- महाराष्ट्रातील मुलं कोणत्याही भाषेत शिकली तरी त्यांच्यापर्यंत हा इतिहास पोहचत नाही आणि इथलं मराठी connection तुटत आहे ! आपला मराठी इतिहास आणि संस्कृतीशी असलेला दुवा तुटत चालला आहे. ..
– ‘तेजोमयी’ प्रकल्पाला पंधरा वर्ष उलटून गेली. आमच्या “झाशीच्या राण्या” मोठ्या झाल्या- मुलांना पाठुंगळी बांधून संसार करू लागल्या. मराठी लोकांच्या नव्या पिढ्या इथे येत राहिल्या आहेत. हे आमच्यासारखेच पहिल्या पिढीचे म्हणून की काय अजून महाराष्ट्राशी यांचे अनुबंध –कनेक्शन्स आहेत. आताची मराठी मंडळे हेच लोक चालवतात. त्यांच्या मुलांसाठी मराठी शाळा असाव्यात असं त्यांना वाटतं- आमची ती तेजोमयी ची पोस्टर्स आता आमच्या गावातल्या मराठी शाळेसाठी अजून वापरत असतात. पण तेजोमयीची एखादी इंग्रजी पुस्तिका काढावी हा विचार तसाच मागे पडून गेला !
-आज ही आस्था आस्थेनं विचारते आहे- “मी काय मदत करू?”-
-पातळ होणाऱ्या मराठीपणावर कोणीतरी मायेची दाट साय धरतं आहे असं वाटलं !
विद्या हर्डीकर सप्रे , कॅलिफोर्निया