‘सेल्फी’: स्वयंसेवक

लांब दांडय़ाला सेलफोन अडकवून ‘सेल्(फ) फोटो’ काढणाऱ्याचा मुखडा पाहिला आहे? एकदम आनंदी आणि विजयाचं समाधानी हसू चमकणारा!

‘योसेमिटी’ नावाचं अमेरिकेतलं राष्ट्रीय उद्यान- म्हणजे नॅशनल पार्क पाहताना हे ‘स्वयं’ भेटतात, तसेच नॅशनल पार्कमध्ये काम करणारे ‘स्वयं’सेवकही ठिकठिकाणी भेटतात. त्यांना ‘पार्क रेंजर’ म्हणतात. या राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारच्या संपत्तीवर अवलंबून न राहता आपण होऊन स्वयंप्रेरणेने मदतीचा हात पुढे करणारे हे स्वयंसेवक! मदत केल्याचा आनंद, निसर्गाचा मनसोक्त सहवास आणि आपल्याला आवडणारं काम करण्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. अशा एका जोडप्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली.

माईक आणि जॅनिस हे सुमारे ८०-८५ वयाचे स्वयंसेवक! गेली पंधरा-वीस वर्षे ते स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. दोघे कॅलिफोर्नियातल्या सॅन्फ्रॅन्सिस्कोजवळील बे एरियात वाढले. जॅनिस दहा वर्षांची असल्यापासून जवळच्या योसेमिटी पार्कला भेटी देऊ लागली. दहाव्या वर्षीच तिने आई-वडिलांबरोबर योसेमिटी नॅशनल पार्कमधील ‘हाफ डोम’ या प्रसिद्ध शिखराचा सोळा मैलांचा साहसदौरा.. ‘ट्रेक’ सुमारे दहा तासांत पूर्ण केला. जॅनिसच्या निसर्गप्रेमाची ती पहिली पायरी! त्यानंतर हा ट्रेक तिने आणखी चार वेळा केला.

आता तर हा जीवच अवघा असा जखडला।

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो॥’

अशी महानोरांच्या कवितेत भेटणारी ही जॅनिस! दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व रशियात सैनिक म्हणून काम केलेला माईक तिला भेटला आणि १९५७ मध्ये त्यांनी विवाह केला. माईकने पत्रकार म्हणून काम सुरू केले, तर जॅनिस हायस्कुलात शिक्षिका म्हणून काम करू लागली.

ते दोघे आणि यथावकाश त्यांची तीन मुले यांचं निसर्गप्रेम त्यांना दरवर्षी योसेमिटीला ओढून नेतच राहिलं. योगायोगाने पुढे त्यांचा एक मुलगा जपानला गेला, तर दुसरा न्यूझीलंडला. अर्थातच माईक आणि जॅनिसने त्या दोन्ही देशांचा निसर्ग मनमुराद अनुभवला. माईकला सैन्यातल्या कामामुळे रशियन येते. त्यामुळे दोन वर्षे आपापल्या कामांतून सुट्टी घेऊन हे दोघे रशियातला निसर्ग अनुभवण्यासाठी गेले. क्रोएशिया, स्विस आल्पस्, पँटागोनिया, दक्षिण अमेरिका, स्पेन असे अनेक निसर्गरम्य प्रदेश या जोडीने पालथे घातले. Travel bug bites you. जॅनिसने आपल्या चिरप्रवासी वृत्तीचे हसत हसत वर्णन केले. खिशात फारसे पैसे नसताना आणि तीन मुलांचा संसार सांभाळून आपला प्रवासाचा छंद सांभाळायचा म्हणजे काही स्वस्त आणि मस्त युक्त्या कराव्याच लागतात. स्वयंसेवक म्हणून काम करण्याची युक्तीही अशीच सुचली. दोघांना जेवढा निसर्ग प्रिय, तेवढेच संगीतही! मग जॅनिसने सॅन्फ्रॅन्सिस्कोतील एका ऑपेरा थिएटरमध्ये संध्याकाळचे स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले. थिएटरचे महागडे कार्यक्रम विनामूल्य ऐकण्याची सोय झाली. त्यातून काही दक्षिण अमेरिकन, काही स्पॅनिश मित्र मिळाले आणि त्या देशांत स्वस्त राहण्याच्या सोयी समजल्या. अशा तऱ्हेनं त्यांना निसर्गप्रेम, संगीतप्रेम, प्रवासप्रेम एकत्रच साधता आले.

१९७० च्या सुमाराला माईक आणि जॅनिस योसेमिटी असोसिएशनचे सभासद झाले आणि त्यांच्या प्रकल्पांत भाग घेऊ लागले. तिथला साठ मैलांचा सात दिवसांचा एक साहसदौरा (हाय सियारा लूप ट्रीप) या जोडप्याने केला. बरोबर तीस लोक होते. आणि त्यांचा नेता होता एक पार्क रेंजर स्वयंसेवक! त्यातून या जोडप्याला ‘पार्क रेंजर’ म्हणून स्वयंसेवकगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. पत्रकार माईकच्या निसर्गप्रेमाच्या बहराने त्याला फुलांचं वेड लावलं आणि त्याने बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्राचे धडे गिरवले. तो त्याबद्दलचे लेख त्याच्या वृत्तपत्रात लिहू लागला.

आपापल्या पोटापाण्याच्या कामातून जरा सवड झाल्यावर आणि मुलांची जबाबदारी कमी झाल्यावर माईक आणि जॅनिसने पार्क रेंजर म्हणून कामाला सुरुवात केली. महिन्यातून १२ ते २० दिवसपर्यंतही ते काम करतात. पार्कमध्ये स्वत:चा तंबू ठोकायचा. ‘आठवडय़ाची पाच जेवणे, रोज विनामूल्य स्नानाची सोय आणि दिवसाला दहा डॉलरचे मानधन यावर मजेत राहता येते..’ असे माईकने सांगितले. ‘मग तुम्हाला प्रशिक्षण वगैरे मिळतं का?’- ‘प्रशिक्षण? छे! फक्त एक तासाचं. बाकी सर्व ‘On job!’  जॅनिस हसत हसत म्हणाली. ‘उदा. हायकिंगची माहिती देण्याची कामगिरी असली तर माणसांचे पाय पाहावेत आणि ते कोणत्या वेळेला उगवले ते पाहावं. पायात चपला असल्या अणि वेळ दुपारची- तर अध्र्या मैलाच्या चिमुकल्या साहस

-सफरीचा सल्ला द्यायचा, हे सुचतंच आपोआप. हेच On job Training!

तेव्हा हे ‘सेल्फ लर्नेड’ ‘सेल्फी : स्वयंसेवक’ प्रवास मार्गदर्शन केंद्रात, कलादालनात, ‘नेचर वॉक’ मार्गदर्शक म्हणून ‘रानझुडपांचे संरक्षण किती महत्त्वाचे!’ याबद्दल लोक जागृती करणारा व्याख्याता म्हणून अशी विविध प्रकारची स्वयंसेवा करतात. हे करत असतानाच लोकांना काय ऐकायला आवडतं, काय नाही, याचा अंदाज येतो. त्यांना काय जमतं, हे माहिती नसल्याने सूचना देताना काळजी घ्यावी लागते. म्हणजे हायकिंगचे मार्गदर्शन करताना kI recommend you this traill  असं म्हटलं तर त्यांना आवडत नाही. त्याऐवजी kl like to do this trail- you will like it! असं म्हणायचं- म्हणजे उगाच ‘तुला हे जमणार नाही’ असा सपकारा मारण्याऐवजी  ‘याच्याऐवजी ती वाट घेतलीस तर तुला छान छान फुलं भेटतील..’ असं गोड हसून सांगायचं.

योसेमिटीशिवाय आणखीन काही राज्य उद्यानांतही (state parks) माईक आणि जॅनिस काम करतात. तिथे प्रशिक्षण जास्त मिळतं. ९० तास प्रशिक्षण, ट्रेकिंगसाठी फिल्ड ट्रिप्स- म्हणजे अभ्यास सहली, दरवर्षी उजळणी वर्ग, महिन्यातून एकदा स्वयंसेवक मेळावा अशा शिकण्याच्या अनेक संधी मिळतात. हे सर्व शिक्षण उत्साहाने घेणाऱ्या माईक आणि जॅनिसचा आणखी एक छंद समजला, तो म्हणजे नवं काही शिकण्याचा! स्वयंसेवक म्हणून काम करताना आपल्याला ‘नित्यनवा दिवस जागृतीचा’ अशी संधी मिळते आणि आपलं जीवन केवढं समृद्ध होऊ शकतं, हे माईकशी बोलताना पुन्हा एकदा मनात अधोरेखित झालं. एवढय़ा सगळ्या वर्षांत जॅनिसला एकच वाईट असा अनुभव आला.. ‘बोरेगा स्प्रिंगज्’ या स्टेट पार्कमध्ये! एक बाई तणतणत तिला म्हणाली, ‘इथे ‘झरा’ कुठेच नाही. मग याचं नाव ‘बोरेगा स्पिं्रग’ कशाला ठेवलंत? नाव बदला! उग्गाच तडमडत आलो आम्ही इथे!’ इ. इ. ‘स्वयंसेवकाची विनोदबुद्धी चांगली असावी लागते’ हे माझं प्रशिक्षण करणारी तिची ही आठवण!’ जॅनिस सांगत होती. ऐंशी वर्षे उलटून गेल्यावरही जॅनिसची तब्येत खणखणीत असण्याचं तिचं रहस्य म्हणजे तिची (आयुष्यभर मुलांच्या हायस्कुलात शिकवूनही!) सणसणीत विनोदबुद्धी, निसर्गाशी नातं, संगीताचं प्रेम आणि नवीन शिकण्याचं परकऱ्या पोरीचं औत्सुक्य! स्वयंसेवक म्हणून काम करताना कधी लोकांना आपण खूप काही आश्वासनं देऊन बसतो. मग ती पुरी करताना चांगलीच तारांबळ उडते. ‘नाही’ कसं म्हणायचं, ते समजत नाही. (How to say ‘no’ is an art after all’’) हे सगळं मान्य करूनही या दाम्पत्यानं ‘स्वयं’ हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो हे ओळखून, स्वत:ला काय आवडतं ते समजून घेऊन स्वत:साठी जगण्याचे हे प्रयोग केले आहेत. ‘सेल्फी’ला हेतूची चौकट दिली आहे. ‘हेतूचं भान असलं की खारीच्या (पाठीला चिकटलेल्या) वाळूच्या कणालाही अर्थ येतो..’ हे तर साक्षात् बाबा आमटे म्हणून गेलेत! ‘स्वयं’सेवक होण्याचा माईक आणि जॅनिसचा निर्णय स्वयंप्रज्ञेतून आलेला; म्हणूनच तर दिसली त्यांच्या छबीवर न ढळणारी प्रसन्नता आणि विजिगीषू समाधान!

विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्र्सिद्धी : लोकसत्ता, 4 ऑक्टोबर, 2015)

भव्यत्वाची जेथे प्रचीती

अमेरिकेतील भव्य, प्रेक्षणीय स्थळ म्हटले की सहजपणे लोक ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्कचे नाव घेतात! हा देश सुमारे ५८ भव्य नॅशनल पार्कस्च्या सौंदर्याने नटला आहे. नावाप्रमाणेच असलेले, कोलोराडो नदीने लाखो वर्षे खोदून निर्माण केलेले हे ‘ग्रँड कॅन्यन’ आहे. तसेच युटा अणि अ‍ॅरिझोना राज्यांच्या सीमांवरचा प्रदेश अनेक अद्भुत निसर्गशिल्पांनी आणि लाल, केशरी, गुलाबी, पिवळ्या रंगच्छटांनी उजळून गेलेला आहे. त्यातील एक सुमारे २३० चौरस मैलाचा भव्य आणि नेत्रदीपक चमत्कार म्हणजे ‘झायॉन नॅशनल पार्क’! (Zion National Park) समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फुटांवर या चमत्काराचा तळ आहे. आणि ८००० फुटांवर याचा पहाडी शिरपेच आहे! माणसाला नम्र करणारे उत्तुंग पाषाणांचे पहाड, उंचीवरून स्तिमित करणारी विस्तीर्ण पठारे आणि उसळत, कोसळत खळाळणारे प्रपात! (त्यांना धबधबे म्हणणं म्हणजे नायगाऱ्याला ‘नळ’ म्हणण्यासारखं वाटतं!) –

खरं तर ‘उत्तुंग’, ‘भव्य’, ‘प्रपात’ वगैरे शब्दसुद्धा खुजे वाटावेत असं या भागाचं स्वरूप आहे. ‘झायॉन नॅशनल पार्क’ हे तिथे प्रत्यक्ष जाऊनच अनुभवावं असं आहे. हजारो नव्हे, तर लाखो वर्षांपूर्वी इथे होती एक नदी (अजूनही आहे). ‘व्हर्जिन रिव्हर’ हे तिचं नाव! खळखळ धावत, फेसाळत, उसळत जाता जाता इथल्या ‘सॅन्डस्टोन’च्या प्रदेशात तिनं खोदली पाषणशिल्पं! कदाचित काही भूकंप झाले असतील, कुठे पहाड कोसळले असतील.. इतिहासाच्या खाईत! कधी पाण्यातून उभे राहिले असतील पर्वत! त्या सर्व घटनांच्या नोंदी इथल्या पहाडांवर, दगडांवर निसर्गत:च उमटल्या आहेत. पहाडांवर दिसणाऱ्या लाटांच्या जन्मखुणा, पर्वतांचे कातीव कंगारे, निळ्याभोर आकाशावर रेलून राहिलेली लाल- केशरी गोपुरांनी नटलेली रेखीव शिखरे हे सर्वच अंतर्मुख करून जाणारं! दरवर्षी तीन दशलक्ष लोकांना विविध प्रकारे गुंतवून ठेवणारा हा प्रदेश १९१९ च्या सुमाराला ‘नॅशनल पार्क’ म्हणून ठरवला गेला. आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी रस्ते बांधले गेले. राहण्याच्या सोयी केल्या गेल्या. संग्रहालय बांधले. आणि ३५-४० पायवाटाही बांधल्या! त्याशिवाय पाठीवर बॅगपॅक घेऊन ट्रेकिंग करणाऱ्या साहसवीरांसाठी सुमारे १०० मैलांच्या रानवाटाही शोधून, नोंदवून नकाशे बनवण्यात आले. त्यांच्यासाठी चाळीसेक विश्रांतीस्थळांच्या सोयी करण्यात आल्या. निसर्गाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचं हे एक दालन आणि साधनही आहे याचा विचार अर्थातच केला गेला. आणि पर्यटक, साहसवीर यांच्याप्रमाणेच संशोधक आणि अभ्यासकांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सुरू आहेत. –

त्यात इथला भूगोल, भूगर्भशास्त्र, पर्यावरण, निसर्गसंपत्ती, वनसंपदा, आणि वन्यप्राणीजीवन असे सर्वच विषय आहेत. चित्रकार, छायाचित्रकार अशा कलाकारांसाठी तर हा खजिनाच आहे. या सर्वाना सेवा मिळण्यासाठी सरकारी आणि स्वयंसेवक असे सर्वच कार्यकर्ते हसतमुखाने तत्पर असतात. पार्कचा काही भाग पाहण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी मोफत बसची व्यवस्था आहे. कधी पायी जावं आणि हजार प्रकारच्या वनस्पती पाहाव्यात. तर कधी २०० प्रकारचे पक्षी असलेल्या या प्रदेशात पक्षीनिरीक्षणाचा आनंद घ्यावा. कधी रानफुलांचे नमुने गोळा करावेत. वाटेत एखादा ‘टॅरंच्युला’ (tarantula) म्हणजे मोठ्ठा विषारी कोळी दिसला तर घाबरावे; पण आश्चर्यचकित होऊ नये!
जरा जास्त साहसी ट्रेकर्सना खुणावतो तो ‘नॅरोज’ हा भाग. नावाप्रमाणेच हा झायॉन पार्कमधील सर्वात अरुंद भाग! म्हणजे भोवती हजार- दीड हजार फुटांची उंच पर्वताची रांग आणि मधे जेमतेम २० फुटांची वाट. काही भाग व्हर्जिन नदीचा. या प्रवाहातून उलटय़ा दिशेने जाण्याचा हा ट्रेक आहे. तसा खूप अवघड नव्हे. पण आव्हान देणारा आणि त्याचवेळी डोळ्यांचे पारणे फेडणारा! अचानक वेगाने पूर येऊन धोका देणाराही! दोन-तीन महिन्यापूर्वीच या नॅरोजने सात साहसवीरांचा बळी घेतला. –

‘झायॉन’चा भाग ‘भीमरूपी’, ‘भव्यरूपी’ आहे, तसाच महारौद्ररूपीही आहे. पहाडांचे कातळ कोसळणे हा प्रकार कधी कधी होतो.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ातली गोष्ट. आमच्या इंग्लंडहून आलेल्या मित्रांना ‘ग्रँड कॅन्यन’, ‘ब्राईस कॅन्यन’ आणि ‘झायॉन कॅन्यन’ अशा तीन नॅशनल पार्कची सफर घडवण्याचा बेत आम्ही केला होता. ग्रँड कॅन्यनहून निघून आठ तासांचा प्रवास करून आम्ही झायॉनच्या एका प्रवेशद्वाराच्या दिशेने चाललो होतो. २३ सप्टेंबरची ती संध्याकाळ. तिथून प्रवेश करून तासभर प्रवास करून ‘झायॉन’ची झलक पाहुण्यांना दाखवायची आणि दुसऱ्या टोकाच्या प्रवेशद्वारामार्गे बाहेर पडून स्प्रिंगडेल या चिमुकल्या गावात मुक्काम करायचा, असा बेत! पण प्रवेशद्वारी गाडय़ांची मोठ्ठी रांगच रांग! कोणाला आत जाऊ देत नव्हते. द्वारपालांनी सांगितले की, आत रस्त्यावर १९ फूट ७ २० फूट ७ १५ फूट आकाराचा दोनशे टनांचा एक दगड कोसळला आहे आणि रस्ता बंद आहे! आता तो दगड सुरुंगाने उडवून फोडायचा की यंत्राने ढकलून बाजूला करायचा, या प्रश्नाची सोडवणूक चालू आहे. आता मार्ग बदलून वळसा घालून स्प्रिंगडेलला पोहोचण्यास तीन तास लागले असते. आमच्यासारखे अनेक प्रवासी व पर्यटक मागे परतून जवळपासचे हॉटेल शोधत होते. आम्हीही तेच केले. रात्री एका शेतावरच्या फार्म हॉटेलवर मुक्काम केला. ‘कंट्री म्युझिक’ ऐकत शेकोटीजवळ बसलो. नंतर खोलीच्या बाहेर पायऱ्यांवर – बसून सुंदर चांदणे अंगावर घेतले. आकाशगंगेचे दर्शन घेतले. इंग्लंडच्या पाहुण्यांना अमेरिकेच्या निसर्गरम्यतेचा वेगळा अनुभव मिळाला. ‘झायॉन’च्या ‘भव्य’त्वाची प्रचीती मग दुसऱ्या दिवशी वेगळ्या मार्गाने जाऊन घ्यावी लागली. काही भाग सोडला तर उरलेल्या सर्व ‘झायॉन’ पार्कचा अनुभव पाहुण्यांनी घेतला. प्रत्येक भागाचे दर्शन त्यांना ‘आश्चर्य’चकित करीत होते. आमची ही झायॉनानंदाची पाचवी-सहावी सफर असेल. पण दरवेळी होतो तसा ‘आ’ वासण्याचा आनंद तेवढाच प्रत्ययकारी आणि ‘कर माझे जुळती’ची प्रचीतीही!

विद्या हर्डीकर सप्रे

(पूर्व प्रसिद्धी: लोकसत्ता , नोव्हेंबर 15, 2015)

निसर्गाचे रुणझुण गाणे

गाडी महामार्गावरून धावते आहे. दोन्ही बाजूला बदाम, संत्र्या-मोसंब्याच्या, पिस्त्याच्या फळबागा मैलोन् मैल पसरलेल्या. कॅलिफोर्नियातल्या दुष्काळाचे सावट पडून मधली काही मैलांची फळबाग वाळून गेलेली. मन विषण्ण करणारी.
हळूहळू उंच वनराजी डोकावू लागते. गाडी थांबते. खिडकीतून हसरा, प्रेमळ, खाकी गणवेशातला रेंजर आमचे प्रवेशपत्र पाहतो. आमचे स्वागत करतो. हातात नकाशा आणि वर्तमानपत्रासारखी दिसणारी मार्गदर्शिका देतो. आम्ही पुढे निघतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच सूचिपर्णी वृक्षांचे दाट जंगल. कुठे लहानशी सपाट कुरणाची हिरवाई.. बालकवींची आठवण देणाऱ्या निजबाळांसह बागडणाऱ्या सुंदर हरिणी हिरव्या कुरणी. मधेच बाजू्च्या टेकाडावरून दर्शन देणारी सवत्स अस्वलीण.गाडी विसावली. आम्ही पाऊलवाट धरली. ‘तो वारा फिरतो शीळ मुक्त घालतो’ अशी शंकर रामाणींच्या कवितेची आठवण देणारी! वाऱ्याच्या सुरात आता पाण्यानं ताल धरला आहे. वृक्षराजीच्या हिरव्या सतारी गुणगुणत डोलताहेत. त्यावर उन्हाचा कवडसा आणि पाण्याच्या तुषारांची इंद्रधून! समोर आहे योसेमिटीचा तीन-ताली प्रपात.. निसर्गाचं रुणझुणतं गाणं. हजारो वर्षे निसर्गाचे बदलते ऋतू या मैफलीत रंगून गेले आहेत. प्रत्येक बदलता ऋतू या संगीतवृंदाला नवनवीन चैतन्याचा साज चढवतो.योसेमिटी राष्ट्रीय उद्यान- योसेमिटी व्हॅली आणि ११०० चौरस मैलाचा हा अफाट परिसर म्हणजे साक्षात् चैतन्य आहे. दोन तासांपासून दोन हजार वर्षे आयुष्य असलेल्या फुले, पाने, झाडे, पक्षी, प्राणी, किडेमकोडे अशा अनेक सजीवांचं हे जीवनचरित्र आहे. कुणी त्याला म्हटलं आहे-‘Vibrant Tapestry of Life’!

काही हजार वर्षांपासून या अनाघ्रात परिसराला माणसांचा स्पर्श होऊ लागला. त्यांना ‘या वस्त्राते विणतो कोण’ असा प्रश्न कदाचित पडला असेल का? योसेमिटीच्या परिसरानेही येणाऱ्या माणसांना बदलले आहे. अवानिची ही अमेरिकन इंडियन (आपण ‘रेड इंडियन’ म्हणतो.) जमात इथे प्रथम आली असावी.१८०० च्या समारास युरोपियन्स येऊ लागले. त्यांनी घोडय़ावरून या प्रदेशातल्या वाटा शोधल्या, तशीच सौंदर्यस्थळेही! काही इथल्या भव्य, सुंदर कातळी पहाडांनी स्तिमित झाले. इथल्या जित्याजागत्या निसर्गाचं विराट रूप त्यांना दिपवून गेलं. त्यांनी लेखक आणि चित्रकारांना बोलावलं. वर्णनं चित्रित केली व जगाला या परिसराची ओळख करून दिली. कोणाचातरी गैरसमज झाला की ‘योसेमिटी’ हा शब्द म्हणजे रेड इंडियन जमातीचे नाव आहे. त्यानं या परिसराला नाव दिलं- ‘योसेमिटी’!काहीही असो- या परिसरात नवे लोक येऊ लागले. सर्वच सौंदर्यपूजक नव्हते. काही सुवर्णपूजक होते. त्यांना इथली वृक्षराजी म्हणजे सोन्याची खाण वाटली. जंगलतोड सुरू झाली. काहींना अक्षरश: सोन्याची खाण सापडेल असे वाटले! मग अनेक अर्थानी ‘गोल्ड रश’ सुरू झाला. याला वाली कोण? या मनुष्यधाडीपासून या सुंदर परिसराचं रक्षण कोणी करायचं? अनेक रक्षणवादी आणि निसर्गप्रेमींनी गाऱ्हाणं मांडले आणि १८६४ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी योसेमिटीची संपूर्ण दरी व

भव्य परिसर कॅलिफरेनिया राज्याकडे सुपूर्द केला. त्याआधीच इथे एका हॉटेलच्या व्यवस्थापनासाठी नेमलेला तिशीतला जॉन म्यूर नावाचा तरुण या परिसराच्या प्रेमात पडला. खूप भटकला. नकाशे तयार केले. लेख लिहिले. राज्याच्या तुटपुंज्या पैशातून या परिसराचं संरक्षण करण्यापेक्षा अधिक काही महत्त्वाचं घडावं असं त्याला वाटलं. ही नुसती राष्ट्रीय संपत्ती नाही, तर तो राष्ट्रीय विसावा आहे असं त्याला वाटे. त्यानं भव्य स्वप्न पाहिलं की, जागोजागी अशी निसर्गमंदिरं.. राष्ट्रीय उद्यानं व्हावीत! त्याच्याच शब्दात सांगायचं तर- Thousands of tired, nerve shaken, over civilized people are beginning to find out that going to mountains is like going home. Wilderness is necessary.

अखेर या द्रष्टय़ाच्या प्रयत्नांना यश आले. १८९० साली बेंजामिन हॅरिसन या अमेरिकेच्या अध्यक्षांनी हा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केला आणि कायद्याचे शिक्कामोर्तब केले. कॅलिफोर्निया राज्याकडून ते मध्यवर्ती सरकारकडे पुन्हा गेले. अमेरिकन संरक्षण खात्याने सैनिक नेमून त्याचे संरक्षण आणि प्रगती सुरू केली.

जॉन म्यूर इथेच थांबला नाही. त्याने नंतरचे अध्यक्ष थिओडर रुझवेल्ट यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना हे उद्यान पाहण्याचे निमंत्रण दिले. १९०३ मध्ये अध्यक्ष आले. त्यांनी तीन रात्री तंबूत राहून या परिसराचा परिसस्पर्श अनुभवला. जॉन म्यूर आणि रुझवेल्ट यांची भेट म्हणजे दोन निसर्गप्रेमी दार्शनिकांचीच भेट! त्यानंतर रुझवेल्ट यांनी अमेरिकन लोकांसमोर एका भाषणात सांगितले, National Parks are for the benefits and enjoyment of the people.’ आज अमेरिकेत सुमारे ४०० राष्ट्रीय उद्याने आहेत. एकटय़ा योसेमिटी राष्ट्रीय उद्यानाला चार दशलक्ष लोक दरवर्षी भेट देतात. १९१६ मध्ये सरकारने राष्ट्रीय उद्यान सेवा विभाग (National Park Service) सुरू केला. त्यात २० हजार पगारी आणि अनेक बिनपगारी स्वयंसेवक काम करतात. शिवाय अनेक स्वयंसेवी संस्था या राष्ट्रीय संपत्तीच्या जपणुकीसाठी झटून काम करतात. पगारी वा बिनपगारी असोत- प्रत्येक रेंजर प्रेमाने, आपलेपणाने मदत करतो. निसर्गसहली, मेळावे, मुलांसाठी माहितीचे कार्यक्रम, उद्यानांची स्वच्छता आणि व्यवस्था, अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका, छायाचित्रांचे छंदवर्ग, रात्रीच्या सुंदर नक्षत्रखचित आकाशाची ओळख..

शुभ्र तुरे माळून आल्या

निळ्या निळ्या लाटा

रानफुले लेवून सजल्या

या हिरव्या वाटा..

मंगेश पाडगावकरांची ही कविताच हे रेंजर उलगडून दाखवतात. राष्ट्रीय उद्यान ही अमेरिकेची सर्वागसुंदर संकल्पना आहे. या कल्पनेनं अ‍ॅन्सेल अ‍ॅडम्ससारख्या

जगप्रसिद्ध छायाचित्रकाराला वेड लावलं आणि त्यानं आपलं बहुतेक आयुष्य योसेमिटीला वाहिलं. लिंकन, हॅरिसन, रुझवेल्ट हे तीन अध्यक्ष आणि म्यूर, अ‍ॅडम्ससारख्या स्वप्न-शिल्पकारांच्या प्रयत्नांतून सर्वसामान्य माणसांसाठी उलगडलेलं हे भव्य, सुंदर, जिवंत, सदाबहार महावस्त्र!

अशा कित्येक आठवणी योसेमिटीच्या निसर्गाशी कायमचं नातं निर्माण करून गेल्या आहेत. 2015 मध्ये त्याचा १२५ वा वाढदिवस. . 2014 हे लिंकनने त्यास मान्यता दिल्याचं दीडशेवं र्वष होतं.

यापूर्वीही कितीतरी वेळा इथे येण्याचं भाग्य लाभलं. किती रानफुलं पाहिली. किती सुंदर जागी ट्रेकिंग केलं. आप्तांबरोबर ‘हाफ डोम’च्या साक्षीनं छायाचित्रे काढली. मित्रांबरोबर ग्लेशियर पॉइंटवर अंगतपंगत केली. कित्येकदा ‘मिरर लेक’मध्ये उमटलेली पर्वतांची प्रतिबिंबं पाहिली. अनेकदा आकाशात उमटलेल्या सप्तर्षीचं दर्शन घेतलं. आणि ‘एकच तारा समोर’ असं ध्रुवदर्शन करताना कुसुमाग्रज आठवले. समोरचा तीन-ताली योसेमिटी धबधबा पाहताना ही आठवणींची स्वरधून मनात पुन्हा उमटते आहे. ‘तुझ्या स्वरमेळात माझ्याही क्षीण सुराची एक तान’ असं म्हणणाऱ्या रवींद्रनाथांची कविता आठवते आहे.

विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता ,2015)

जलतरंग

परवा परवाची गोष्ट! मी एका कंपनीत काही माहिती मिळवायला गेले होते. मी वाट पाहत बसले होते. माझी तिथल्या माहिती विभागाच्या कोणाबरोबर तरी गाठभेठ ठरली होती. ठरल्या वेळी बाहेर आली शेलाटी, हसऱ्या डोळ्यांची.. ”हाय, माझं नाव पॅट!” तिनं ‘शेकहँड’साठी हात पुढे केला आणि एकदमच आम्ही दोघी एकमेकींकडे पाहत म्हणालो, ”ओ, हाय! व्हाट आर यू डुइंग हीअर?” आणि मग आम्ही एकमेंकींना मिठीच मारली आनंदाने!
मला तब्बल पाच वर्षांनी पॅट भेटली अशी अनपेक्षितपणे! माझ्या मनात आठवणी जाग्या झाल्या! खरं तर अलंकारिक भाषेत ‘आठवणींचे जलतरंग’ उमटले! मी पाहिल्याक्षणी तिला ओळखलं नाही. कारण मी पूर्वी तिला फक्त पोहोण्याच्या कपडय़ात पाहिलं होतं! शर्ट-पँटमध्ये पाहिलं नव्हतं फारसं!
गेल्या पाच काय, खरं तर आठ वर्षांत पॅट फारशी बदलली नव्हती. हो. आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. घाईघाईत काहीतरी करताना धडपडले आणि गुडघा दुखावला

डॉक्टरांनी निदान केलं-‘मिनिस्कस फाटलं!’ आता ‘मिनिस्कस’ नावाचा अवयव मी कधी ऐकलाच नव्हता. पण गुडघ्याच्या सांध्यात ‘डोनट’च्या आकाराचा हा स्नायू असतो खरा! मग व्हायचे ते सगळे ‘सर्जनी’ सोपस्कार झाल्यावर कोणीतरी मला सुचवलं, ‘वॉटर थिरपी’ घे.. चांगली तुझ्या गुडघ्याला.” ‘. ट. उ. अ.’ नावाच्या संस्थेत पोहण्याचा तलाव असतो आणि तिथे ‘वॉटर अ‍ॅरोबिक्स’चे क्लासेस असतात हे समजल्यावर मी घराजवळच्या ‘. ट. उ. अ.’मध्ये नाव नोंदवलं. सकाळी सातपासून हे ‘जल’द व्यायामाचे वर्ग होते. मला सोयीची वेळ- तास झाल्यावर परस्पर कामाला जाणं वेळेत बसलं. आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षे मी पॅटच्या तासाला जात राहिले. माझा पायच नव्हे, तर फार वेळ बसून बसून कुरकुरणारी पाठही सरळ झाली!

शास्त्रीय परिभाषेत नाही, पण साध्या शब्दात सांगायचं तर घामाघूम होण्यापर्यंत दमवणारा व्यायाम म्हणजे ‘अ‍ॅरोबिक’ होय. त्यात हृदयाचे ठोके जलद पडतात, वगैरे! उडय़ा, पळणे असं काही काही! जे ‘स्थळी’ ते ‘जळी’- म्हणजे पाण्यात केलं की त्याला ‘वॉटर अ‍ॅरोबिक्स’ म्हणजे ‘जल’द व्यायाम म्हणायचं. जलोपचारांतला हा ‘जल’द उपचार म्हणायचा. ‘पाणी’ म्हणजे जादूगार.. किमयागार! हृदयाचे ठोके न वाढता, फारसं घामाघूम न करता हृदयाचा रक्तपुरवठा वाढवणारा, कॅलरीचा साठा जाळणारा व्यायाम पाण्याच्या अनोख्या जादूमुळे करता येतो. हा व्यायाम कमरेइतक्या पाण्यात उभं राहून करता येतो. पोहणे येण्याची आवश्यकता नसते. पाण्यात वस्तूला उचलून धरण्याची किमया आणि (बॉयन्सी- ) तरीही हालचालींना विरोध करण्याची जोरकसता एकाच वेळी! त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते. शरीराचा तोल सांभाळण्याचं कौशल्य वाढतं. हात-पाय-मेंदूचं सांघिक काम सुधारतं. स्नायूंची लवचिकता वाढते- आणि आरामही! शिवाय हाडं बळकटीला मदत होते. पाण्यातून बाहेर पडल्यावर शरीर आणि मन हलकं, ताजं, टवटवीत होतं. स्नायूंच्या वेदना शमतात.
पाण्यात पडण्याची भीती नसते आणि
बॉयन्सी- मुळे लठ्ठ माणसालाही हालचाल सोपी वाटते. थोडक्यात, ‘एका दगडात थवा’ किंवा ‘एका खडय़ात अनेक जलतरंग’ म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच की काय, जलोपचार, जलदोपचार ‘योगा’ आणि ‘ताय ची’ (Tai Chi) हा प्रकार या सर्वावर ‘अमेरिकन आथ्र्रायटिस फाऊंडेशन’ या संस्थेने, अस्थिरोगतज्ज्ञांनी आणि मज्जासंस्थातज्ज्ञ (न्यूरो सर्जन्स) यांनी आशीर्वादाचे शिक्कामोर्तब केले आहे. पाण्यातल्या योगासनांना ‘जलयोग’ (वॉटर योगा) आणि पाण्यातल्या ‘ताय ची’ला ‘अ्र उँ्र’ म्हणतात. पार्किन्सन्स म्हणजे कंपवात, मल्टिपल स्केरॉसिस हा मज्जासंस्था/स्नायूंचा आजार, स्ट्रोक-म्हणजे अर्धागासारखे प्रकार, हाडेमोडी आणि अनेक प्रकारच्या अपघाती दुखापती या सर्वासाठी हे जलोपचार आणि व्यायाम असतात.
२००८ मध्ये अमेरिकन आरोग्य खात्याने या सर्व फायद्यांत आणखी काही नोंदींची भर घातली- ‘जलदोपचाराने रक्तदाब म्हणजे ‘ब्लड प्रेशर’ कमी होऊ शकते.. शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढणारे ‘लॅक्टिक अ‍ॅसिड’ कमी होण्यास मदत होते. एकंदरीत या ‘आखूड शिंगी, बहुगुणी, बहात्तर रोगांवर अक्सीर इलाज’ इ. उपचारांबद्दल मला काहीही माहिती नसतानाही मी तीन वर्षे पाण्यात डुंबून मजा केली ती ‘पॅट’मुळे! ही माहिती मला समजली तीही पॅटमुळे. आणि त्याहीपूर्वी मी काही फायदे अनुभवले ते तिच्याचमुळे! शिवाय मला ४०-५० नवीन मैत्रिणी मिळाल्या, ही पाणी आणि ‘जलतरंग’ उमटवणाऱ्या पॅटचीच देणगी! सकाळी सात ते आठचा तास. पॅट येते ती किलबिलत, हातात ‘बूम बॉक्स’ म्हणजे गाणं वाजवणारी कोणतीतरी पेटी घेऊन! (सी. डी. प्लेअर- कॅसेट प्लेअर.. असलं काही!) पाण्यात चाळीसेक विविध वयाचे, आकारांचे विद्यार्थी! पॅट पाण्यात उतरून आधी हातापायांचे व्यायाम करायला लावते. मग सरळ सांघिक कवायतींचे प्रकार! हास्यविनोद, गप्पा.. आणि एक साथ- वन् अँड टू अँड.. अशा सूचना. तास कसा संपतो ते समजत नाही. प्रत्येकीला ती नावानं ओळखते. कोणी आलं नाही की ‘बरी आहेस ना?’ म्हणून फोन करून चौकशी! दरमहा वाढदिवस साजरे. तास संपल्यावर सर्वानी (कुडकुडत) एका खोलीत जमून केक कापायचा. कोणी खाऊ करून आणत, तो वाटून खायचा- मजा करत! आमच्या वर्गातल्या सर्वात मोठय़ा- म्हणजे ९० वर्षांच्या बाईचा वाढदिवस साजरा करताना विशेष मजा! तेव्हा पॅटचं वय समजलं- ६८ वर्षे!
तलावातलं पाणी कोमट असतं. पाण्यात शिरताना फार बिचकावं लागत नाही. क्लोरिनमुळे आमचे ‘स्विम सूट्स’ म्हणजे ‘जल’कपडे फार ‘जल’द फाटून (दोन महिन्यांत) जात. बाजारात स्वस्त ‘सूट’ आले की सगळ्या एकमेकींना वार्ता देत. तास संपल्यावर आंघोळीचा हमामखाना सार्वजनिक! एका खोलीत २५ शॉवर्स टांगलेले! अपंग, सुरकुत्यांचं जाळं असलेल्या, काही थुलथुलीत, काही शस्त्रक्रियांचे ओरखडे अंगावर वागवत.. सर्व प्रकारच्या स्त्रिया- माणसांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. धडधाकट शरीराचं वरदान मिळाल्यानं भाग्यवान वाटू लागलं. ‘अनुकंपा’, ‘कृतज्ञता’ या शब्दांचे अर्थ जरासे समजू लागले.
अपंग लोकांना तलावात उतरण्यासाठी यांत्रिक खुर्चीची सोय असते. एकदा त्यावरून एक २५ वर्षांची मुलगी खाली उतरवली. बरोबर तिची आई. मुलीला धड बोलता येत नव्हतं. पाण्यात काहीही करणं तिला कठीण होते. त्यामुळे विषण्ण होऊन, अगतिकपणे ती चिडचीड करत होती. दोन महिन्यांनी तिला एखादी गोष्ट जमू लागली तेव्हा तिनं तिच्या परीनं हसून तो आनंद साजरा केला. आम्ही सर्वानी उत्साहानं टाळय़ा वाजवल्या. घरात एकटी असताना ही हसतीखेळती मुलगी धडपडली आणि डोक्यावर आपटली. ‘९११’ या फोनसेवेला फोन करण्यासाठी ती उठू शकली नाही. वेळीच मदत मिळाली नाही. परिणामी मेंदूला रक्तपुरवठा मिळाला नाही.. किंवा असंच काही. मुलगी लुळीपांगळी झाली! तिची कथा ऐकताना हळहळ वाटली. अशा अनेक गोष्टी.. आमचं सर्वाचं एक कुटुंब झालं होतं!

या पाण्यानं तीन वर्षांत मला नुसतंच बरं केलं नाही, तर ‘जीवन’गाणं शिकवलं! नंतर आम्ही घर बदललं आणि माझा तो ‘जीवन’बंध सुटला. परवा पॅट भेटली आणि ते सगळे ‘जलतरंग’ मनात उमटले!

विद्या हर्डीकर-सप्रे

(पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता , 3 मे 2015)

दुष्काळ फार झाला, पाणी जपून घाला

कॅलिफोर्नियाच्या प्रथमदर्शनाने प्रत्येक माणूस दिपून जातो. मैलच्या मैल मुक्तमार्ग (फ्री वे) आणि त्यांच्या मध्यभागी बहरलेले फुलांचे ताटवे, त्यांच्यावर पाण्याचे शिडकावे करणारे स्प्रिंकलर्स, हिरवीगार गोल्फची मैदाने, बदाम, संत्री, मोसंबीच्या वनराया. सुबत्ता, मुबलकता आणि ऐश्वर्याची किनार. संपूर्ण राज्याला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला सुवर्णमय (गोल्डन स्टेट) कॅलिफोर्निया! पंधरा-वीस इंच वार्षिक पाऊस पडला की सारे खूश! आणखी पाऊस पडून करायचे काय? हवाईचं काही कौतुक नाही. उंच, दाट झाडांचं घनदाट जंगल तर नकोच नको! हॉलीवूडचं रेड कार्पेट आणि गोल्फसाठी असलेली मनुष्यनिर्मित ग्रीन कार्पेट यामुळे सारेच मजेत! त्यामुळे चार-पाच वर्षांपूर्वी या राज्यात पाऊस कमी पडला तेव्हा आम्ही चक्क छत्र्याबित्र्या अडगळीत टाकल्या. आणि गव्हर्नरने सांगितलं- ‘पाणी जपून वापरा यंदा!’ तर सगळं हसण्यावारी नेलं! कोणी विचारलं तर थट्टेच्या स्वरात ‘अहो, आमच्याकडे कसली पाणीटंचाई? म्हणजे रोज गाडय़ा धूत असाल तर आता आठवडय़ातून चारदा धुवा फक्त!’ असं म्हणून उडवून लावलं जायचं. त्यानंतरच्या वर्षीही पाऊस कमी पडला तेव्हा पावसाची थट्टा सुरू केली. ‘अहो, कॅलिफोर्नियाचा पाऊस ना? धो-धो पडेल सांगतात तेव्हा उगाच झिरमिळतो. बोलूनचालून हे मूळचं वाळवंट! पाणी घालून घालून इथे हिरवे मळे बहरतात. पण क्या बात है! अहो, अख्ख्या देशाला बदाम पुरवतो आम्ही! आणि आमच्या संत्र्यांच्या झाडांना बहर येतो तेव्हा सबंध कॅलिफोर्निया घमघमतो.’  त्यामुळे पाऊस कमी झाला तरी लोक मजेत होते. फुलं बहरत होती. वणवे लागून जंगलं भस्मसात होत होती. फळांच्या बहराने फांद्या वाकत होत्या. धरणातील पाण्याची पातळी वेगानं कमी होत होती. एक-दोन ठिकाणचे ‘डिसॅलिनेशन प्लँटस्’- म्हणजे समुद्रजलापासून उपयुक्त पाणी तयार करण्याचे कारखाने छत्र्यांसारखेच दुर्लक्षित होते.

तीन वर्षे उलटून गेली. बातम्यांवरून कळू लागलं, की कॅलिफोर्नियात दुष्काळ पडतो आहे! चर्चा सुरू झाल्या. वर्तमानपत्रे रकाने भरू लागली. शास्त्रज्ञ, राजकारणी, अर्थतज्ज्ञ सर्वाच्या दुर्बिणी कॅलिफोर्नियाकडे वळल्या. कोणी तज्ज्ञ म्हणाले, ”कॅलिफोर्निया हे जगातलं सर्वात मोठं जिओ-इंजिनीयरिंग प्रोजेक्ट. पण त्यात एक जीवघेणी फट आहे. इथलं पाण्याचं चक्र कसं चालतं त्याची कल्पना कुणाला नाही. पाणी पडतं ते वाहून समुद्राला मिळतं. आता तुमची आशा आहे ती म्हणजे समुद्रच! तेव्हा उघडा ही डिसॅलिनेशन प्लँट्स. बांधा नवीन काही; नाहीतर आणखी काही वर्षांनी कॅलिफोर्निया कसा दिसेल? आता मंगळावरचा फोटो दिसतो तसा!”

गेल्या वर्षांपासूनच घराघरात या चर्चा पोहोचू लागल्या आणि नकळत पाण्याचे नळ सोडताना बारीक धार पडू लागली. नवी घरे बांधताना बाथरूममधल्या फ्लशमध्ये कपात करण्याची तंत्रे वापरली जाऊ लागली. हिरवळीला पाणी घालण्याचे स्प्रिंकलर्स बारीक होऊ लागले. ठिबक सिंचन- म्हणजे ड्रिप इरिगेशनचे तंत्र वापरले जाऊ लागले. सांडपाणी पुनर्वापराच्या तंत्रांचा विचार होऊ लागला. काही ठिकाणी नवी घरे बांधण्यावरच बंधने घातली गेली. प्रत्येकाने रोज लिटरभर पाणी वाचवलं तरी ३९ दशलक्ष लिटर पाण्याची बचत होते! काहींनी शॉवरसमोर घडय़ाळं लावून पाणी कमी कसे वापरावे, याचे प्रयोग करून पाहिले. रेस्टॉरंटमध्ये पाण्याचे मोठ्ठाले ग्लास भरले जात. आता विचारल्याशिवाय पाणी समोर येत नाही असेही काही ठिकाणी होऊ लागले. ‘चला, पाण्याऐवजी बीअर पिऊ,’ असा उपाय आमच्या एका शेजाऱ्याने सुचविल्याचे ऐकले. दुसऱ्या शेजाऱ्याने पाण्याचे पेले इतके छोटे केले, की त्यात एका वेळी घोटभरच पाणी मावते! आमच्या गृहसंकुलातले काही बहाद्दर सोसायटीच्या सार्वजनिक हमामखान्यात जाऊन स्नान करू लागले. म्हणजे आपल्या घरचं पाणी वाचवलं की झालं, हा सोयीस्कर विचार! ‘अहो, असं करून कॅलिफोर्नियातलं पाणी कसं वाचणार?’ असं म्हणणाऱ्या लोकांना ‘त्यापेक्षा तू न्यू जर्सीत जाऊन अंघोळ कर ना!’ असा सल्ला देऊन त्यांची खिल्ली उडवण्यात आली. एकंदरीत प्रत्येकाने आपापल्या परीने पाणीबचतीची जबाबदारी अंगावर घेऊन पाणीटंचाईवर उपाय सुरू केले.
दुष्काळ केवळ पाऊस कमी पडल्यामुळे येत नाही. नैसर्गिक आपत्ती आणि पाण्याच्या गैरव्यवस्थापनाची मानवी प्रवृत्ती यातून दुष्काळ उद्भवतो. दुष्काळाचे विश्लेषण प्रत्येकजण आपापल्या परीने करतो. हवामान खात्याचे तज्ज्ञ ओलेपणाचा अभाव आणि कोरडेपणा किती काळ राहतो याचा अभ्यास करून निष्कर्ष काढतात. शेतीतज्ज्ञांना पाण्याच्या कमतरतेने शेतीवर होणारे परिणाम, जमिनीवर होणारे परिणाम (मृद्संधारण, इ.), तलावांची घसरणारी पातळी दिसू लागते. अर्थतज्ज्ञांना शेतीचे नुकसान, त्यातून समृद्धीवर होणारे परिणाम असे गुंतागुंतीचे प्रश्न भेडसावू लागतात.

यावर्षीच्या प्रारंभीच गव्हर्नरने कॅलिफोर्निया हे दुष्काळी राज्य असल्याचे घोषित कले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यपातळीवर प्रयत्न सुरू झाले. पाण्याच्या वाहतुकीसाठी पाइप्स टाकणे, इस्रायलकडून डिसॅलिनेशन प्लँटची नवी तंत्रे शिकणे, नवीन प्लँट्स बांधणे आणि राज्यातल्या सुमारे ३९ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून पाण्याच्या कपातीचे आवाहन करणे, असे विविध मार्ग! १ जूनपासून राज्यात २५ % पाणीकपात जाहीर झाली. गावोगावी ग्रामसभा बोलावून लोकांना या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितले गेले. यात ‘स्पेसशिप अ‍ॅप्रोच’ आणि ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिग अ‍ॅप्रोच’ही आला. पृथ्वी (वा कॅलिफोर्निया म्हणा!) ही एक अवकाशयान समजा. अवकाशयानात तेच पाणी पुन:पुन: वापरण्याची तंत्रे असतात. तसे पाणी ‘रिसायकल’ करा, पावसाचे पाणी अडवा आणि त्याचा वापर करा- हा विचार म्हणजे अवकाशयान तंत्राने पाणीटंचाईच्या प्रश्नाला हात घालणे!

अमेरिकेत एखादा प्रश्न सोडवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात. जसे- प्रश्नांचा सर्वागीण अभ्यास, लोकांकडून, तज्ज्ञांकडून सूचना मागवणे, लोकशिक्षण, त्यासाठी प्रथम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.. नंतर सामुदायिकरीत्या प्रश्न सोडवण्यासाठी मदत आणि प्रशिक्षण दिलं जातं. आर्थिक सवलत जाहीर केली जाते. हे सर्व झाल्यावर नियम करून ते न पाळणाऱ्यांना साम-दाम- दंड.. अशा पायऱ्या. यात तसे नवीन काही नाही; पण अशाने कार्यक्षमता नक्की वाढते. लोक नियम पाळतात की नाही, हे पाहण्यासाठी दंडुकेशाही न वापरता लोकांच्या सवयी कशा बदलता येतील, हे पाहिले जाते.
आम्ही आवर्जून आमच्या गावच्या ग्रामसभेस गेलो होतो. सभेला खच्चून गर्दी होती. पाणी खात्याच्या प्रमुखांनी सुरुवात केली- ‘हे पाहा, पाणीकपातीचा नियम तुम्हाला कदाचित आवडला नसेल. मलाही तो आवडला नाही. पण सर्वानी तो पाळू या..’ अशा गोड शब्दांतल्या आवाहनाने सुरुवातीलाच त्यांनी सर्वाना आपलेसे केले. लोकांची सहानुभूती मिळवली. एक मात्र आहे- व्यक्तिश: एखादा कायदा मान्य नसला तरी तो पाळण्यासाठी स्वत:च स्वत:वर पहारा ठेवण्याची वृत्ती इथे बहुसंख्य लोकांमध्ये दिसते. मागे जेव्हा ‘ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी सिगरेट ओढायची नाही, धूम्रपानासाठी राखीव जागेत जाऊन ओढायची-‘ असा नियम गावात झाला तेव्हा तो फतवा आमची कंपनीप्रमुख

तोंडात सिगरेट धरून तो वाटत होती. तिला हा कायदा मान्य नव्हता, हे तिने न बोलता सांगितले. पण दुसऱ्या दिवसापासून तिने कामाच्या ठिकाणी सिगरेट ओढणे बंदही केले. हळूहळू सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आपोआप बंद झाले. लोकांना तशी सवय लागली. तर या पाण्याच्या ग्रामसभेतही लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन केले गेले. मग पाण्याच्या वापरासंबंधी सरकारी कार्यक्रमांची माहिती दिली गेली.
*कोणी घराभोवतीची हिरवळ कमी केली तर मदत.
*कोणी कमी पाणी वापरणारे कपडेधुवक- म्हणजे ‘वॉशर्स’ नवे घेतले तर सवलत.
* ‘हाय एफिशियन्सी टॉयलेट्स’ बसवण्यासाठी सवलत.
*पाण्याचा वापर कसा कार्यक्षम करावा यासाठी मोफत सल्ला देण्याची सोय.
ी नव्या स्प्रिंकलर्ससाठी योजना. प्रत्येकाला पहिले २५  स्प्रिंकलर्स मोफत.
*दुष्काळात तगणारी झाडे लावण्यासाठी मदत.
*पाण्याचा कमी वापर करणाऱ्यांना आयकर सवलत देण्याचा विचार.

पाणीपट्टीत वाढ.
*पाणी वाया घालवताना कोणी दिसले तर दिवसाला ५०० डॉलपर्यंत दंड!
या आणि अशा योजनांची माहिती सांगून घरी जाताना प्रत्येकाला एक पाण्याची बादली भेट दिली गेली.
अजूनही आमच्या राज्यात नळाचे पाणी २४ तास येते. ‘पाणी आले, पाणी गेले’ अशी धावाधाव नाही. बादल्या घेऊन रांगा नाहीत की टँकरची वाट पाहणे नाही. बदामाचे नि संत्र्याचे उत्पादन कमी न करता पाणीकपात कशी करावी, यावर विचार होतो. आम्ही तसे मजेत आहोत. पण ‘पाणी हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे’ असे म्हणताना आम्हा कॅलिफोर्नियाकरांना पाणीवापराच्या जबाबदारीची आता जाणीव झाली आहे.

विद्या हर्डीकर-सप्रे ( पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता )

अमेरिकन कोर्टाची पायरी

शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात! भारतात असताना कोर्टकचेरीचा प्रसंगच आला नसल्याने कोर्ट, वकील, आरोपी, साक्षीदार वगैरे शब्दसुद्धा अर्थापुरतेच माहिती! अमेरिकेत मात्र मला चार कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. तेही मी वकील, जज्ज, साक्षीदार नसताना! मी नुकतीच अमेरिकेत

आले होते तेव्हा पोस्टानं एक पत्र आलं. त्यावर लिहिलं होतं, ‘समन्स!’ बापरे! ही काय भानगड? त्या समन्सवर ‘ते पाळलं नाही तर..’ अशा बऱ्याच धमक्या दिलेल्या होत्या. गुन्हेगारी केल्यासारख्या पडेलपणे मी पुढे वाचलं आणि समजलं- ‘ही ज्युरी डय़ुटी आहे. आणि ती अमेरिकन नागरिकांसाठी असते!’ मी तेव्हा अमेरिकन नागरिक नव्हते,

पण ही ‘ज्युरी डय़ुटी’ काय असते, ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याच्या संकल्पनेतून या ‘ज्युरी डय़ुटी’चा जन्म झाला. न्यायाधीशाचा खटल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायद्याच्या चौकटीतला असतो. तर सर्वसामान्य माणूस खटल्याकडे जीवनाभिमुख चौकटीतून पाहतो. रोजच्या जगण्यात आपला दृष्टिकोन काय असतो? आपली मूल्यं कोणती? ज्याला ‘कॉमन सेन्स’ म्हणतात, त्या संवेदनेतून खटल्याचा विचार कसा व्हावा? हे सर्वसामान्य माणसाला दिसतं. थोडक्यात- खटला, आरोपी इ. बाबत सर्वसामान्य माणसाने दिलेला निर्णय.

आरोपी सुटला म्हणून तो जनतेच्या दृष्टीनं निर्दोष असेलच असं नाही. उलट, कोणी कायद्याच्या कचाटय़ात अडकला म्हणून तो दोषी असेल असंही नाही. या दोहोंच्या चष्म्यातून आरोपीकडे पाहावे व शिक्षा ठरवावी, यासाठी हा ‘पंच’ किंवा ज्युरी मंडळाचा वापर जगातल्या अनेक न्यायसंस्थांनी सुरू केला. भारतातही ब्रिटिश राजवटीत न्यायालयाने ज्युरीचा वापर केला होता. पुढे हा प्रकार भारतातून नाहीसा झाला.
अमेरिकेतील न्यायदानात प्रत्येकाला ‘ज्युरी’ची मदत घेण्याचा हक्क घटनेने दिला आहे. आरोपीला दोषी अथवा निदरेष ठरवण्याचे, दोषी आरोपीला शिक्षा किती द्यावी, हे ठरविण्याचे किंवा खटल्यात नक्की काय घडले, हे शोधून तो तपशील कोर्टाला पुरवण्याचे असे तीन वेगळ्या स्तरांवरचे काम ज्युरी मंडळाला करावे लागते. तुम्ही १८ वर्षांच्या वरचे अमेरिकन नागरिक असाल आणि इंग्रजी समजत असले की झाले! अमेरिकेत बहुसंख्य खटले ज्युरी मंडळाच्या मदतीने चालतात. फारच थोडे ज्युरीविना म्हणजे ‘बेंच ट्रायल’ पद्धतीने चालतात. आता एवढी प्रचंड (?) माहिती मिळवल्यावर ज्युरी डय़ुटीचं ‘समन्स’ पाहून मी “‘वा! आपण फार महत्त्वाचे अमेरिकन नागरिक आहोत! आणि सरकारने फारच महत्त्वाची जबाबदारी दिली तर ती चोख पूर्ण करावी,’ “या उत्साहाने मी ऑफिसात साहेबासमोर ‘समन्स’ नाचवले. त्याने नाक मुरडलं- ‘हं! म्हणजे तू आठ दिवस तरी कामाला दांडी मारणार आणि तुझं काम मला करावं लागणार. वर पुन्हा तुला पगार द्यायचा! तू असं कर- मी देतो ते पत्र त्यांना पाठव, म्हणजे तुझी सुटका होईल.’ आणि मग ‘हिच्यावाचून कंपनीचं काम अडतं..’ वगैरे त्यानं लिहून दिलं. ऑफिसातले बाकीचे काम करणारेही ‘ज्युरी डय़ुटी कशी टाळावी?’

यावर माझं बौद्धिक घेऊ लागले. ‘अगं, तिथे अडाणी माणसांना घेतात!’ ‘तुझ्यासारख्या डिग्रीवाल्यांचं हे काम नाही. तिथं ‘होमलेस’ वगैरे माणसं येतात व दिवसाला पाच डॉलरचा सरकारी भत्ता घेऊन जातात!’ ‘सरळ सांग त्यांना, की मी तेव्हा गावाला जाणारेय, तेव्हा ही डय़ुटी करायला मला वेळ नाही!’ ‘नाहीतर सरळ सिक लिव्ह मार!’ (वा! म्हणजे  तुम्हीही अशी ऑफिसला दांडी मारता वाटतं? मला वाटलं होतं, अमेरिकन लोक भारतीयांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात!)
तीन-चार ‘समन्स’ या ना त्या कारणाने मी यशस्वीपणे परतवली. मग गावातल्या छोटय़ा कोर्टाचं एक दिवसाच्या ज्युरी डय़ुटीचं एक समन्स आलं. ‘अगं, जा ना. कळेल तरी काय गंमत असते! मला ज्युरी डय़ुटी करायची आहे, पण समन्सच येत नाही!’ अशा नवऱ्याच्या आग्रहखातर मी कोर्टात गेले.
एका खोलीत ज्युरी उमेदवारांना कोंबून ठेवलं होतं. एक बाई कोणालाही न कळेल अशा उच्चारात रूक्षपणे सूचना देत होती. जरब अशी, की आपण चुकून गुन्हेगारांच्या खोलीत तर नाही ना आलो, असं सर्वाना वाटावं! इथे दिवसभर थांबायचं तर ‘लघुशंका’ आली तर जाऊ देतात की नाही, या शंकेनंच मला ‘जावंसं’ वाटू लागलं.

आम्हाला गडबड करायला परवानगी नव्हती. चूपचाप आपलं काम, वाचन करत बसायचं. मधूनमधून पुकारा येई. पाच-दहा नावं पुकारत. ‘हाजीर है!’सारखं ‘येस!’ म्हणत पाच-दहा मेंढरं आत जात. ‘त्यांचं काय होणार आत?’ अशी मला उगाचच भीती! जणू काही जज्ज नामे सिंह त्यांना खाऊनच टाकणार! मी चुळबुळत बसलेली. दुपारी १२ ते १ जेवायला ‘सोडलं.’ एकला पाच मिनिटं असताना सर्वानी आलंच पाहिजे- असं फर्मान! मग सर्वाची पुन्हा हजेरी!
तीनच्या सुमाराला आम्हाला सांगितलं गेलं की, ‘तुमची डय़ुटी पूर्ण झाली. घरी जा. जाताना पलीकडल्या खिडकीतून पाच डॉलरचा दिवसाचा भत्ता घेऊन जा!’ त्या काळी अमेरिकेतलं किमान वेतन तासाला पाच डॉलर असताना मला आठ तासांचे फक्त पाच डॉलर्स असं नगण्य वेतन सरकारकडूनच मिळालं. अशा तऱ्हेने पहिल्या ज्युरी डय़ुटीवर शिक्का बसला.
दुसरी ज्युरी डय़ुटी आली काऊंटीच्या कोर्टात! एका मुलीने शॉपिंग मॉलमधल्या एका प्रख्यात दुकानातून ‘शॉप लिफ्टिंग’ केलं होतं. थोडक्यात, ती चोरीची आरोपी होती. यावेळी बोलावलेल्या ५०-६० लोकांना एकदम कोर्टरूममध्येच खेचण्यात आलं. न्यायाधीशानं ठोकठोक करून सर्वाना चूप बसवलं. तंबी दिली- ‘याद राखा.. काही करून बाहेर पडायचा प्रयत्न केलात तर! इथून बाहेर पडलेल्यांना दुसऱ्या कोर्टरूममध्ये हजर राहावं लागेल. ही केस मी एका दिवसात उडवणार आहे! बाकीच्या रूममध्ये सगळ्या आठ-दहा दिवसांच्या केसेस आहेत!’

मग त्यांनी केस समजावून सांगितली. ‘कोणी चोरी केली असेल (म्हणजे कोणावर केस झाली असेल) तर त्यांना ज्युरी होता येणार नाही. त्यांनी बाहेर पडावे. कोणी पूर्वी या दुकानात किंवा त्यांच्या कंपनीत काम केलेलं असेल तर त्यांनाही ज्युरी होता येणार नाही..’  न्यायाधीश महाराज यादी वाचत होते. अर्थात खऱ्या-खोटय़ाची शहानिशा केल्याशिवाय सोडत नव्हतेच. म्हणजे तशी सुटका नव्हतीच! या केसवर काम करून एका दिवसात कोर्टाचा अनुभव, सुटका (आणि भत्ता!) असा एका दगडात थवा मारावा असा विचार होता. पण मी पूर्वी त्या कंपनीत काम केलं होतं. म्हणजे मी या ज्युरी डय़ुटीसाठी योग्य नव्हते. आता ‘खरं सांगू नये नि खोटं बोलू नये’ अशा कात्रीत माझी बाकबूक सुरू झाली. एव्हाना ५० पैकी बाकीचे निघून गेले होते. आम्ही पाचजण शिल्लक होतो. तेव्हा मी सरळ गुपचूप राहायचं ठरवलं. (न्यायाधीशालाही सटकायचं होतं!)
केस सुरू झाली. ती पोरगी निर्ढावलेली होती. पूर्वी चार वेळा तिला चोरीवरून शिक्षा झालेली! शिवाय आम्हाला चार-पाच वेळा तिच्या ‘शॉप लिफ्टिंग’चा रंगेहाथ पुरावा म्हणून व्हिडीओ दाखवण्यात आला. (आता एवढा सबळ पुरावा असताना हा कोर्टरूम ड्रामा कशाला, असा प्रश्न मला पडला.) दोन्ही बाजूंचे वकील क्लिष्ट अशा कायद्यांचा कीस काढत होते. मला पेंग येऊ लागली. पण तरी मी सगळं आज्ञाधारकपणे आणि कर्तव्यभावाने ऐकत होते. दोन तासांनी ‘ठकठक’ करत न्यायाधीश महाराजांनी आज्ञा दिली- ‘आता ज्युरी मंडळानं चर्चा करावी आणि निर्णय घेऊन बाहेर यावं!’

माझा निर्णय झालेला होता. ‘स्वच्छ पुरावा होता. तेव्हा आरोपी दोषी!’ पण अन्य पाचजणांची चर्चा सुरू झाली. एकाच घटनेकडे प्रत्येकजण कसं निरनिराळ्या नजरेनं पाहतो याची ती झलक होती. आरोपीचं वय, वर्ण, तिची उत्तरं द्यायची पद्धत, तिचे शब्द.. एक ना दोन, अनेक बाजूंनी उलटसुलट चर्चा! तो व्हिडीओ त्याच स्टोअरचा की पूर्वीच्या चोरीचा, हा मुद्दा कोणीतरी काढला. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण निदरेष माणसाला शिक्षा होता कामा नये, हा मुद्दाही चर्चेत आला. ज्युरी मंडळाचे सर्व सदस्य आपली ‘डय़ुटी’ अतिशय गंभीरपणे बजावत होते. माझ्यातला सक्षम, कर्तव्यदक्ष ‘ज्युरी’ जागा झाला. ही कोणाला तुरुंगात धाडण्याची केस आहे. आमच्या सहीच्या फटक्यानिशी एका माणसाचं भविष्य बदलणार आहे! (मग ते एका दिवसाचं का असेना!) चांगली दोन तास चर्चा करून, तीन वेळा व्हिडीओ पाहून खात्री केल्यावरच आमचं एकमत झालं. ‘ज्युरी डय़ुटी’चा अर्थ मला तेव्हा खरा समजला!
मला तिसरी ज्युरी डय़ुटी आली ती एका मोठय़ा कोर्टात! ज्युरी निवड कशी चालते, याची कल्पना असल्यानं मी जरा बिनधास्तच होते. माझी पहिल्या फेरीत निवड झाली. पुन्हा ५० जण कोर्टरूममध्ये! समोर आलेली केस खुनाची होती! बापरे! हादरायलाच झालं! न्यायाधीश महाराज एकेकाला प्रश्न विचारून पास-नापास करून निवडत होते. आरोपी समोर बेडरपणे आमच्याकडे पाहत होता. मला मनातल्या मनात चळाचळ कापायला होत होतं. ‘देवा, मला नापास कर..’ अशी मी मनातल्या मनात प्रार्थना करत होते.

यायाधीश महाराजांनी काय विचारलं नि मी काय बोलले, देवास ठाऊक! पण तिसऱ्या प्रश्नाला ‘खून करणं हे पाप आहे!’ असं उत्तर मला सुचलं. माझी तातडीने बाहेर रवानगी करण्यात आली. नंतर दोन रात्री मला झोप लागली नाही. हा माणूस खुनी असला आणि आरोपातून सुटला तर आपल्या मागे लागेल असं वाटत राहिलं.
काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा मला डय़ुटीचं समन्स आलं. पुन्हा कोर्टाची पायरी चढले. हे न्यायाधीश महाराज अजबच! त्यांनी ४५ मिनिटांचा इतिहासाचा तास घेऊन अमेरिका, अमेरिकन नागरिक, सैनिक, युद्धे, त्यांनी देशासाठी केलेला त्याग असं बरंच सुनावून आपल्या देशासाठी ज्युरी डय़ुटी करणं हे कसं महत्त्वाचं आहे, हे पटवून दिलं. मी आज्ञाधारकपणे ज्युरी डय़ुटी करावी म्हटलं. पण तेवढय़ात मला परिणामकारक उत्तर सुचलं, ‘मी सेल्फ एम्प्लॉइड असून डय़ुटी केली तर उत्पन्न बुडेल व माझा पोटापाण्याचा प्रश्न येईल, तेव्हा मायबाप सरकारने तो सोडवावा. मी जन्मभर रोज कोर्टात येईन. कोर्टाचा दिवसाचा १५ डॉलरचा भत्ता ( आता वाढला आहे) मला पुरत नाही!’
माझं उत्तर ऐकून न्यायाधीश महाराजांनी विचारलं, ‘काय आहे तुझा पोटापाण्याचा व्यवसाय?’ मी उत्तरले, ‘मी आठवडय़ातून एक तास योगासनांचे वर्ग चालवते!’  मास्तराने अभ्यासाचं महत्त्व सांगणारं तासभर लेक्चर देऊनही एखाद्या पोरानं ‘सर, मी अभ्यास नाही केला. कारण माझ्या पापणीचा केस दुखत होता,’ म्हणावं, तसं हे माझं उत्तर ऐकून न्यायाधीश महाराज स्तब्धच झाले. पुढच्या क्षणी त्यांनी पुकारा केला- “excused! go home!” 
 -विद्या हर्डीकर-सप्रे, कॅलिफोर्निया     

( पूर्व   प्रसिद्धी: लोकसत्ता)

अमेरिकन नाती गोती

माझ्या अमेरिकन शेजारणी दुपारी चहाला आल्या होत्या. जगभरच्या सर्वच बायकांचा जिव्हाळय़ाचा एक विषय असतो- ‘सासूू’ (म्हणजे विषय जिव्हाळय़ाचा, ‘सासू’ नव्हे!) माझी शेजारीण ‘सू’ (सू- म्हणजे सूझान) म्हणाली, ‘I told my husband the other day! I said, ‘You know , I would be very upset if you bury me next to your mom!’

मी तर ऐकून अवाक् च झाले! एकंदरीतच अमेरिकन नातीगोती मला कोडय़ात टाकतात. इथे विद्यार्थिदशेत असताना एका अमेरिकन कुटुंबात मी राहत होते. तिथे त्यांच्या नातेसंबंधांचं दर्शन मला जरा जवळून झालं! विद्यापीठाजवळच बेवर्ली आणि फ्रँक स्टॅन यांचं चार-पाच खोल्यांचं घर. घरात ते दोघेच. ‘खोली भाडय़ानं घ्या आणि स्वयंपाकघर आमचं वापरा.’ अशी योजना होती. पहिल्याच दिवशी ‘बेव’नं बजावलं, ‘फ्रीजचा हा कप्पा तुझा. माझ्या कप्प्यातलं गाजर समजा घेतलंस, तर त्या बदली दुसरं गाजर दुसऱ्यादिवसापर्यंत आणून ठेवलं पाहिजे!’ आता एका घरात माणसं राहणार म्हणजे एवढा काटेकोर औपचारिकपणा कसा सांभाळणार, हा मला पडलेला प्रश्न! मी सहजपणे म्हटलं, ‘बरं! पण माझ्या कप्प्यातला एखादा पदार्थ तुला चव घेऊन पाहावासा वाटला तर माझी काही हरकत नाही हं! उष्टय़ा हाताचे बोट त्यात बुडवू नकोस म्हणजे झालं!’
एका घरात राहायचं तर टेबलावर ‘आपापलं’ खायचं, हे मला कसंतरीच वाटे. म्हणून मी आग्रहानं माझी मटकी उसळ (‘टेस्टी नटी स्टफ’) इडली (तिच्या मते ‘कार्डबोर्ड स्टफ’) (फ्रँक आणि बेवला खाऊ घाली. मग हळूहळू दोघं जरा अघळपघळ झाली! ‘तुझ्या घरात कोण? माझ्या घरात कोण?’ अशा गप्पा वगैरे सुरू झाल्या. एक दिवस फ्रँकचा भाऊ आला. दुपारी जेवला. परत निघाला! गप्पाबिप्पा औपचारिकच! ”हा राहणार नाही?” माझा भारतीय प्रश्न! ”हो. राहणार ना, दोन दिवस. पलीकडल्या रस्त्यावर हॉटेल आहे, तिथे उतरला आहे!” सख्खा भाऊ आलेला तो हॉटेलमध्ये उतरतो, हे मला अजबच वाटलं!
बेवची आई गंभीर आजारी झाल्याचा फोन आला तेव्हा मी तासाला निघाले होते! पण बेवनं हे सांगितलं आणि मी तिच्या काळजीनं तास बुडवला आणि तिच्याजवळ म्हणून थांबले! ”अगं, आधी विमानाचं तिकीट काढ. बॅग भरायला मदत करते मी तोपर्यंत!” असं म्हणत माझी लगबग चालू होती! ”विमान कशाला? महाग पडेल. मी ट्रेननं जाते. मला स्टेशनवर तेवढं सोड!” इति बेव! मी अवाक्! ‘विमान घेतलं तर आईची भेट तरी होईल! ट्रेननं ११ तास लागतात! आणि आई आजारी असताना पैशाचा कसला हिशेब!’ एवढं बेवर्लीला ऐकवण्याचा ‘प्रेमळ’ हक्क मी एव्हाना मिळवला होता!


शेवट ती ट्रेन घेऊन गेली, पण आईची तिची भेट काही झाली नाही. याची हळहळ मलाच!

”माझी वहिनी इथल्या विद्यापीठात संशोधन करायला येणार आहे एक वर्षांसाठी!” एक दिवस मी आनंदानं बेवर्लीला ऐकवलं! ”वहिनी?- तुला कोण भावंडं वगैरे? विचारलं तेव्हा म्हणालीस, ”फक्त बहिणी आहेत. मग ही वहिनी कोण?” बेवर्लीचा प्रश्न! ”म्हणजे काय? माझ्या चुलत भावाची बायको!” माझं उत्तर! ”मग ती तुझी वहिनी नाही!” असं बेवर्लीचं ठाम उत्तर!
अमेरिकन नात्यात चुलत भावंडं असतात, पण त्यांच्या बायका किंवा नवरे आपले कोणीही नसतात!
भाचे, भाच्या असतात, पण नवऱ्याचे वेगळे आणि बायकोचे वेगळे! ..असे धडे मला हळूहळू मिळत होते!

मग ‘थँक्स गिव्हिंग’चा सण आला. या सणाला अमेरिकी लोकांचा कौटुंबिक मेळावा होतो आणि मुलं, नातवंडं मुद्दाम घरी येतात. अर्थात अमेरिकी कुटुंब म्हणजे नवरा, बायको आणि मुलं, नातवंडं! अन्य नातेवाईक त्यात येत नाहीत. मित्रही नाहीत! स्वाभाविकपणेच मी बेवर्लीला म्हणाले, ”अगं, मी चार दिवस माझ्या (‘माझ्या’वर जोर) वहिनीला भेटायला जाते मग!”
बेवर्ली म्हणाली, ”वा! वा! असं कसं? तू आता ‘घरची’ आहेस. तेव्हा तू ‘थँक्स गिव्हिंग’च्या सणाला घरीच थांबायचं!” मी चकितच झाले! पण छान वाटलं मला!
मग फ्रँक ‘रुटॅन’- त्याची बायको म्हणून ती ‘रुटीन’, त्यांची मुलं (त्याची की तिची, या प्रश्नात मी पडले नाही.) म्हणून आमच्या संगणकीय परिभाषेत लोकल सब रुटीन्स आणि मी चौथं ‘ग्लोबल सबरुटिन’ अशी आमची सणासुदीला पंगत छान रंगली!
बेव आणि फ्रँक म्हणजे रुटॅन आणि रुटीन नंतर एकदा गावाला निघाले. मी म्हटलं, ”काळजी करू नका. मी घर सांभाळीन.” बेव म्हणाली, ”चालेल. मी तुला रोजचे दोन डॉलर्स देईन बिदागी म्हणून. मांजराला खायला घालण्याचा एक आणि संध्याकाळी बाहेरचा दिवा लावण्याचा एक” ”हं?” मी पुन्हा एकदा बुचकळय़ात! मला ही ‘घरची’ म्हणते (माझी मटकीची उसळ हक्कानं फस्त करते!) आणि मांजराला खायला घालण्याचे पैसे कसले देते? आता मी घरात आहे म्हटल्यावर मांजराचं पण करणार नाही का?..

माझं शिक्षण संपलं. मी भाडय़ाची ती खोली सोडली. पण नंतरही ‘रुटॅन’ कुटुंबाशी माझा संवाद सुरूच राहिला. नाताळमध्ये एकमेकांना भेटवस्तू देणे, ‘थँक्स गिव्हिंग’च्या सणाला मी (नंतर नवऱ्यासकट!) ‘रुटॅन’कडे जेवायला जाणे, भेटकार्ड,, वाढदिवसाला फोन.. सगळं!
गेल्या वर्षी फ्रँक बराच आजारी होता, म्हणून आम्ही दोघं मुद्दाम त्यांना भेटायला गेलो! घर अजून तस्संच होतं! दोघं मात्र खूप थकलेले! ”तुझी खोली अजून तुझीच आहे! तश्शीच ठेवली आहे! आज रात्री तुम्ही तुझ्या खोलीतच राहा!” बेवर्लीनं आग्रहानं सांगितलं. आम्हीही हक्कानं राहिलो!
गप्पांच्या ओघात उरलेल्या ‘सब रुटिन्स’ची चौकशी केली. ‘मुलं आपापल्या कुटुंबात गुंतली आहेत. एलिनं एकदा सुट्टी घेतली आठ दिवस. कुरकुरत का होईना, आली मदतीला! बिल आणि एडवर्ड फिरकलेली नाहीत! मधून मधून फोन करून बाबाच्या तब्येतीची चौकशी करतात! भेटायला धावत आलीस ती तूच आणि तुझा नवरा! बेवर्लीच्या डोळय़ांत पाणी होतं!
मला पुन्हा एकदा प्रश्न पडला, ”माझं नि रुटॅन्सचं नातं काय?” 

विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्रकाशन : लोकसत्ता , लोकरंग 23 मार्च 2015)

अमेरिकन शेतकरी

2015 च्या आसपासचे वर्ष. . कॅलिफोर्नियातील एका महामार्गावरून आमची गाडी पळत होती . दुतर्फा “पळती झाडे पाहूया “ अशी बदाम, पिस्ते आणि   फळ झाडे. पण काही भागात मात्र बने च्या बने वाळून पिवळी झालेली! विषण्णा करणारे दृश्य होते.

कॅलिफोर्नियातील दुष्काळाचे  ते दृश्य स्वरूप. पाण्याचा दर परवडो  की न परवडो ; पाणी बंद करून झाडांना मारणे अपरिहार्य झाले होते.   वर्षानुवर्षे मशागत करून जगवलेली आणि सोन्यासारखं पीक देणारी ती बने  मारताना शेतकऱ्याना काय वाटले असेल ?

भारतातील सुके, ओले   आणि कृत्रिम असे सर्व प्रकारचे दुष्काळ; पाणी वाटप प्रश्न; सरकारी मदत; शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा उहापोह;   शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मदतीचे हात, संस्थाचे आणि मदतीचे राजकारण …. असे अनेक विषय डोक्यात येऊन गेले आणि आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिकन शेतकऱ्यांबद्दल कुतूहल निर्माण झालं.  

.

“अमेरिकन शेतकऱ्यांपैकी जवळ जवळ प्रत्येकाकडे शेकडो एकर जमिनी असतात.  आधुनिक यंत्र आणि तंत्रे असतात! समृद्ध देशातील सर्व सुविधा हात जोडून उभ्या असतात.  आणि शिवाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी सवलतींची रेलचेल तर असणारच! तेव्हा समृद्ध अमेरिकेतील शेतकरीसुद्धा समृद्ध असणार.  त्याला कसली चिंता?” असा एक गैरसमज असतो.

   “ अमेरिकेतील शेती म्हणजे सरकारी अंदाजपत्रकातील लठ्ठ गाय “अशी माझीच काय पण अनेक अमेरिकन लोकांचीही समजूत असते.  या समजुतीला धक्का देणारी एक माहिती समजली. ती म्हणजे, अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणाचे स्थान  प्रमाण एकूण आत्महत्यांच्या प्रमाणात सर्वात वरच्या स्थानावर आहे.

दर शंभर हजार शेतकऱ्या तील सुमारे 85 शेतकरी शेतीच्या चिंतेने आत्महत्या करतात!

कोणत्याही व्यवसायातील माणसाला असहाय वाटणारा तणाव (स्ट्रेस) आला  तर आत्महत्येचे विचार डोकावून शकतात. “आत्महत्येच्या सात एक कारणातील एक कारण म्हणजे तणाव आणि चिंता”,  असे तज्ञ सांगतात आत्महत्या हा मदतीसाठी केलेला एक प्रकारचा आक्रोश असतो पण मदत कशी मिळवता येईल हे समजल्यामुळे हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो.  त्या दृष्टिकोनातून पाहिले तर कोणत्याही व्यवसायातील कोणीही माणूस या मार्गाने जाऊ शकतो. मग तो जगातील कोणत्या का देशाचा असेना! .

त्याच प्रमाणे चिंतातूर होण्याची काही कारणे जगातल्या कोणत्याही शेतकऱ्याला लागू पडू शकतात.

उदारणार्थ: १.  उत्पन्नापेक्षा खर्च जास्त म्हणून कर्जबाजारी होणे

                २ . कर्जापायी किंवा अन्य कारणांमुळे जमीन हातची जाणे.

शेतकऱ्याचं   स्वत्व म्हणजे जमीन.  तीच सरकली पायाखालून तर काय उरणार ? शून्य.  कारण शेतकऱ्याची जमिनीशी भावनिक बांधिलकी (म्हणजे emotional attachment)  असते.

स्वत्व गेलं, उत्पन्न गेलं  आणि अन्य कोणतीच अर्थार्जनाची कौशल्य नाहीत . अशावेळी कर्जाच ओझ वाटू शकतं  तस जगण्याचां ओझ वाटू शकतं..

अर्थातच अमेरिकन शेतकरी सुद्धा  या समस्यांना सामोरे जात असतात. एवढेच नव्हे , तर   शेती व्यवसायात आत्महत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.  

त्याची काही कारण मीमांसा करता येते.

उदाहरणार्थ अमेरिकन शेतकऱ्यांकडे  जमीन बरीच असली तरी पैसे बरेच मिळतात असे नाही.  कारण जमिनीच्या प्रमाणात अवजारे, बी बियाणे, जंतुनाशके  हे सर्व लागते. त्यासाठी लागणारे कर्जही मोठे असते.

सरकारी दराच कर्जाचे दर वाढतच असतात त्यामुळे तोही चिंतेचा विषय. कधी उत्पादन अपेक्षेपेक्षा  कमी येते.

कधी उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा विक्रीचा दर  कमी मिळतो. तो ठरवणे अर्थात शेतकऱ्याच्या हातात नसते. त्यामुळे  उत्पन्नात घट होते

शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असतात ते  हवामानात होणारे पराकोटीचे बदल. पृथ्वीचे वाढते तपमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हे एक कारण.   इतर नैसर्गिक आपत्तीही उत्पादनावर अक्षरशः पाणी फिरवू शकतात. त्यामुळे अर्थातच उत्पादन घटते.   अशा घटनांचे अंदाज येत नाहीत म्हणून त्यासाठी तरतुदी आणि योजना करता येत नाही.

अमेरिकेतील आरोग्य सेवा प्रचंड महाग असते.  ती खेड्यात उपलब्धही नसते. त्यामुळे तो खर्च हाताबाहेर जाऊ शकतो.  व्यक्तिगत आरोग्य विमा खूप महाग असतो. कंपनीत काम करणाऱ्या लोकांना हा  विमा स्वस्त दरात मिळतो. त्यामुळे जवळजवळ 75% शेतकरी शेतीच्या बरोबरच . दुय्यम नोकऱ्या शोधतात म्हणजे बिगर शेती उत्पन्नावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात.

कुटुंबातील सगळेच  लोक शेती करतात; म्हणजे त्यांना फक्त शेतीवरच अवलंवबून रहावे लागते.  

20१3 पासून शेती उत्पन्नात  सातत्याने घट होत आहे. 20१३ चे उत्पन्न आज १०१८ मध्ये ३५ % घसरले आहे.  

त्यातून सध्या गाजत असलेल्या आयात करामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दुहेरी भर पडली आहे.  उदाहरणार्थ अमेरिकेने आयात मालावर कर बसवल्याने अवजारे महाग झाली आहेत तर सोयाबीनवर चीनने कर लादल्यामुळे सोयाबीन पिकवून चीनला निर्यात करणारे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत असे प्रश्न अंगावर येऊ लागले की  काही शेतकरी दिवाळखोरी जाहीर करतात. त्या कायदेशीर प्रक्रियेत त्यांची सर्व जमीन सरकार जमा होते.

शेकडे एकर जमीन असलेला शेतकरी भूमिहीन होतो.

1920 च्या सुमाराला आर्थिक मंदीचे संकट होते त्यावेळी आणि  1980 मध्ये शेती प्रश्न इतके गंभीर झाले की शेतकरी निराश होऊ लागले आणि  त्यावेळी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असे आकडेवारी सांगते

आत्महत्या रोखण्यासाठी काही सरकारी प्रयत्न असतात.  तसेच काही संस्थांनी ‘समुपदेशन दूरध्वनी सेवा’ म्हणजे फोन हॉट लाइन सुरू केल्या आहेत.  त्या काही काळ चालतात पण सरकारकडून पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने बंद पडतात. उदाहरणार्थ 2000साली  डॉ. रोजमन या कार्यकर्त्या समुपदेशकाने “sowing the seeds of hope” या नावाची एक मोहीम सुरू केली. त्या मोहिमेचा भाग म्हणून  सात राज्यात मानसिक आरोग्य सेवा देणारे जाळे विणले त्यात समुपदेशन दूरध्वनी सेवा सुरू केल्या. आर्थिक समस्या आणि कोर्टकचेऱ्या यासारखी मूलभूत कारणे शोधून काढून त्यावर घाव घातले की तणाव हा नियंत्रित करता येतो.  परिणामी आत्मघाताने होणारी जीवित हानी कमी करता येते., हे डॉ. रोजमन यांचे म्हणणे. त्यांच्या मोहिमेला चांगले यश आलेही.

परंतु तो कार्यक्रम 2014 मध्ये पैशाअभावी बंद करावा लागला

रोजमनसारख्या अनुभवी मानसशास्त्रद्न्यचे निरीक्षण असे की शेतकऱयांची केवळ  भूमीशी निष्ठा एवढेच नाही तर , ते अन्न आणि वस्त्र निर्मितीचे कामही समर्पित भावनेने करत असतात. अशी मानसिक गुंतवणूक असल्यामुळे  

यातून  पैसे मिळवणे त्यांना अशक्य होते तेव्हा ते मानसिक दृष्ट्या कमकुवत होतात.

तात्पर्य काय तर देश गरीब असो की श्रीमंत ! शेतकऱ्यांचा प्रश्न जगभर असतो.  वातावरणातील बदला (ग्लोबल वॉर्मिंग आलेच) मुळे हा प्रश्न दिवसेदिवस तीव्र होण्याची शक्यता वाढतच आहे !

———–विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्रकाशन : महाराष्ट्र टाइम्स , जुलै २०१८)

केक,आय लव्ह यू !

सांडिएगो शहरातील अगदी भर मध्यावरील ‘पल्स’ या मेरियाट हॉटेलच्या बाराव्या मजल्यावरील खिडकीतून समोर कोरोनाडोचा दिमाखदार पूल दिसतो आहे. समुद्राच्या निळसर चकाकीचा लहान तुकडा देखील ! माझ्यासमोर कॉफीचा वाफाळता कप आणि नुकत्याच आणलेल्या सुंदर केकचा कलापूर्ण कप !……

    तासाभरापूर्वीच आम्ही या केकच्या कलावंत कृती बद्दल, केककर्तीशी गप्पा मारत होतो ! जिल ‘ओ’ कॉर्नर असे तिचे नांव !

    त्याच असं झालं की, ‘कोरोनाडो’ भागा मधील दहाव्या रस्त्याच्या एका कोपऱ्यावर एक पाटी दिसली, “केकची चव चाखा आणि पुस्तकावर केककृतीची सही घ्या – सर्वाना निमंत्रण आणि मुक्त प्रवेश …

     ‘कोरोनाडो’ हे सॅडियागो शहराच्या कुशीतले एक चिमुकले बेट ! निसर्गरम्य, निळ्या सागराने किनारलेले टुमदार घरांची वस्ती आणि पिटुकल्या बागा असलेले ! म्हणजे जणू सर्व वाद्यवृंद तयार होऊन आता प्रेक्षकांसाठी स्वरमेळाचा कार्यक्रम करणार असं वातावरण !

‘टुरिस्टां’ साठी जबरदस्त आकर्षक ‘पर्यटना’ चे मुक्त प्रवेशद्वार !

    सॅडियोगातून हा पूल बांधल्यामुळे प्रवाशांना दहा मिनिटात कोरोनाडोवर जाता येते. ‘कोरोनाडो हॉटेल’ सारखे ऐतिहासिक स्थळ, कोरोनाडोचा इतिहास सांगणारे विनामूल्य प्रदर्शन, अत्याधुनिक सार्वजनिक ग्रंथालय, हर प्रकारच्या वस्तूंची सुबक ठेंगणी दुकाने, सायकलस्वारांसाठी मार्ग, किनारपट्टीवर सर्फिंग, पोहोणे, बोटींगची करमणूक – आणि नानापरीच्या खाद्य पेयांनी सुसज्ज रस्ते – यात प्रवाशांना आणखी खूष करण्यास उन्हाळ्यात बसची विनामूल्य सरकारी सेवा ! आज सकाळपासूनच आम्ही तिकडे बागडत होतो. समुद्रदर्शक खिडकीतून बाहेर पहात दुपारचे सुग्रास जेवण झाल्यावर आम्ही विनामूल्य बसची वाट पाहण्यापेक्षा चालत चालत हे बेट पहावे असे ठरवून डुलत डुलत निघालो ! रस्ता निवांत होता. म्हणजे कॉफीचं दुकानं शोधायचं तर अर्धा मैल चालावं लागेल असं मनाशी म्हणत असतांना एका कोपऱ्यावर ही “केक” चाखण्याची अभिनव पाटी दिसली ! होती एका कलात्मक केशकर्तनालयाच्या दारात ! जरा बिचकत आत गेलो. एका कोपऱ्यात कलात्मक केकचे प्रकार मांडून केकच्या चित्रांचे एप्रन घातलेल्या प्रसन्न मुली केकचे नमुने दाखवून विचारत होत्या “कोणता हवा ?”

    दुसऱ्या कोपऱ्यात टेबलावर “ केक आय लव्ह यू” या नावाच्या पुस्तकाच्या प्रती आणि प्रेमळ अगत्यशील ‘जिल’ पुस्तक दाखवत होती. कोणी विकत घेतले तर स्वाक्षरी करून देत होती ! केकचा समाचार घेऊन मी तिला ‘केक’ सुंदर झाल्याची दिलखुलास पावती दिली! “मी सर्वेक्षण म्हणून विचारते, “या तीन प्रकारातला कोणता जास्त आवडला आणि का? “ तिने माझ्याशी संभाषणाला सुरवात केली. मी वाईनरीच्या गावातली – त्यामुळे ‘वाईन टेस्टिंग’ हा प्रकार मला माहिती. सुवास, स्वाद, जिभेच्या विविध भागांना जाणवलेल्या चवींचे पदर, नंतर रेंगाळणारा सुवास आणि चव…. इ. प्रकारे या ‘टेस्टिंग’ बद्दल बोलता येणे हा. ‘टेस्टिंग तज्ञतेचा मापक असतो अस्सा ‘सा’ लागला. मापकाच्या आधारे मी ठोकून दिले,” ‘मला ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीच्या फळांनी सजवलेला केक आवडला, खातांना ब्लूबेरीच्या मंद चवीची गाज जाणवत होती आणि नंतर हलके हलके केळे आणि व्हॅनिलाच्या लाटा जिभेवर सुरसुरून गेल्या !” केक ला मऊसर वेष्टन होते आणि ते चाखताना लोणी साखरेच्या मधुर गुदगुल्या जिभेला सुखावून गेल्या !……” इ.

     जिल एकदम खुलली. मुळात ‘मऊ लोण्यहूनी असलेली जिल साखर विरघळेल अशी हसली आणि केक- केकचे प्रकार- कृती पुस्तक या बद्दल भरभरून बोलू लागली…

     जिलचा नवरा सैन्यात (नेव्हीत) केव्हातरी ‘कोरोनाडो’ च्या मोक्याच्या बेटावर नेमणूक होऊन दोघे इथे आले. मग कधी जपानला कधी बोस्टनला….. अशी भटकंती करत आता निवृत्तीनंतर कोरोनाडोला छोटसं घर घेऊन इथेच विसावले.

    जिलला स्वयंपाक –पाककृती यांची आवड. साधारणपणे अमेरिकन महिला ‘सोयपूर्णा’ म्हणजे सोययुक्त स्वयंपाकघरे असलेल्या असल्या तरी अन्नपूर्णा नसतात. त्यांचा ‘स्वयंपाक’ म्हणजे काहीतरी ‘फिक्स’ करणं असतं. (लेट मी फिक्स अ सॅडविच फॉर डिनर ! इ. ) त्यामुळे हे मला नवलपूर्णच वाटलं.

    स्वयंपाकघरात विविध प्रयोग करत तिने केक च्या कृती तयार केल्या. मग त्यातून पुस्तक तयार झाले, “केक, आय लव्ह यू !”- लोकांना काही पदार्थ खूप आवडतात काही कमी. त्यामुळे केकच्या पुस्तकाचे तिने पदार्थानुसार भाग पडले. उदा. केळे. – मग त्यात केळ्याच्या केकच्या कृती. प्रथम करायला सोप्या मग गुंतागुंतीच्या…..वेगळेपणामुळे लोकांना हे पुस्तक चटकन घ्यावेसे वाटते. नाहीतर बाजारात केकची हजारो पुस्तके नि गुगलवर हजारो कृती !

     आता हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचावे कसे असा विचार करतांना केशकर्तनालयाच्या संचालिका असलेल्या मैत्रिणीने सुचवले की रविवारी दुपारी दुकान बंद असते. पर्यटकांच्या झुंडी या रस्त्याने जातात, तेव्हा असा पुस्तक स्वाक्षरी-विक्रीचा अभिनव कार्यक्रम करावा ! कादंबरी लिहिणारा लेखक अशा स्वाक्षरी कार्यक्रमात नमुना कादंबरीतले उतारे वाचतो- मग केककृती लिहिणाऱ्या लेखिकेने केकचे नमुने चाखायला द्यावेत !”

    हा अभिनव कार्यक्रम चविष्ट आणि लज्जतदार व्हायला आणि पुस्तक विक्री व्हायला वेळ नाही लागत.

     “केक कृतीच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम/ क्लास केलेस तर मी येईन –कारण ‘बेकिंग’ या प्रकारात मी अनभिज्ञ आहे. मी तिला म्हणाले.- तिला ही कल्पना आवडली….

    जिलने हे सहावे पुस्तक… या आधीची चार पुस्तके गोड पदार्थांना वाहिलेली आहेत, तर एकात गोडाबरोबर काही तिखट, खारे पदार्थ (अर्थात चटकदार आहेत) एका पुस्तकात लहान मुलांसकट सर्व कुटुंबासाठी पाककृती आहेत ! तर एकात ईस्टरसाठी रंगवण्याच्या अंडाकृतीसह अनेक गंमती जंमतीच्या कल्पना !

     आणि हो, एक पुस्तक आहे खास ‘फ्रेंच पेस्ट्री’ बर ! नवलपरीच्या फ्रेंच पेस्ट्रीज म्हणजे फ्रेंच पाकतज्ञ (शेफ) आणि खाद्यतज्ञ यांची खासीयत !

     ‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ हे खरं असलं तरी, ‘साखर खाणाऱ्याला कधीकधी ‘मधुमेह’ होणार हेही होऊ शकतं. त्यामुळे कमी साखरेचे किंवा विना साखरेचे पदार्थ कसे करावे याबद्दलचं जिलचं “स्वीट नथिंग” हे पुस्तकही लोकप्रिय आहे !

     प्रत्येक पुस्तकात सुरवातीला कोणते भांडे कशासाठी योग्य यांचं मार्गदर्शन. कृतीसाठी वापरण्याच्या पदार्थांची माहिती आणि योग्य पदार्थ वापरण्याची माहिती आहे. बारीक सारीक सूचना आहेत. नवशिक्यांना प्रोत्साहन आणि बुजुर्गांना बारकावे सांगणारी तंत्रे !

     पदार्थांच्या सोप्या कृती आधी आणि ते करत करत हळूहळू अवघड वळणे घेत पारंगत होण्याच्या गुरुकिल्ल्या आहेत.

     चुलीवरच्या भांड्यात आधी अंडी घालून मग त्यात हळूहळू साखर मिसळा- उलटे केले तर साखरे बरोबर अंडी जळतात.

     चॉकलेट मध्ये किंचित कॉफी मिसळा आणि लज्जत वाढवा.

     केकचे मिश्रण घट्ट झालेसे वाटले तर गरम पाणी घालत ते पातळसे करा. (गार पाणी नको).

     केकचे फ्रॉस्टिंग एक दिवस आधी करा.

     केक बनवणे अगदी सोपे – पण ‘लेअर’ म्हणजे बहुपदरी केक बनवणं ही कला आहे बरकां !

     आणि फ्रेंच पेस्ट्री बनवणं खर म्हणजे आपला पाय बनवण्या इतकं सोपं असतं- पण फ्रेंच पेस्ट्री बनवून तुम्ही एकदम ‘इंप्रेशन’ मारू शकता !

     अशा खाचा खोचा पुस्तकात जागोजागी दिसतात – आणि सजावटीसह केक आणि पदार्थांची सुंदर छायाचित्रे ! पुस्तकातला प्रत्येक पदार्थ जिलच्या कृतीनं सजीव होऊन तर येतोच पण तो तिच्या ह्रदयातून येतो !

     तिचं पाककृती प्रेम आणि ‘टेंडर लिव्हिंग केअर’ पानोपानी दिसते ! जिलशी बोलतांना सतत जाणवतं की तिचं पदार्थावर, तिच्या खास खास पाककृतींवर अगदी अपत्यवत प्रेम आहे !

    जिलला पाककृतीत  लहानपणापासून रस – त्यात अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे ‘सॅन होजे’ – कॅलिफोर्नियाचा उमदेपणा, अघळपघळपणा व्यक्तिमत्वात उतरलेला !

     मुळात इंग्लिश घेऊन बी.ए झालेली जिल लग्न होऊन नवऱ्याबरोबर  इंग्लंडला गेली ती आपल्या व्यक्तिमत्वाला (आणि रसनेला) पोषक अशा कुकिंग स्कूलमध्ये ! इंग्लंडमध्ये तिला ब्रिटीश पदार्थांमध्येही गोडी वाढली. एका कंपनीत ती मुख्य पाकतज्ञ झाली आणि कंपनीच्या खाद्यपदार्थांचा दर्जा उंचावण्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले. ‘गोल्डन डोअर, स्पा’ या प्रख्यात कंपनीत ती ‘पेस्ट्री शेफ’ म्हणून काम करू लागली.

     व्हाईट हाउसच्या पेस्ट्री शेफ बरोबर शिकण्याची संधीही तिला मिळाली. एवढं सारं ‘मधुर’ करिअर तिनं आपल्या गोजिरवाण्या मधुर मुलीच्या संगोपनासाठी बदललं आणि मग ती संसार सांभाळून पाककृती करणे, पुस्तके लिहिणे, मासिकात लिहिणे हे करू लागली नवऱ्याची फिरती असल्यामुळे आपले स्वयंपाकघर आपल्या पाठीवर घेऊन हिंडता हिंडता तिने ‘पेस्ट्री तज्ञ’ म्हणून पुष्कळ यश मिळवले आणि आता कोरोनाडो या चिमुकल्या बेटावर ती मजेत पेस्ट्री आणि केक लोकांना खिलवते आहे !

     तिच्या पुस्तकातला एकतरी केक करून अनुभवण्याच भरघोस आश्वासन देऊन मी तिचा निरोप घेतला आणि माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी केक बनवण्याचे वर्ग सुरु करण्याचं आश्वासन देऊन जिलने मला प्रेमळ निरोप दिला !

    तो केक घेऊन मी हॉटेलवर आले. मस्त कॉफी बनवली. ..खिडकीशी असलेल्या टेबलावर कॉफी चा वाफाळता कप आहे. समोर कोरोनाडोचा पूल आणि समुद्र ! कॉफीच्या कडवट चवी मागून केक मधल्या बदामाची चव जिभेवर अलगद विसावते आहे आणि केकच्या मधला गोडीचा मुलायम लेप जिभेला सुखावून जातो आहे !

     या केकवर खरोखर शतदा प्रेम करावे !

                                      -विद्या हर्डीकर सप्रे.