आपले आणि परके

शांत, नितळ तळ्यात कोणी दगड टाकल्यावर पाणी ढवळून निघतं, लाटा उसळतात आणि तळाशी असलेली घाण वर येऊन सगळं तळं गढूळतं!

वेगळा दिसला तरी तो आपल्याच देशाचा असू शकतो याचा विचार न करता वंशद्वेषाने आंधळ्या झालेल्या कुण्या अमेरिकनाने भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचिभोतला याला गोळ्या घातल्या आणि ‘तुझ्या देशात परत जा’ म्हणत आम्हा भारतीय अमेरिकनांना मानसिक जखम केली. त्यातून दु:ख, हळहळ, राग, वैताग, भय, आत दडपलेली उपरेपणाची भावना, हतबलता, असुरक्षितपणा, आधारयंत्रणा चाचपून पाहण्याचे प्रयत्न, चिंता आणि चिंतनाच्या बऱ्याच लाटा विविध माध्यमांतून वेगवेगळ्या स्वरूपात उसळल्या.

ही घटना तशी अनपेक्षित नाही. अचानक झालेली नाही. शाळेतल्या ‘वेगळ्या’ दिसणाऱ्या, ‘विचित्र’ नावांच्या मुलांना चिडवणे, मंदिरासमोरच्या गाडय़ांवर ‘गो बॅक टू युवर कंट्री’चे स्टिकर्स लावणे अशा किरकोळ घटना अधूनमधून इथे घडतात आणि नंतर विसरल्याही जातात. १९८० च्या सुमारास न्यूजर्सीत ‘डॉट बस्टर’वाल्यांनी भारतीयांना त्रास देण्याचे प्रकार घडले. 11 सप्टेंबरच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यांनंतर अविश्वासाच्या वातावरणात फेटे घालणाऱ्या शिखांना (आतंकवादी समजून की परके म्हणून?) गोळ्या घालण्याच्या घटना घडल्या. तर २०१२ मध्ये गुरुद्वारावर केलेल्या वर्णद्वेषी हल्ल्यात भारतीय शिखांचे हत्याकांड झाले. या काही ठळक घटना. त्यावर काळाच्या मलमपट्टय़ा होतात. लाटा विरतात. वर आलेली घाण तळाला जाते. पाणी पुन्हा नितळ आणि सुंदर दिसतं. आम्ही भारतीय अमेरिकन पुन्हा निर्धास्त होऊन सुरक्षित, सुस्थापित, संपन्न जीवन जगू लागतो..

स्थलांतराची ओळख आम्हाला बालपणापासूनचीच. कधी नव्या गावी, नव्या शाळेत मिळालेली उपरेपणाची वागणूक आम्ही सहन केलेली असते. तशी  ‘मद्रासी’ महाराष्ट्रात आले आणि त्यांनी  आमच्या नोकऱ्या घेतल्या- या असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांना हुसकावून लावण्याची भाषा आमच्यातल्या काहींनी आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांविरोधात केली होती!

..तेच आम्ही भारतीय नव्या संधी शोधत नव्या आकाशात भरारी मारण्यासाठी किंवा अन्य कारणांनी अमेरिकेत स्थलांतरित झालो. इथे आमच्या शिवाजी महाराजांना कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे पूर्वजांची पुण्याई नि बढाई उपयोगाची नव्हती. आपली लढाई आपणच करण्याची आव्हानं झेलत आपली वाट निर्माण करण्याचे प्रयत्न करणारे, कष्टाळू, शांतताप्रेमी.. कोणी विद्यार्थीदशेतले, कोणी तात्पुरत्या कामासाठी आलेले वा कंपनीने बदली केल्यामुळे आलेले, कायमचे स्थलांतरित- ग्रीन कार्डवाले, जबाबदारीनं कर भरणारे म्हणून नंतर नागरिकत्वाचा हक्क मागणारे.. असे सर्व प्रकारचे भारतीय अमेरिकन!

आम्हाला अमेरिकेत पाठवण्याची आमच्या देशानं सक्ती केली नव्हती. त्यामुळे विस्थापित नव्हे. आम्हाला कोणी गुलाम म्हणून बांधून नाही आणलं म्हणून सन्मानित, जगातील दोन मोठय़ा प्रजासत्ताक देशांत राहण्याचं भाग्य लाभलेले, दोन्ही देशांत सुस्थापित असे आम्ही भारतीय अमेरिकन! नऊ सप्टेंबरला भुईसपाट होणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरने घायाळ होणारे आणि मुंबईत ताज हॉटेलवरील दहशतवाद्यांचा हल्ला पाहताना झोप उडालेले. दोन्ही देशांतील अशा अनेक अभागी घटनांचे खोल पडसाद अनुभवणारे आम्ही भारतीय अमेरिकन!

पण एकदा जन्मभूमी सोडली की आपण कायमच स्थलांतरित. स्थलांतरितांच्या इतिहासाचा आम्हीही एक भाग आहोत. आणि म्हणूनच स्थलांतरितांच्या सर्व प्रश्नांतून आम्हालाही वाट काढावी लागते.

माणसाला जगात कोठेही यशस्वीरीत्या जगण्यासाठी दोन पातळ्यांचे टेकू लागतात : मानसिक साहाय्य यंत्रणा आणि सामाजिक साहाय्य यंत्रणा. अमेरिकेत मराठी, तेलगू, गुजराती लोकांच्या मंडळांची भारतीय अधिष्ठाने निर्माण करून आम्हाला मानसिक आधार यंत्रणा मिळाली. तर सामाजिक आधार यंत्रणेचा टेकू अमेरिकन समाजव्यवस्थेने दिला. अशा समाजव्यवस्थेला समजावून घेऊन तिच्यात सामावून जाण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची जबाबदारी मुख्यत: स्थलांतरितांचीच. काही अंशी ती समाजव्यवस्थेचीही (त्यात शासनही येते!) असते. पण या सर्वाचा समतोल अवघड आणि वेळखाऊ असतो. तो साधण्यासाठी काही पिढय़ा जाव्या लागतात. एकमेकांबद्दलचे अज्ञान, अविश्वास, असुरक्षितता, असूया (उपरे आमच्या पुढे गेले, श्रीमंत झाले, इ.) अशा अनेक गुंतागुंतीच्या भावना परस्परांबद्दल असतात.

उदा. काळे-गोरे हा वंशवाद गेली ३०० वर्षे प्रचलित आहे. २१ व्या शतकातही काळा अध्यक्ष पचवणे अमेरिकन गोऱ्यांना जड गेले. वर्णाने गोरे, पण धर्माने ज्यू असलेलेसुद्धा अजून इथे पूर्णपणे समरस झालेले नाहीत. त्यांच्याही दफनभूमीवर हल्ले होत आहेत.

आम्ही भारतीय तर अमेरिकन वर्ण, भाषा, उच्चार, संस्कृती, अन्न, शिष्टाचार, धर्म- सर्वातच वेगळे. त्यात आणखी भर म्हणजे आम्ही कोणाला मेक्सिकन वाटतो, कोणाला काळे वाटतो, कोणाला मध्यपूर्वेतले आतंकवादी वाटतो. यामागे अज्ञान आणि समजून न घेण्याची बेमुर्वतखोर वृत्ती आणि इतरही कारणे असतील; परंतु परिणामांच्या हल्ल्यातून आम्ही आमची मुलेही वाचवू शकत नाहीत. मग ती मायक्रोसॉफ्ट-गुगलचे पदाधिकारी का असेनात!

मुळात अमेरिका हा स्थलांतरितांचा देश. तोही जगभरातील स्थलांतरितांच्या योगदानामुळे श्रीमंत झालेला. स्थलांतरित म्हणजे पैसे देऊन आणलेली निर्जीव यंत्रे नव्हेत. तीही माणसेच असतात. त्यांच्या मानवी गरजांची देखभाल करणे, किमान त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणे ही शासन यंत्रणेची जबाबदारी असते.

स्थलांतरे जगभर हजारो वर्षे चालू आहेत. पण गेल्या काही वर्षांतील स्थलांतरांचा वेग आणि त्याच्याशी जुळवून घेण्याची सर्व देशांची व समाजांची तारांबळ यांच्या व्यस्ततेचे परिणाम जगभर (उदा. ब्रिटनचे ‘ब्रेग्झिट’) दिसत आहेत. त्यातून एक अस्वस्थता दिसते आणि असुरक्षितताही. देशोदेशीच्या शासनांच्या बदलत्या धोरणांनुसार अशा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी जगातील सर्वच स्थलांतरितांना याउप्पर करावी लागणार आहे.

मात्र, सध्या अमेरिकेत जाणवते आहे ती झुंडशाहीवाद्यांची दडपशाही! प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करून ज्या शासनाचे राज्य सुरू होते त्याची परिणती कशात होते, हे आम्ही भारतीय अमेरिकनांनी १९७५ मध्ये अनुभवले आहे. त्यापेक्षाही भयानक प्रकार जर्मनीत झाले, हे सारे जग जाणते.

‘कोणाला ठार मारले, परक्या दिसणाऱ्यावर अत्याचार केले तर चालते’ अशी शासनाची चिथावणी समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांत वाऱ्यासारखी पसरते. याची भीती मेक्सिकन, मध्यपूर्वेतील शरणागत आणि सुजाण अमेरिकनांनाही आहे. अशांची संख्या जास्त आहे. तेव्हा आम्ही एकटे नाही. परंतु या देशात ४० -५० वर्षे राहिलेल्या भारतीय अमेरिकनांना आजवर कधीच वाटले नाही ती असुरक्षिततेची भावना आज वाटते आहे, हे सत्य! त्यात आताची लाट वेगळी व भयावह आहे. आणखीही अशा काही घटना घडण्याची शक्यता आहे. कारण यामागे अनेक घटनांची, गोष्टींची, त्यांच्या अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि मानवतेच्या परिणामांची गुंतागुंतीची साखळी गुंतलेली आहे.

सध्या जे काही चालले आहे त्यातून नुसतेच तात्त्विक विचारमंथन नव्हे, तर ठोस कृतीचे विचार येथील सोशल मीडिया व संघटनांतून होत आहेत. यातून पुढील गोष्टींवर भर देण्यात येत आहे.. * अमेरिकेत सध्या एकमेकांशी फारसे संबंध नसलेल्या मराठी, बंगाली इ. भारतीय भाषिक मंडळांनी परस्परसंवाद आणि एकजुटीने काम करण्याची गरज. * भारतीय अमेरिकनांनी अमेरिकेच्या संपन्नतेत महत्त्वाचे योगदान दिल्यामुळे त्यांना आवाज आहे. तो वापरून; अमेरिकेत नोकरी करण्यासाठी योग्य व्हिसा  आणि अन्य गोष्टींवर अमेरिकेशी वाटाघाटी करण्यासाठी भारतीय शासनाला  मदत आणि प्रेरणा. * अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात आपले अधिक जोरकस अस्तित्व तथा मंच निर्माण करण्याची गरज. * वंशद्वेष आणि अन्य संकटांत भारतीय नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यासठी वकिलातींची बळकटी. *  अमेरिकन समाजाशी समरसतेसाठी, दुर्बलांच्या मदतीकरता, लोकशिक्षणासाठी आणि अमेरिकन लोकांची अविश्वासाची भावना कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. * शिक्षणसंस्था आणि ‘इंटर-फेथ’ संवाद साधणाऱ्यांच्या कामात सहभाग, लोकशिक्षणासाठी मदत. * भारतीय अमेरिकनांवर घरवापसीची वेळ आली तर अनेक पातळ्यांवर होणाऱ्या तात्कालिक व दूरगामी परिणामांचा व उपायांचा विचार.

हे काहीही असलं तरी ज्या देशाला आपण आपलं म्हटलं, आपलंसं केलं, त्या संपन्न, प्रजासत्ताक, ‘जगा आणि जगू द्या’ ही भूमिका असणाऱ्या देशात कायम भयगंडाने जगणं हे कोणत्याच समाजाच्या हिताचं नाही. दुसऱ्या बाजूला ‘माझ्या देशात संधी नाही म्हणून मला देश सोडण्याची वेळ येते’ असं म्हणण्याची वेळच भारतीयांवर येऊ नये, असा प्राचीन संपन्न भारत कदाचित भविष्यात पुन्हा जन्माला येईलही..

कोणी सांगावं? —-विद्या हर्डीकर-सप्रे

पूर्व प्रकाशन : लोकसत्ता )

पुनः एकदा बाहुलीच्या हौदाची गोष्ट

ती माझ्यासमोर बसलेली . नजर खाली, बोटे सफाईने फोनवर फिरत असतात; आणि एक डोळा समोरच्या मॉनिटर ..वरच्या मजल्यावर झोपलेल्या बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ! अशा एकूण मल्टीटास्किंग मध्ये आमचीही संभाषणाची गाडी पुढे सरकते…. पुढच्या पिढीची ही नवी माणसे ! त्यांचे शब्दप्रयोग वापरत त्यांच्याशी गप्पा मारायचा माझा प्रयत्न..  नवे चेहेरे-नव्या ओळखी- नवे विषय-नव्या गप्पा. तसे मला नवे अनुबंध जोडायला, म्हणजे आताच्या पिढीच्या भाषेत नवी कनेक्शन्स करून ‘व्हाटस् अप’ वर नाहीतर फेसबुकवर त्यांना टाकायला आवडते ! लहानपणी काच कमळासाठी जेवढ्या असोशीनं रंगीबेरंगी बांगड्या गोळा करायला आवडे – तसेच ! त्याचे पुढे काय करायचे हा प्रश्न मात्र अगदी मनाच्या मागच्या कोपऱ्यात गुपचूप उभा असतो.

आता समोर बसलेली ही माझ्या भारतातल्या  मैत्रिणीच्या सुनेची बहीण ! मी आलेली असते भारतातून मुलाकडे लॉसएंजिल्सला आलेल्या माझ्या मैत्रिणीला भेटायला. या मुलीला  कौतुकाने खाली बोलवून माझ्या मैत्रिणीने नुकतीच तिची ओळख करून दिलेली असते. “ही आमच्या चिंटूची मेव्हणी आस्था. अग,  हे लोक तिकडे सियाटल जवळ असतात. सुट्टी म्हणून आले आहेत दोन दिवस.  बोल पाच मिनिट.. आलेच मी” म्हणत माझी मैत्रीण गुडुप!

 “नाव काय म्हणालीस तुझ ?”

“आस्था.”

“वा. वेगळ आणि छान नाव आहे. …बाळही गोड आहे तुझ. फोटो पाहिलेत.  … केव्हा आलात तुम्ही अमेरिकेत ? … कुठली तू मुंबईची का ग? .. आणि करियर, सध्या काय ?….आवडत का या देशात ? …  तुमच्या गावात मराठी मंडळ आहे का ग ? ..  मग जाता का तुम्ही मंडळाच्या कार्यक्रमांना ?…. हो का ?….   अग मग ते अमेक तमके तुमच्याच गावातले. ते भेटले का ?.. नसले तर मी फोन पाठवते तुला. … ” 

      कोणतातरी संभाषणाचा धागा पकडण्याचे माझे प्रयत्न! मधून मधून “कूल” आणि “ऑसम” म्हणायला विसरायचं नाही. यांना आपल्याशी बोलण्यात रस आहे (तरी) का असला प्रश्न गुपचूप सुद्धा मनात आणू न देता “ आम्ही तुमच्या आई बाबा पिढीचे असलो तरी इथले रहिवासी आहोत बरं का ! आम्हीही इथे करियर केलं आहे – चांगली घर दारं नोकऱ्या केल्या आहेत. मराठी मंडळ सुरु करणारे ते आम्हीच बरं का- आम्ही आहोत म्हणून तुम्ही येऊ शकलात- तुम्ही आमच्या खांद्यावर उभे आहात. संभाषणात इ- इ.” शेखी मिरवण्याचा माझा अप्रत्यक्ष आणि (अ) सफल प्रयत्न –

“तुम्ही ? आणि ‘आय. टी’. तल्या ?” मध्येच मान वर करून आस्था विचारते.   “आमचे प्लॅटफॉर्म, बिटफॉर्म शब्द तुम्हाला माहिती दिसतात –की फेकताय काहीतरी “ अशा आशयाची नजर !”

हाताची बोटे बहुदा ‘काय बोअर चाललंय !आता सटकणारे इथून पुढच्या मिनिटाला “असं कोणाला तरी टाईप करत असणार. तेवढ्यात माझी मैत्रीण कॉफी घेऊन बाहेर. आस्था सटकू पहाते. “अग बस ना. तुझी कॉफीची वेळ म्हणून मुद्दाम तुझाही कप घेऊन आले. बाळ झोपल आहे, तर निवांतपणे  कॉफी  पिऊन मग पळ.” “ असं म्हणत मैत्रीण आस्थाला आग्रहान बसवून घेते.” तिला संभाषणात ओढून घेण्यासाठी मैत्रीण मला म्हणते, “ अग तू आनंदीबाई जोशींची समाधी पाहून आलीस ना ? मग आस्थाला दाखव ना फोटो. जरा माहिती असली की तो आनंदीबाईंचा सिनेमा पहायला  उत्साह वाटेल या मुलांना.”               

      – मग मी तो विषय पकडून (बुडत्याला) काडीचा आधार घेत  फोटो दाखवते.  मैत्रीण आस्थाला  कौतुकाने सांगते, “अग आनंदीबाई म्हणजे “फर्स्ट लेडी डॉक्टर फ्रॉम इंडिया बरं का! अग, तुमच्या पिढीला या गोष्टी सांगतच नाहीत. (तुमचा काय दोष !) पण तुम्हाला समजायला हव्यात.!”

आस्था म्हणते, “हो” true !”

      फोटो निरखून बघते. पटकन म्हणते, “मी पहिले काही एपिसोड्स ऑफ  ‘उंच माझा झोका.’  

फोटोतील  जन्ममृत्यू ची वर्षे पहात आस्था उद्गारते,” ओ ! शी वॉज ओन्ली २३ ?”

मी सांगते- “हो ना. पण “ही आनंदीबाई.  ही ‘उंच माझा झोकातली’ नव्हे. तू पाहलेस ना एपिसोड्स  त्या  रमाबाई रानडे ! या आनंदीबाई जोशी.”

मग काय वाटतं कोणास ठाऊक ! तिची उत्सुकता किंचित वाढते आहे हे जाणवून मी उत्स्फूर्तपणे एक दुसरा फोटो दाखवते ! (लेट मी शो यू what’s in my खजिना ! चा भाव खाते ! )

      मला कुणीतरी पाठवलेला आणि मी ती भावना जपून ठेवण्यासाठी whats app च्या कप्यात साठवलेला फोटो – अंगभर दागिने घातलेला सात आठ वर्षाच्या मुलीचा! 

“ओ ! हाऊ क्युट !  हा आनंदीबाईचा फोटो ? लग्नातला ? –इतक्या लहानपणी लग्न होत मुलींची ?”

 “हो. आनंदीबाईंच लग्न असच लहानपणी झालं होतं  पण या फोटोतली मुलगी  आनंदीबाई  नव्हे बरका. या मुलीचं लग्न झालेलं नव्हतं – तेव्हा सगळ्याच समृद्ध घरातल्या मुली-सुना नेहमी दागिने घालत ! फक्त लग्नसमारंभात नव्हे. – “बरका या मुलीचे वडील डॉक्टर होते. ‘विश्राम रामजी घोले’ – १८५० ते १९००  त्या पन्नास वर्षातले! मला नक्की नाही आठवत. पण आठवते ती या ‘बाहुली’ची गोष्ट !  या मुलीचं  नाव काशीबाई.   त्या काळात  मुलींच्या शाळा नव्हत्या. तेव्हा मुलींना शिकवतही  नसत. पण या आपल्या मुलीला  शिकवायचे असे डॉ. घोले यांनी ठरवले  ते समाजाच्या मागास विचारसारणीविरुद्ध बंड करून शिकले होते. पुढे आले होते. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व फार वाटे. त्यातही स्त्रियांना शिक्षण देण्याची विशेष गरज त्यांना जाणवत होती. पण घरचे काही लोक जुन्या विचारांचे.  त्यांना नाही आवडले. पण विश्रामजींच्या पुढे चालेना ! मग नात्यातल्या कोणीतरी या नऊ वर्षाच्या कोवळ्या  मुलीला अन्नातून कुटलेल्या काचा घातल्या – गेली बिचारी.   तिच्या स्मरणार्थ वडिलांनी हौद बांधला- त्याला पुण्यात बाहुलीचा हौद म्हणत- अग, मी रोज त्या हौदावरून जाई ! पण मलाही माहिती नव्हती- त्या मागची ही कथा ! माझा कंठ भरून आला. .. –मी सांगत होते आणि आस्था मान वर करून एकाग्रतेन ऐकत होती !

  • “oh ! so she was sacrificed ! for education ?” आस्था उत्स्फूर्तपणे

म्हणाली आणि एकदम ओक्साबोक्शी रडू आलं तिला ! –

“हो ना. सनातनी समाजाने, आंधळेपणे स्त्री शिक्षणाच्या वेदीवर घेतलेला तो भयंकर बळी होता.” मलाही गहिवरून आल. तरीही मी बोलतच राहिले..    

“we are here today because these women were there yesterday ! we owe them our gratitude and much more!  आपण त्यांच्या खांद्यावर उभे आहोत.” मी बोलत होते – पण पुढे माझ्याने बोलवेना. आम्ही दोघी एकमेकींच्या डोळ्यातल्या आसवात आपली प्रतिबिंब पहात होतो ! –

     माझं आस्थाशी  एकदम, अचानक आणि हळूवार  ‘कनेक्शन’ झालं !

तिनं माझा whats app नं घेतला. email घेतली. मग मला ती खूप प्रश्न विचारायला लागली ! मग मन आवरून मी तिला सांगतच राहिले. “अग, हे वडील इतके निश्चयी होते की –एक मुलगी गेली म्हणून डगमगले नाहीत ! त्यांनी हिच्या धाकट्या बहिणीला शिकवलं. पदवीधर केलं. त्या गंगूबाई. त्या तर पुढे इतक्या मोठ्या झाल्या की त्यांनी परदेशात जाऊन वेद आणि गीता यावर व्याख्याने दिली. आणि बरंका, पुण्यातील पहिली मुलींची शाळा हुजूरपागा – ती स्थापन करण्यात विश्राम रामजी यांचा  मोठा सहभाग होता. मी त्याच शाळेची विद्यार्थिनी.”

-“आपण किती टेकन इट फॉर ग्रँटेड  नाही का ?” आस्था म्हणाली.

“ हो ना ! – पण खरचं हे सर्व तुमच्या पिढीला माहिती पाहिजे ! तुम्हालाच का पण अमेरिकेत  जन्मलेल्या आमच्या मुलांच्या पिढीला सुद्धा हे माहिती पाहिजे. “

“ हो. ट्रू. . सांगता का या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना ? “  

 “ हो. प्रयत्न करतो ग आम्ही. एकदा तर  आमच्या दुसऱ्या पिढीला हे सांगावं म्हणून आम्ही त्याच्या संमेलनात “तेजोमयी” असं पोस्टर प्रेझेटेशन केलं.  ते होत, समाजावर काही ठसे   उमटवणार्‍या; परिणाम करणाऱ्या मराठी स्त्रियांबद्दल !-  ‘तेजस्वी आणि मातृमयी’ म्हणून तेजोमयी.   

आम्हाला त्याचं एक इंग्लिश पुस्तक करायची फार ईच्छा आहे. तस झालं तर  ते त्यांच्या पर्यंत आणि तुमच्या पर्यंतही पोहोचेल. नाही का? “ मी सांगत होते.

-“हो, मला मदत करायला आवडेल. पण माझी मुलगी खूप छोटी आहे. कसं जमेल ? “- आस्था म्हणाली !-

माझ्या मनात सरकन ‘तेजोमयी’ चे दिवस सरकून गेले ! अमेरिकेत आल्यावर पुष्कळ वर्षे मी म. टा. पोस्टाने मागवत असे.  कारण तेव्हा आतासारखं महाजाल नव्हत. त्यामुळे ऑन लाईन  वाचायची सोय नव्हती. त्यातले अरुणा ढेरेचे महाराष्ट्रातल्या स्त्रियांवरचे लेख मी जपून ठेवले होते.

मी हा प्रकल्प करत होते त्यात मी संदर्भ म्हणून तेव्हा ते लेख चाळले. त्यात मला ही  बाहुलीच्या हौदाची गोष्ट सापडली. मला ती अगदी भिडली. म्हणून मी  हीच गोष्ट माझ्या ऑफिसातल्या अमेरिकन बाईला सांगितली – पण ती सांगताना माझ्या डोळ्यात पाणी का आलं ते तिला समजेना !

पोस्टर्सची माहिती सांगताना दुसऱ्या पिढीच्या आमच्या मुली सुरवातीला “हे कशाला” असा मख्ख चेहेरा करून उभ्या- तेव्हा मी त्यांना “आपण यांच्या खांद्यावर उभ्या” हाच मुद्दा सांगितला होता – तेव्हा त्यांना “कनेक्शन” झालं !- एका मुलीनं “झाशीची राणी !- ओ ! दॅटस मी ! – मॉम calls मी झाशीची राणी “- असं स्वतःच connection केलं होतं-

मराठीपण आणखी आणखी पातळ होत चाललं आहे- महाराष्ट्रातील मुलं कोणत्याही भाषेत शिकली तरी त्यांच्यापर्यंत हा इतिहास पोहचत नाही आणि इथलं मराठी connection तुटत आहे ! आपला मराठी इतिहास आणि संस्कृतीशी असलेला दुवा तुटत चालला आहे. ..

– ‘तेजोमयी’ प्रकल्पाला  पंधरा वर्ष उलटून गेली. आमच्या “झाशीच्या राण्या” मोठ्या झाल्या- मुलांना पाठुंगळी बांधून संसार करू लागल्या. मराठी लोकांच्या नव्या पिढ्या इथे येत राहिल्या आहेत. हे आमच्यासारखेच पहिल्या पिढीचे म्हणून की काय अजून महाराष्ट्राशी यांचे अनुबंध –कनेक्शन्स आहेत. आताची मराठी मंडळे हेच लोक चालवतात. त्यांच्या मुलांसाठी मराठी शाळा असाव्यात असं त्यांना वाटतं- आमची ती तेजोमयी ची पोस्टर्स आता आमच्या गावातल्या  मराठी शाळेसाठी  अजून वापरत असतात. पण तेजोमयीची एखादी इंग्रजी पुस्तिका काढावी हा विचार तसाच मागे पडून गेला !

-आज ही आस्था आस्थेनं विचारते आहे- “मी काय मदत करू?”-

-पातळ होणाऱ्या मराठीपणावर कोणीतरी मायेची दाट साय धरतं आहे असं वाटलं !

                                          विद्या हर्डीकर  सप्रे , कॅलिफोर्निया

कहाणी अमेरिकन मराठी प्रवाहाच्या पनाशीची

मंगेश पाडगावकर  यांची एक कविता आहे:

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं | तुमचं  आणि आमचं अगदी सेम असतं.|| 

त्याच चालीवर गावोगावच्या अमेरिकेतील मराठी मंडळाबद्दल  म्हणायचं तर  मराठी मंडळ म्हणजे मराठी मंडळ म्हणजे मंडळ असतं. .. या गावचं की त्या गावाचं अगदी सेम असतं…. म्हणजे मराठी लोक, मराठी मंडळाची गावातली सुरवात, मंडळ लहान असताना बायकांनी स्वयंसेवक गिरी करून केलेले  मंडळाच्या कार्यक्रमाच्या वेळेचे भोजन, आणि पुरुषांनी घरच्या गराजमध्ये खपून रंगवलेले नाटकाचे पडदे, आणि आता नव्या दमाच्या मराठी लोकांनी चालविलेली मंडळाची हाय टेक गादी. म्हणजे संकेतस्थळे, ई दिवाळी अंक, आणि सभागृहे भाड्याने घेऊन केलेले भव्य दिव्य रंगमंचावरचे  पोशाखातले  “कोंबडी पळाली” वगैरे नाच, गणपतीची संगणकीय म्हणजे कॉप्युटर आरती…  गावोगावी तेच. आणि आता मंडळ  हाय टेक झाले तरी गावोगावी तेच  पारंपारिक  मराठी रुसवे फुगवे, मराठी बाणे, कोथिंबीरीच्या काड्यांचे हिशेब आणि वर्गणीदार कसे वाढणार याच्या चिंता.

मराठी  माणसे मोठ्या प्रमाणात अमेरिकेत येऊ लागली साधारण १९७० च्या सुमारास. म्हणजे मराठी  माणसांचा आणि मंडळांचा  हा प्रवाह जवळ जवळ ५० वर्षांचा. 

उत्तर अमेरिकेत चाललेला मराठी माणसांचा प्रवाह ४० वर्षापूर्वी बृहन महाराष्ट्र मंडळा पर्यंत येऊन पोहोचला आणि पहाता पहाता १७ -१८ अधिवेशनेही झाली… अधिवेशन म्हणजे अधिवेशन म्हणजे अधिवेशन असतं | मागच्या वेळेचं आणि पुढच्या वेळच अगदी सेम असतं. || म्हणजे गाणी, नाटकं, लावणीच्या संगीत बाऱ्या, शिवाजी महाराज की जय च्या आरोळ्या, गणपतीची आरती,ताशे वाजंत्री ढोलांचे आवाज, भारतातून रंगीबेरंगी कपडे आणि दागिने घेऊन आलेले दालन उघडून बसलेले दुकानदार,  इकडे तिकडे धावणाऱ्या पारदर्शक साडीतल्या विमुक्त पाठ्दर्शक मैत्रिणी, तीन दिवस तीन त्रिकाळ पेशवाई, कोल्हापुरी, मालवणी जेवणाचे घमघमाट, पुरणपोळी आणि मुख्य म्हणजे साबुदाण्याची खिचडी!      

“यंदा बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन आहे” … अशी प्रस्तावना जेवणाच्या टेबलावर केली जाते, आणि गरम गरम जेवण गार होईपर्यंत गरमागरम चर्चा  चालू रहाते.’  या वादात मराठी विषयक अनेक विषय येतात !

मराठी भाषेतील पहिला शब्द’ याबद्दल ‘गुगल’चं काही का मत असेना; मुळात मराठी भाषा निर्माण झाली तेव्हाचा पहिला शब्द होता चर्चा आणि दुसरा होता वाद!  ( संवाद , परिसंवाद हे शब्द संस्कृत बरंका !) या वादात मराठी विषयक अनेक विषय येतात पण प्रारंभ होतो, “ आपण यंदा अधिवेशनाला जायचे का नाही?” या मुद्द्याने.   

“जाऊ या ना. कार्यक्रम काय मस्त असतात !”

“ काहीतरीच काय, मागच्या अधिवेशनात तो शेवटचा कार्यक्रम किती भिकार होता!”

“गाणी किती सुंदर म्हणतात!”

“ मग त्यासाठी तिथे कशाला जायला पाहिजे ? इथं घरात “अलेक्सा अमेझॉन” ला सांगितलं की तीसुद्धा लता मंगेशकर ची गाणी म्हणते!”

“ तिन्ही त्रिकाळ मस्त जेवण चापायला मिळतं !”

“ मस्त काय, त्या तमक्या अधिवेशनात पुरणपोळीवर तूप सुध्दा नाही मिळालं !”

“ आपली मित्र मंडळी नाही का भेटत ?”

“ भेटतात कसली , नुसतीच  धावताना दिसतात!”

अशी वादावादी वाढतच जाते. कारण एक शिवाजीमहाराज सोडले तर मराठी माणसात कोणाबद्दल आणि कशाबद्दल एकवाक्यता नसते म्हणे. ( नवराबायकोच्या बहुमतात पास होणारे दुसरे कदाचित ‘पु.ल.’ असावेत असा अंदाज आहे.)

आमच्याही घरी अशाच ‘सेम’ चर्चा करताना लक्षात आले की  अमेरिकेतल्या मराठी माणसांचा गेल्या 40 -५० वर्षाचा आढावा घेऊन कोणी त्यावर पुस्तक लिहिलेले नाही.  तसे पुस्तक लिहिणे हे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही आवश्यक आहे.  म्हणून मी आणि माझ्या नवऱ्याने  (अशोक सप्रे) एकमताने  अमेरिकन मराठी: जन , मन, अधिवेशन’ हे पुस्तकच लिहिलं आणि ते अभ्यासू ,जिज्ञासू आणि अज्ञासू ( म्हणजे अभ्यासू ,जिज्ञासू असा आव आणणारे) अशा सर्व मराठी लोकाना अर्पण कराव, असं ठरवल.(  हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने २०१५च्या मराठी अधिवेशनात प्रकाशित केले,याची सर्वसूनी नोंद घ्यावी.)

  त्या पन्नास वर्षान्ब्द्द्ल काय सांगता येईल ? असा विचार आम्ही पुस्तकासाठी  सुरु केला आणि लक्षात आले की जे मराठी अमेरिकेत आले आणि रमले ते विविध काळात विविध कारणांमुळे आले. त्या प्रत्येक मराठी माणसाची एक गोष्ट आहे. त्यामुळे या मराठी माणसाचा एक प्रातिनिधिक आढावा, ती एक प्रातिनिधिक  गोष्ट; स्थलांतरितांची नव्या भूमीत रुजण्याची कहाणी या पुस्तकात सांगायला हवी. आपले तेव्हाचे काही अनुभव अगदी ‘सेम’ होते. आताच्या नव्या मराठी लोकांना कदाचित नवलाईचे वाटावे असे. उदा:  “अय्या, तुम्ही अमेरिकेत आलात तेव्हा तुमचे केस लांब   होते नि तुम्ही दोन वेण्या घालून कुंकू लावून कामावर जात होतात ? “ किंवा “ म्हणजे तेव्हा भारतीय ग्रोसरी स्टो अ र तुमच्या गावात नव्हते ? कोथिंबीर मिळत नव्हती हे खरं की काय ?” तेव्हा या इतिहासजमा गोष्टींची मनोरंजक कहाणी म्हणजे ‘अमेरिकन मन’ हा भाग आमच्या आमच्या पुस्तकात घालायचे ठरले. विसाव्या शतकाच्या सत्तरीत महाराष्ट्रातल्या गावागावातले चुळबुळते सरदेसाई ‘पर’देसाई होऊन अमे रिकेतल्या गावोगावी येऊ लागले त्या एकाची गोष्ट या पुस्तकात आहे.   

  त्यानंतर  अमेरिकेतील मराठी सामाजिक प्रवाहाला अनेक वळणे लागली. जगण्यासाठी लागणारा अमेरिकन यंत्रणेचा सामाजिक टेकू होता पण त्याबरोबर मराठीपणा चा मानसिक टेकू हवा होतां ! त्यासाठी सुरु झाली मराठी मंडळे…. त्यातून सुरु झाले मराठी शाळा, ते उत्तर रंग सारखे अनेक उपक्रम .

त्याचा आलेख हा पुस्तकाचा गाभा म्हणून अमेरिकन मराठी जन  हा भाग आम्ही शब्दांकित केला.              

मराठी समाजाला जसे नवे प्रवाह येऊन मिळाले. तसे अमेरिकेतही बदल झाले. आता तर आपण सारे विश्वात्मकतेच्या लाटेवर स्वार झालो आहोत.  गेल्या  पन्नास वर्षातील बदलती अमेरिका अनुभवताना आम्ही मराठी समाजाचे अनेक बदलते प्रवाह जवळून पाहिले. अनेकवेळा त्यात झेप घेतली. खळाळतेचा थरार अनुभवला. काही मराठी मंडळांचे जन्मसोहोळे, बृहन्महाराष्ट्र मंडळाचा उगम, मराठी अधिवेशने आणि वृत्त, उत्तर रंग सारखे  अन्य उपक्रम; या सर्वात आमचा प्रथमपासून सक्रीय सहभाग आहे. तसेच काही उपक्रमांचे आम्ही जवळचे साक्षीदार आहोत.  आपलं, यश आणि आपल्या आकांक्षा बरोबरीने अनुभवाव्या…कलाकृतींचा आनंद एकत्रित पणे घ्यावा.. सुचलेल्या कल्पना एकमेकांना सांगाव्यात..आपल्या अडचणी एकमेकांशी बोलाव्यात..काही उपाय संघटितपणे शोधावेत.. नव्या मैत्राचे सूर जुळावेत..  या साठी आहे हा  बृहन्महाराष्ट्र मंडळाचा मंच ! आजच्या परिभाषेत “नेट्वर्किंग हब”! कल्पना जागरण (Brain storming),माहिती प्रसारण (Reach out),सेवा मदत (Help),प्रेरणा (Motivation),नव्या कल्पनांचे स्वागत वेगळ्या वाटेने जाणाऱ्या लोकांचे आणि संस्थांचे स्वागत या सर्वांसाठी असलेले हे व्यासपीठ !!

 यामुळे महाराष्ट्राबाहेरचा मराठी समाज म्हणून आपल्याला एक आत्मस्वरूप ( आयडेण्टीटी), आत्मभान आणि अस्मिता मिळाली. त्यातून अनुबंध ( नेटवर्क) निर्माण झाले.

 आपली स्वप्ने साकार करण्याचं सामर्थ्य या अनुबंधात आहे हे उमजलेल्या काही  मराठी लोकांनी

  • महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आणि मराठी भाषा, साहित्यात  आपले योगदान ( काँत्रिब्यूशन्) केले.
  • काही मराठी लोकांनी अमेरिकेतील मराठी समाजासाठी श्रम घेतले आणि घेत आहेत.
  • तर काही अमेरिकन समाजासाठी आपले योगदान करत आहेत.

 या तीन चाकी रथाची गती आपल्याला व्यक्ती आणि समाज म्हणून प्रगतीपथावर नेत आहे.

     १९७०च्या सुमाराला आलेल्या मराठी लोकांनी पायवाट निर्माण केली, तसे त्यानंतरच्या आलेल्या पिढ्यांचे मराठी त्यावाटेवरून पुढे जात महामार्ग निर्माण करीत आहेत. आणि करतील अशी अपेक्षा आहे. मराठी शाळा, युवकांचे उपक्रम, मराठी अधिवेशने, मराठी महाजाल वाणी म्हणजे इंटर नेट रेडीयो, मराठी नियतकालिके, मराठी पुस्तके, मराठी संगीत आणि नाट्यविषयक उपक्रम, मराठी व्यावसायिकांचे मंच, आणि समाजसेवा संस्था अशी अनेक क्षेत्रे आहेत. . 

 आता मराठी मंडळांचे आणि बृहन्महाराष्ट्रमन्डळाचे जन्म सोहाळे साजरे करणारी आमची पिढी आयुष्याच्या  उत्तरार्धाचा विचार करू लागली आहे; नव्हे उंबरठ्यावर येऊन उभी आहे. त्या पाठोपाठ आलेले आता पन्नाशीत आणि  चाळीशीतील असलेले  मराठी ..( कदाचित त्यातच आमच्या मुलांची दुसरी पिढीही असेल.) आमच्या वाटचालीकडे पहात आहेत.   स्थलांतर करून अमेरिकेत आलेल्या सर्वच देशातल्या लोकाना  आयुष्याच्या पूर्वकाळाचा तसा  उत्तर काळाचाही वेगळा विचार करावा लागतो तेव्हा आपण आपले  उत्तर आयुष्य सुखा समाधानात कसे  घालवू शकू याचे  मार्गदर्शनासाठी लागणाऱ्या; आचार विचारांची व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी उभा केलेला रंगमंच म्हणजे उत्तररंग आणि उत्तर रंग परिषदां. आयुष्याच्या उत्तर रंगात आपला वेळ आणि श्रम देऊन अमेरिकेत आणि भारतात कोणकोणते सामाजिक उपक्रम करता येतील याचा विचारही अशा परिषदेत केला जात असतो…  हा आता पर्यंतचा आपला प्रवास.

या प्रवासाचा आलेख साकारताना आपली मराठी अधिवेशने हे मानबिंदू ठळकपणे जाणवतात. 

तेव्हा त्या अधिवेशनाचा एक स्वतंत्र भाग या पुस्तकासाठी शब्दबध्द करण्याचे ठरवले.

या पुस्तकाची तयारी जवळ जवळ दोन वर्षे सुरु होती. त्यासाठी आणि त्या निमित्ताने आम्ही गावोगावच्या अनेक मराठी लोकांशी गपा मारल्या. काही मुलाखती घेतल्या. एकता आणि बृह्न्म्हाराष्ट्रवृत्ताचे जुने अंक संदर्भासाठी चाळले. अधिवेश्नाना आलेले कलाकार कोण, पाहुणे कोण, बोधवाक्ये काय होती, भाषणे कशी झाली आणि ती कोणी केली, कोणत्या विषयांवर चर्चा रंगल्या, त्यांचे पुढे काय झाले, किती स्वयंसेवक होते, लोकांचे अभिप्राय काय होते, स्वयंसेवकांना काय अडचणी आल्या, त्या त्यांनी कशा निभावल्या, भोजने कशी  झाली  रुसवे फुगवे, कोणी केले , पैशांचे गणित काय होते, अधिवेशनाचे शोध बोध काय काय होते, अनेक बाजू , अनेक रूपे आणि अनेक अभिप्राय, या सर्व माहिती आणि विश्लेषणे यांचा एवढा मोठा साठा झाला की त्यातून काय आणि किती निवडावे असा पेच पडावा. प्रत्येक अधिवेशनावर एक कादंबरी लिहिता येईल.  अधिवेश्नांवरील चटकदार लेख वाचकाना निश्चितच गुंतवून ठेवतील.

हे पुस्तक लिहिताना माहितीचे झरे अनेक होतेच. पण मी आणि अशोक यांची  महत्त्वाची गुंतवणूक मराठी समाजात आहे. डेट्रोईट मराठी मंडळाचा पहिला कार्यक्रम ते उत्तर रंग,हा प्रवास अशोकचा. मी  बृहन महाराष्ट्र वृत्ताची संपादक ही एक लहानशी जबाबदारी 30 वर्षापूर्वी अंगावर घेतली आणि पहाता पहाता मी मराठी सामाजात कशी  गुंतून गेले याचा आढावा घेताना लक्षात आले की त्यावरच एक लेख लिहिता येईल. वृत्त हे प्रभावी समाज संवादाचे माध्यम आहे तेव्हा त्यातून सामाजिक जाणीवाची ओळख  मराठी लोकाना करून द्यावी म्हणून मी लेख लिहण्यास सुरवात केली. महाराष्ट्र फौंडेशनच्या कामात कार्यकारिणीच्या सर्व पदांवर काम आणि वितरण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्या निमित्ते महाराष्ट्रातील अनेक संस्थांशी नातेबंध निर्माण झाले. ग्राम विकसन कामातून ‘खेडे दत्तक योजना’चे स्वप्न मराठी समाजापुढे उभे करण्याचे प्रयत्न केले. आणि त्यातून महाराष्ट्रातील चार खेड्यांचा विकास गेली पंचवीस वर्षे चालू आहे. ( अशी पनास गावे दत्तक घेतली जावीत आणि ‘’एक मराठी मंडळ एक गाव” हे माझे स्वप्न साकार व्हावे!) वृत्ताची संपादक म्हणून बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीवर सुरु झालेले काम सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावरही चालूच आहे. त्यामुळे प्रत्येक  अधिवेशनातला  सहभाग म्हटले  तर अपरिहार्य ठरला. तो बरेच वेळा ‘पडेल ते काम आणि घडेल ती सेवा ’ असला तरी अधिवेशनांच्या यशात काही ना काही दान टाकून गेल्याचे समाधान मिळाले. अशा प्रकारे  वेळ, श्रम आणि पैसे खर्च करून  अनेक उपक्रमात पायाभूत सहभाग असल्यामुळे मराठी समाजाची पालखी खांद्यांवर घेताना आलेल्या  अनेक  अनुभवांचा साठा  माझ्या अनुभवाच्या शिदोरीत आहे. तो  अस्सलपणा आणि कामानिमित्ताने वेळोवेळी केलेल्या विचार मंथनातून निघालेले नवनीत चाखण्याचा आनंद वाचकाला मिळेल ही खात्री वाटली , आणि म्हणून जन मन अधिवेशन हे पुस्तक  आम्हीच  लिहिले पाहिजे, ते एक प्रकरे कर्तव्यच आहे, असे वाटले. पंधरा अधिवेशनातील अनेक विभागात काम केलेले अनेक स्वयंसेवक, अधिवेशनाचे सूत्रधार, मंडळांचे अध्यक्ष अशा अनेकांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आमच्या यां पुस्तकाच्या कामाला मनभरून दाद दिली.

   या पुस्तकाची  अर्पणपत्रिका लिहिताना जाणवल की  गेल्या ५० वर्षात उत्तर अमेरिकेत झेप घेऊन आलेल्या हजारो  मराठी स्वयंसेवकानी आपले धन, लाखो क्षण नव्हे तर लाखो तास  देऊन आपले मराठीपण जपण्यासाठी ‘तन मन धन पूर्वक’ केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. केवळ मराठी मंडळे नव्हे तर  प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे काही उपक्रमही आपण सर्वानी केले! या सर्वानी  उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृतीची सेवा केली. विविध प्रकारे जोपासना केली आणि अजूनही करत आहेत. त्यानी उत्तर  अमेरिकेतील मराठी संस्कृतीत तर  योगदान केलेच. पण महाराष्ट्रासाठी आणि अमेरिकेसाठीही ही केले. त्या सर्व  मराठी जनाना मन:पूर्वक प्रणाम केला पाहिजे. 

पुस्तक तयार झाले, त्याला प्रस्तावना लिहिण्यासाठी कोण हा प्रश्नच पडू नये असे अधिकारी म्हणजे  अविनाश धर्माधिकारी! इतिहासाचे विद्यार्थी, समाजाचा बारकाईने अभ्यास करणारे विद्वान  अभ्यासक,    जन्मसिद्ध कार्यकर्ते, अमेरिकेतील मराठी जवळून पाहिलेले अस्सल मराठी कवी आणि लेखक!  त्यांच्या प्रस्तावनेमुळे पुस्तकाला तात्विक अधिष्ठान मिळाले.

या पुस्तकात ऐतिहासिक आलेख आहे तसा  या समाजाचा भविष्यदर्शी वेधही घ्यावा असे वाटले.                 

आता पुढील  झेप कोणती असेल ?  बाबा आमटे यांच्या या कवितेतील पुढील ओळीत सांगितलेली……

झेपावणाऱ्या पंखाना क्षितिजे नसतात

त्याना फक्त झेपेच्या कवेत घेणारे आकाश असते

सृजनशील साहसाना सीमा नसतात

त्याना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते !

.  मातीला ,संस्कृतीलां स्पर्श करीत घेतलेली  प्रगतीची झेप!  कारण मातीचा  स्पर्शधागा  तुटला तर   खुल्या आकाशातलं मुक्त विहरणं  हे भरकटू शकतं. 

  • म्हणूनच आपली मूळ अस्मिता  न विसरता  तिच्याबद्दल कमीपणा, न्यूनगंड न बाळगता  ती व्यापक कशी करावी, आपल्या मुलांच्या पिढीला कशी द्यावी  याचा विचार आणि कृती आपल्या सृजनशील साह्सांत कशी संक्रमित करावी हे आपल्यापुढील आव्हान आणि  आवाहन आहे
  • आपल्या  मराठीपणाचा रास्त अभिमान आपल्या भारतीय ‘स्व’मध्ये विस्तारित करण्याचं आणखी एक आव्हान आणि आवाहन आहे. आपण अन्य भारतीयांशी हस्तांदोलन करून काही उपक्रम करू शकू का? या प्रश्नांच्या उत्तरात त्यांची दिशा आहे.  
  • त्यापलीकडे आहे आपली आणखी विस्तारलेली अमेरिकन अस्मिता! आम्ही भारतीय अमेरिकन म्हणजे कोण? आम्हाला अमेरिकेत पाठवण्याची आमच्या देशानं सक्ती केली नव्हती. त्यामुळे विस्थापित नव्हे. आम्हाला कोणी गुलाम म्हणून बांधून नाही आणलं म्हणून सन्मानित, जगातील दोन मोठय़ा प्रजासत्ताक देशांत राहण्याचं भाग्य लाभलेले, दोन्ही देशांत सुस्थापित असे आम्ही भारतीय अमेरिकन! अकरा  सप्टेंबरला भुईसपाट होणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरने घायाळ होणारे आणि मुंबईत ताज हॉटेलवरील दहशतवाद्यांचा हल्ला पाहताना झोप उडालेले. दोन्ही देशांतील अशा अनेक अभागी घटनांचे खोल पडसाद अनुभवणारे आम्ही भारतीय अमेरिकन आहोत. आपण अमेरिकन संस्कृतीशी समरस होण्यासाठी आणखी कसे  प्रयत्न करणार आहोत ?  असे अनेक प्रश्न ही झेप घेताना स्वत:ला विचारले पाहिजेत असे वाटते.  

या सर्वाची सांगड कशी घालता येईल ? या पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी  विचारविनिमय करताना   श्री. अविनाश धर्माधिकारी  यांनी पुष्कळ काही सुचवले, ते प्रस्तावनेत लिहिले  आणि आम्हालाही  काही सुचले. उदाहरणार्थ :

  •   महाराष्ट्रातल्या शिक्षणसंस्थांशी जगभराच्या मराठी माणसाला जोडण्याचा उपक्रम:

 जगभर गेलेला मराठी माणूस तिथल्या शिक्षणसंस्थांतील उत्तमोत्तम गोष्टी भारतात कशा नेता येतील याचा विचार करून काही  उपक्रम करू शकेल. . आपल्या जीवनानुभवातून   विस्तारलेली आपली ताकद  महाराष्ट्रातील , भारतातील मनांच्या  मशागतीला वापरता येईल.    

  • .तंत्रज्ञान आणि आर्थिक गुंतवणूक:  मराठी माणसांनी  जगभर आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञता मिळवली आहे. त्याचा  उपयोग भारताला करून देता येईल. आपल्याकडे असलेल्या  आर्थिक भांडवलातून भारताच्या विकासाला, रोजगारनिर्मितीला हातभार लागू शकेल. लहान सहान  प्रमाणात  असे प्रकल्प होतात. पण आपल्यात मोठी झेप घेण्याची कुवत आहे.

अमेरिकन मराठी जन मन अधिवेशन या आमच्या ऐतहासिक पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना श्री.अविनाश धर्माधिकारी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे या भविष्यातील झेपेच्या संदर्भात मांडले  आहेत.   

त्यांच्या मते, आज जगभर मराठी आहेत तरीही महाराष्ट्रात (भारतात) काही पॉझिटिव्ह – विधायक गोष्टींना चालना देण्याएवढा ‘क्रिटिकल मास’ आता अमेरिकेतल्या मराठी माणसांपाशी तयार झालेला आहे.

चांगले बदल घडवण्यासाठी, त्याकरता जाणीव-जागृती आणि चांगल्या अर्थानं ‘दबाव’ आणण्यासाठी या ‘क्रिटिकल मास’चा उपयोग होऊ शकतो, व्हायला हवा. त्याच वेळी भारताची बाजू अमेरिकेत आणि जगासमोर सुद्धा मांडायला, अमेरिकेच्या कायदेकानूंच्या चौकटीत भारतासाठी ‘लॉबिंग’ करायला या ‘क्रिटिकल मास’चा उपयोग होऊ शकतो – झाला पाहिजे. मला वाटतं की जगभरच्या – अमेरिकेतल्या मराठी (मूळ भारतीय) माणसाच्या कामाची पुढची दिशा अशी ‘दुहेरी – दुधारी’ असायला हवी – भारतातल्या चांगल्या बदलांसाठीचा एक जागतिक दबावगट आणि भारताची बाजू जगासमोर – अमेरिकेसमोर योग्य पद्धतीनं मांडणारा संघटित समूह.

 याबरोबरच श्री. धर्माधिकारी आणखी स्वप्न आपल्यासमोर मांडले आहे. ते म्हणतात, की    “बदलत्या जागतिक परिस्थितीच्या दबावामुळे एखाद्या देशात घडणार्‍या बदलांना पत्रकार थॉमस फ्रीडमाननं ‘ग्लोब्युलेशन’ – (Globulation )- Revolution under global pressure – असा शब्द वापरलाय. भारतात असं ‘ग्लोब्युलेशन’ घडवण्यात अनिवासी भारतीयांचा (मराठी माणसाचा) वाटा, सहभाग, असू शकतो – असला पाहिजे.

BMM अधिवेशनं हा आधार धरून अशा उपक्रमांच्या योजना आकाराला याव्यात अशी एक अपेक्षा मी नोंदवून ठेवतो.”

जगात कुठेही राहिलो तरी. आता जगात कुठेही असलो तरी मराठी-महाराष्ट्र-भारताच्या भल्यासाठी काम करता येतं ही भूमिका असेल तर असे अनेक प्रकल्प, उपक्रम व्यक्ती आणि मराठी समाजाच्या पातळीवर सुचतील , करता येतील.  संमेलनातील साबुदाणा खिचडी आणि पुरणपोळ्या यांच्या पलीकडे जाऊन  आपली मराठी समाज म्हणून एकवटलेली ताकद आजमावून पहाणे आणि  तनमन धन पूर्वक ध्यास गतीचा घेऊन श्रमाचा मंत्र म्हणत साहसाला सिध्द व्हावे.     सृजनशील साह्साना सीमा नसतात, त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते तशी आपले पंख पसरवण्याची इच्छा आणि अटही लागते !                                                   विद्या हर्डीकर सप्रे , कॅलिफोर्निया

महाबलांची ‘तारांबळ’

काही  वर्षांपूर्वी मी एका छोट्या पाहुण्याला  घेऊन लॉस एंजेलिस मधील ग्रीफिथ ऑब्झर्वेटरी पहायला गेले होते.  त्याला त्याच्या आई बाबांनी लहान दुर्बीण भेट दिल्यामुळे त्याला ग्रह तारे याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. तिथे एक सुंदर म्युझियम आहे. त्यातील एका दीडशे फूट लांब  आणि वीस फूट उंच भिंतीसमोर आम्ही थबकलो.             

त्या  अख्या भिंतीवर एक म्युरल आहे. आणि ते म्युरल म्हणजे तर्जनी मागे जितके आकाश लपेल त्याचा भाग मोठा करून लावलेले म्युरल!   

त्याखालील कलाकार शास्त्रज्ञातील एक नाव होते, डॉक्टर आशिष महाबळ. “अरे, हा तर आपला मित्र आशिष” असे मी उद्गारले. हो, हाच तो आशिष. आम्हाला मराठी मंडळात भेटलेला. शांत, हसतमुख आणि विनम्र म्हणून लक्षात राहिलेला. मग हळू हळू त्याची आणि त्याची पत्नी विद्युल्लता यांची ओळख झाली, गप्पांचे सूर जमले म्हणून जाणे येणे सुरु झाले. कॅलटेक युनिव्हर्सिटीत ते दोघे काम करतात. एवढेच माहिती होते. कारण स्वत:बद्दलचा मोठेपणा  सांगणे हे त्याच्या स्वभावात नाही. आमच्या उत्तर रंग या परिषदेच्या कामाबद्दल त्यांनी प्रश्न विचारले; तेव्हा  “बरे  आहेत कामसू” म्हणत आम्ही त्याना स्वयंसेवक म्हणून मदतीला बोलावले. वयाने लहान असलेला हा एवढा मोठा शास्त्रज्ञ आहे हे माहितीच नव्हते!

मग आम्ही त्याच्या व्याख्यानाचा एक कार्यक्रम आमच्या घरीच आयोजित केला. मराठी मंडळाचा हा ‘उपग्रहीय’ कार्यक्रम गावातल्या आबालवृद्ध सर्वांसाठी खुला होता. अगदी सोप्या शब्दात आशिषने आकाश आणि अवकाश याबद्दल खूप माहिती सांगितली. रंगलेल्या भाषणानंतर; लहानश्या दुर्बिणीतून आम्ही सर्वानी कित्येक ताऱ्यांची ओळख आमच्या मागच्या अंगणात बसून  करून घेतली.

 पालोमारच्या वेधशाळेतही आशिषचे काम चालते, त्यामुळे तो घरी जाता जाता वाटेत आमच्या घरी थांबू लागला. आम्ही त्याला त्याच्या कामाबद्दल विचारू लागलो.  दर वेळी त्याच्याकडून ग्रह तारे आणि त्याहीपेक्षा त्याच्या नवनवीन उपक्रमाची  खूपच माहिती मिळत असते. बिग डेटा, डेटा सायन्स, मराठी विज्ञान कथांचे लेखन, नाणी संग्रह, संस्कृत अशा कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी योगदान दिल आहे, हे आम्हाला हळू हळू समजत गेल. लमाल म्हणजे लॉस एंजेलिस मराठी लीटरेटस किंवा लेखक या गावातील साहित्य प्रेमी लेखकांचा उपक्रम गेली काही वर्षे तो अत्यंत नेटाने चालवत आहे. स्वत:चे शिक्षण मराठी माध्यमातून झाले नाहीत, तेव्हा चांगले मराठी लिहायला शिकण्याची ही एक संधी आहे, हा आशिषचा त्यामागचा दृष्टिकोन. एक वर्ष मराठी मंडळाच्या कार्यकारिणीवर काम करून त्याने आपला वेळ मराठी समाजासाठीही दिला आहे. त्या सुमाराला मराठी मंडळाने दत्तक घेतलेल्या कोकणातील मांगवली  गावाला  त्याने सहकुटुंब  भेट दिली. तिथल्या मुलांना सोप्या भाषेत ग्रहताऱ्याब्द्द्ल माहिती दिली. कॅलटेक सारख्या प्रख्यात विद्यापीठातील प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ असल्याचा कोणताही गवगवा न करता, भाव न खाता ! 

अंतराळ संशोधनातल्या वैशिष्ठपूर्ण कामगिरीसाठी लघुग्रहाला ज्याचं नाव दिल गेलय असे संशोधक आणि शास्त्रज्ञ आशिष महाबळ म्हणजे तोच आशिष!  

गेली १७ वर्ष कॅलटेकला अॅस्टॉनॉमर व अॅस्ट्रोफिजीसेस म्हणून आशिष काम करतो. तिथे तो १९९९ मध्ये  पोस्ट डॉक्टर फेलोशिप करता आला.  तेव्हापासून अनेक मोठ्या स्काय सर्व्हेवर त्याने काम केल आहे.. त्या आधी तो  अहमदाबाद येथे फिजिकल रिसर्च लॅबोरीटीमध्ये एक वर्ष होता. त्या आधी त्याची  पीएचडी ९८ साली आयुका पुणे येथून  झाली.  

आशिषने सांगितलं ,की”  अॅस्ट्रॉनॉमर्स व अॅस्ट्रोफिजिसिस्ट हे खगोलशास्त्र या संज्ञेत येत. आजकाल तरी त्यात फार फरक केला जात नाही.    

अॅस्ट्रॉनॉमर म्हणजे ऑब्झवेशनल सायन्सशी जास्त संबंधित आणि अॅस्ट्रॉफिजिसीसिस्ट म्हणजे त्यांच्याशी संबंधित असलेल फिजिक्स, तस मॉडेल तयार करण आणि त्यावरून मग थेअरीज बांधणं वगैरे सर्व हळूहळू त्यात येत. फक्त अॅस्ट्रॉनॉमर्स आजकाल फारसे सापडणार नाहीत. फक्त अॅस्ट्रॉफिजीसीस्ट पण तसे सापडणार नाहीत. कारण त्यांना ऑब्झर्वेशन वगैरे कसे घेतले जातात या बद्दलची माहिती असावी लागते.”

तपशील खूप असले तरी एक महत्वाचं म्हणजे ‘महाबल’ हे नाव एका लघुग्रहाला दिलं जाण ही प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे.  

त्याबद्दल त्याला विचारल्यावर त्याने अत्यंत नम्रपणे सांगितलं की, “मी  तो विशिष्ट ग्रह शोधला म्हणून त्या लघुग्रहाला माझ नाव दिलं नाही. पृथ्वीच्या जवळचे असे ग्रह शोधण्यासाठी एक स्काय सर्वे ताफा आहे. मुख्यत: एखादा लहान ग्रह पृथ्वीवर येऊन आदळण्याची शक्यता तपासण्यासाठी हा तपास केला जातो. अशा हजारो लघुग्रहांच्या शोधाला माझा हातभार लागला आहे. सापडणाऱ्या सर्वांनाच नावे दिली जातात असे नाही एखादा लघुग्रह शोधल्या नंतर त्याची निदान ३ ऑर्बीट पूर्ण होईपर्यंत त्याला नाव देण्यात येत नाही.”  आशिषने आणखी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावरून मी निष्कर्ष काढला की आशिषच्या त्या क्षेत्रातील कामाच्या मोठेपणाला ही मान्यता आहे! लघुग्रहाला नाव दिलं गेलं असा आशिष हा पहिला भारतीय नाही हेही त्याने जाता जाता नम्रपणे सांगितल,.         

आपले पूर्वीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ ‘वेणु बापू’ यांच्या नावानी एक बंगलोर जवळ टेलिस्कोप आहे,  आणि त्याचं  नावही त्यांचा सन्मान म्हणून  एका लघुग्रहाला देण्यात आलं होतं, ही माहिती आशिषने सांगितली.

आशिषचं काम लघुग्रहांपलीकडे आहे.. लघुग्र्हांब्द्द्लची माहिती (डेटा) अन्य अनेक गोष्टींचा माहिती स्त्रोत असते. उदा. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तारे जे आपल्या दिर्घिकेत असतात किंवा आपल्या दीर्घिकेच्या पार पलीकडे बाहेरच्या दीर्घिकेमधले ते क्वेसार्स म्हणजे उर्जेची  पॉवर हाउसेस! त्याच्या मध्यभागी असलेले ब्लॅकहोल्स   असतात. त्या कृष्णविवरांच्या भोवती  अक्रेशन डिस्क असते.  (कृष्णविवराजवळ आलेले पण त्यात न पडलेले पदार्थ कण, वायू ई. चा हा पट्टा.) अशा क्वेसारचा शोध आशिष आणि त्याचे सहकारी  शास्त्रज्ञ घेत असतात.. त्यांची  तेजस्विता बदलत असते.  आपण आकाशात आज नुसत पाहिलं आणि पुन्हा पाहिलं तर तारे लुकलुक करतात पण लुकलुकण म्हणजे तेजस्विता बदलण. नव्हे. हे आपल्या अॅटमॉस्फीअरमुळे- पृथ्वीभोवती जे वातावरण आहे- त्यामुळे होत असत. पण म्हणजे त्याची तेजस्विता बदलते असे नाही. साधारण ९० ते ९९ % ताऱ्यांच्या  तेजस्वितेत दिवसेंदिवस, दिवसाकाठी, वर्षासाठी फरक नसतो पडत. पण त्यांची एक लाईफ सायकल असते. त्यात ते श्वेत बटू बनतात किंवा राक्षसी तारे. हे बनताना बरेच बदल होत असतात. आता ही जी लाईफ सायकल आहे ती कोट्यावधी वर्षाची असते. आपल्या आयुष्यात असे बदल हे एका ताऱ्यात आपल्याला दिसणे शक्य नाही. पण स्टॅटिकली तुम्ही कोट्यावधी तारे पहिले तर तुम्हाला त्यात एखादा दुसरा असा बदल होणारा तारा  दिसणार. “मी ‘रीपिटेड  ऑब्झरवेशन’ घेत असतो आणि त्यात असे जे बदल घडत असतात ते शोधून काढतो. आणि मग त्याच्या स्टॅटिस्टीक्सवरून म्हणजे संख्याशात्रीय विश्लेषणावरून आपल्या युनिव्हर्सच रिव्होल्युवेशन कस होत आहे ते शोधण्यामध्ये आमचा कल आहे.” असे आशिष सांगतो.

 थोडक्यात, त्याचे संशोधन हे अत्यंत किचकट, चिकाटीचे आणि गुंतागुंतीचे आहे. ते समजण आपल्या आवाक्याबाहेर म्हणून मी त्याला “त्याचा जगाला काय उपयोग होतो” असा  भाबडा प्रश्न विचारला. तर आशिषने उत्तर दिलं की,”  मी कोण?  मी कुठून आलो? हा जो प्रश्न आहे या प्रश्नाची उकल करायला आमचं संशोधन मदत करतं. त्यामुळे उद्याच त्याचा उपयोग होईल असे नाही. याचा प्रत्यक्ष उपयोग होताना दिसला नाही तरी अप्रत्यक्ष उपयोग अनेक ठिकाणी, दूरगामी होतात.   उदा. इंटरनेटचा शोध.  इंटरनेट वापरताना सेटलाईट थ्रू सिग्नल जात असतील त्याच्या मागे कुठेतरी आंम्ही केलेला रिसर्च उपयोगी पडतो. आता इंटरनेटची

  जगात किती उपयोजने आहेत पहा.  तात्पर्य म्हणजे बऱ्याच गोष्टींचे मूळ हे फिजिक्स, अॅस्ट्रॉफिजिक्स या संशोधनात असत.

 थोडक्यात मूलभूत संशोधनाच्या भावी व्याप्तीचा पिसारा आणि पसारा ‘अनंत कोटी ब्रह्मंड!’ आणि आशिष असा एक मूलभूत संशोधक.     

 आशिष मूळचा यवतमाळचा. लहानपणी निरभ्र आकाशात तारे पहाणाऱ्या आशिषला वडिलांनी धुमकेतू पहाण्याच्या निमित्ताने फक्त २ इंच व्यासाची लहानशी दुर्बीण घेऊन दिली.  त्यातून तो धुमकेतू शोधताना इतरांना दाखवताना मजा आली आणि तो  अमॅच्युअर अॅस्ट्रॉनॉमिस्ट म्हणजे  हौशी खगोलशास्त्रज्ञ बनला.  त्याचं महाविद्यालयीन शिक्षण नागपूरला झालं. ते चालू असताना बीएस सी च्या शेवटच्या वर्षी पुण्याच्या आयुकात तो समर स्कूल प्रोग्रामसाठी गेला.  तेथील व्हिजिटिंग स्टूडट प्रोग्राम नावाच्या उपक्रमातही त्याने सहभाग घेतला. त्याचा भाग म्हणून आयुका ची प्रवेश परीक्षा दिली. खरं तर ती परीक्षा त्याने एक वर्ष आधीच दिली. पण योगायोग असा की एम एस्सी च्या दुसऱ्या वर्षी आजारी पडल्यामुळे त्याला ती  परीक्षा देता आली नाही. तेव्हा आधीच दिलेल्या या प्रवेश परीक्षेच्या जोरावर आशिषला आयुकात  विशेष योग्यता  प्रवेश मिळाला.  

आणि अर्थातच त्याने या संधीचं सोन. करून पी.एच डी मिळवली.

त्याच्या प्रॉफेशनल करिअरची ही सुरवात.

आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अड अस्ट्रफिजिक्स. तिथे अनेक प्रकारची  खगोलशास्त्रासंबंधित कामे चालताता. उदा:  इंस्त्रुमेंटेशन थेअरी, डेटा सायन्स,  सूर्य, अॅस्ट्रॉफिजिक्स, ‘एक्स्ट्रा गॅलेक्सी एक्सरे’ ई.ई.   त. सुरवातीला ग्रॅज्युएट स्कूल करताना  काही कोर्सेस पूर्ण करावे लागतात. त्यातील कोर्सेस डॉ. जयंत नारळीकर यांचेकडून शिकण्याची संधी आशिषला मिळाली.

 आशिष त्यांचा अतिशय आदराने उल्लेख करतो. तो सांगतो की,” नारळीकरांचं ज्ञान तर  सर्वात वाखण्याजोग आहेच. त्या व्यतिरिक्त त्यांची लेक्चर्स देण्याची पद्धतही!   ते अतिशय संथपणे सुरवात करतात आणि हळूहळू गोष्टी समजत जातात आणि जेव्हा तास संपतो तेव्हा ते बरोबर थांबतात आणि त्या तासाला तर त्यांनी सांगितलेत त्यांनी पूर्ण समजावलं असत त्यांनी ते इतक सुंदर पद्धतीनं समजावलं असत की  आपल्याला वाटावं आपण  परत जाऊन सगळ तस च्या तस लिहू शकू.  ते इतक्या खुबीने इतक्या गोष्टी एकमेक्कात गुंफतात की ते एक तंत्र वाखण्याजोग आहे !”

आणखी काही मातब्बर शास्त्रज्ञ त्याला तेथे भेटले. आयुकात जगभरातले शास्त्रज्ञ काही ना काही कारणांनी भेट देण्यास म्हणून येतात. त्यामुळे जगभरात काय चालू आहे याची अद्ययावत माहिती विद्यार्थ्याना आणि संशोधकाना मिळते.    

विज्ञान कथा लिहिण्याची प्रेरणाही आशिषने डॉ. नारळीकर यांच्याकडून घेतली. 

त्याशिवाय तो सांगतो की, “काही वर्षापूर्वी मराठीत विज्ञान परिषदेने होतकरू विज्ञान कथाकारांसाठी शिबिराच आयोजन केल होत. त्यातून मला विज्ञान कथा लिहिण्याचं बाळकडू मिळालं.”  आशिषच्या विज्ञान कथा अनेक ठिकाणी प्रसिद्ध होत असतात. कांही कथा त्याने टोपण नावाने लिहिलेल्या आहेत.

आशिषच्या मुख्य विषयाशी निगडीत आणखी एक क्षेत्र आहे, ते ‘बिग डेटा’  आणि त्यातही त्याने पुष्कळ मजल मारली आहे. त्याबद्दल सांगताना तो म्हणतो,” अॅस्ट्रॉनॉमी मध्ये , मी अनेक स्कायसर्व्हेज वर काम केलय. म्हणजे अख्ख आकाश आणि  पुन्हा पुन्हा त्याच निरीक्षण करायचं. त्याचा जर तुम्ही डेटा पाहिला लागलात तर तो खूप जमतो.  मग हळूहळू  असा डेटा, बिग डेटा या सदरात मोडायला लागतो. बिग डेटा हा नुसता त्याच्या  डेटा व्हौल्यूम   वरून ठरत नाही, तर डेटा कॉमप्लेकसिटी वरून ठरतो! म्हणजे काय की तुम्हाला डेटा अॅनलाईज करायचा असेल तर काय कराव लागतं यावर त्याची गुंतागुंत ठरते.  नुसता एक कॉम्प्यूटर प्रोग्रॅम सुरु करून डेटाचं विश्लेषण म्हणजे  अनालिसिस होणार असेल तर तो बिग डेटा नाही. . पण त्याच्यात जर खूप ‘व्हेरिबलस’ असतील आणि खूप वेगवेगळे डेटा सेट एकत्र करावे लागत असतील मग त्याची गुंतागुंत म्हणजे कॉमप्लेकसिटी वाढत जाते व तो  बिग डेटा होतो. अशा प्रकारच्या माहितीचं विश्लेषण (म्हणजे  अॅनलीसीस)  म्हणजे डेटा सायन्स ! तर अॅस्ट्रॉनॉमी मध्ये मी हे करतच होतो. त्याकरता अनेक मॅथॅमॅटिकल स्टॅटीकली पद्धती वापराव्या लागतात. पण ते करता करता कॅलटेकला असल्यामुळे तेथील JPL आणि त्या अनुषंगाने अनेक इतर क्षेत्रांशी संपर्क झाला. “

 JPL म्हणजे जेट प्रोपेलंट  लॅबॉरेटरी. JPL हे नासाच एक अंग आहे. कॅलटेक विद्यापीठातर्फे त्याचं  सूत्र संचालन म्हणजे  मानेजमेंट  होते.  JPL मधून जे रॉकेट सायन्स सुरु झालं ते  नंतर नासाच अंग झाल. कॅलटेक च्या काही विद्यार्थ्यांनी ते प्रथम सुरु केल होत. नासाचे अजूनही मनुष्यविरहित म्हणजे अनमॅन स्पेस क्राफ्ट असतात.  त्याची सर्व डेव्हलमेंट JPL मध्ये होते.

डेटा सायन्सचा एक भाग म्हणून आशिष अर्थ सायन्सवरही काम करतो. अर्थ सायन्स म्हणजे आकाशातील पृथ्वीच्या कृत्रिम उपग्रहांनी पृथ्वीकडे डोळा लावून पाठवलेला पृथ्वीचा डेटा !

अर्थात डेटा सायन्स तिथेच थांबत नाही. त्याची अनेक उपयोजने म्हणजे ऑप्लीकेशन्स असतात. त्यातील काहीवर आशिष काम करत आहेच. पण काही वर्षांनी सुरु होणाऱ्या

 LSST म्हणजे हे लास्ट सिनॉप्टीक सर्व्हे टेलिस्कोप.च्या निरीक्षणातून बाहेर येणाऱ्या काही लाख क्वेसार ( सध्या उपलब्ध असलेल्या दुर्बिणींच्या कमी क्षमतेमुळे रोज फक्त १० ते २० सापडतात) च्या अवाढव्य माहितीचे विश्लेषण करू शकणाऱ्या पद्धती विकसित करण्याच्या  कामाचा मार्गदर्शक म्हणूनही आशिषचे काम चालू आहे. अजून काही वर्षांनी चिली, साउथ अमेरिकामधून LSST ची ऑब्झर्वेशन्स  सुरु होणार आहेत.

या प्रकल्पात बरेच देश आहेत हे सांगताना आशिषने यात भारतातील आयुकाचाही सहभाग  आहे , हे मोठ्या अभिमानाने सांगितले.  

अशिष शास्त्रज्ञ आहे तसा प्राध्यापकही आहे. अर्थातच तो काही विषय महाजालावर म्हणजे ‘ऑन लाईन’  शिकवत असतो.

त्या व्यतिरिक्त  मुलांकरता, शाळेतल्या मुलांकरता  मॅथ आणि गेम्स या बद्दलचा गेम कोर्स शिकवला. . साधारण १० ते ११ तासांचा असेल पण मुलांना  आवडायचा.

आशिषला शिकवण्या इतकाच शिकण्यात रस  आहे. त्यामुळे त्याने नाणे शास्त्राची ओळख करून घेतली आणि संस्कृतचाही अभ्यास केला. संस्कृत भाषां म्हणून प्रत्येकाला यावी की न यावी यापेक्षा त्या भाषेच, बांधेसूद व्याकरण प्रत्येकाने आत्मसात कराव. अस, आशिषला मनापासून वाटतं.

 कोणत्याही विषयाचा समरसतेने अभ्यास करणे ही आशिष महाबळची वृत्ती त्याच्या बहुआयामी व्यक्तित्वाला पोषक अशी आहे म्हणूनच पृथ्वीसह अनंत आकाशगंगांचं अवकाशविश्व त्याला सतत खुणावत असत.

विद्या हर्डीकर सप्रे 

मेवाती मेवा.

भारतीय शास्त्रीय संगीतात सूर, समय आणि मनात प्रकटणारे भाव यांचे एक तरल नाते आहे. ‘मेवाती ऑफरीन्ग्ज’ ही श्री. सुहास जोशी यांची सी.डी. ऐकताना ते  उलगडत जाते.    

उष:काल होण्याआधीचे प्रसन्न पण धुक्यात वेढलेले वातावरण.. फुलांचा मंद दर्वळ आणि खलाटीतून येणाऱ्या धुक्याच्या लाटा… “भस्म माखिले दिसे चराचर” असं शिवरूप घेऊन कोमल रिषभ- च्या अवगुंठनातून हलकेच उमलणारा  बैरागी भैरव ‘ललित लाल श्री गोपाल’ ही या सी.डी. मधील पहिली बंदिश.   

 विरागी भैरव नंतर येते, कलिंगडा रागातील “प्रभुं प्राणनाथ” हे संस्कृत भजन. कलिंगडा हा राग भैरव रागाला अगदी जवळचा आहे. या भजनात भगवान शिवाला अर्पण केलेली स्तुती मनाला प्रसन्न करून जाते.       

नंतर येतो राग मधुवंती.  पहाटेच्या भैरवातील शुद्ध गांधार आता कोमल झाला आहे. अंतर्मुख बनवणारा आणि भक्तिभावी.  या रागाला असलेली उत्कट धार ही तीव्र मध्यमाची किमया!

मधुवंती रागाचा हा उत्कट आणि भक्तिभावी  गोडवा ‘देवी सरस्वती’ या बंदिशीत  प्रारंभीच्या अलापापासून दिसतो. या बंदिशीचा बांधेसूदपणाही लक्षात येण्याजोगा.. 

हाच तीव्र मध्यम ‘शुद्ध’ म्हणजे सौम्य  झाला की रागात प्रसन्नता येते. तसा धैवत शुद्ध असेल तर तेजस्वी दिसतो. दुपारच्या झळाळत्या सूर्यासारखा.. अमृताहुनी गोड असा गोडवा आणि झळाळत्या सूर्याचा तेजस्वीपणा म्हणजे दुपारचा राग भीमपलासी ! ‘मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड ,अंगणात झाड कैवल्याचे ‘ अस, त्याचं वर्णन कराव, आणि ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ म्हणून त्या रागाला हाक मारावी. मेवाती घराण्याचे लोकप्रिय गायक पंडित जसराज यांची ही भीमपलासी रागातील प्रसिद्ध बंदिश.  ती गाऊन सुहास यानी ‘बडे गुरु’ पंडित जसराज याना गुरुवंदना दिली आहे. अर्थातच भीमपलासीने  या  सी. डी. चा असा औचित्यपूर्ण  समारोप केला असला तरीही काही अन्य काही प्रहरांचे प्रातिनिधिक रागही या सी.डी. मध्ये आहेत.        

उदा:  ‘जयति जयति भूमी भारत की” ही देशभक्ती पर बंदिश.  देशभक्तीची अभिव्यक्ती करणाऱ्या  देस रागाचे कोंदण या अभिव्यक्तीसाठी अगदी योग्य आहे.

रात्रीचा पहिला प्रहर म्हणजे दिवेलागणीची व्याकूळ वेळ.. ती व्याकुळता, समर्पण, भक्ती या भावनांचा आविष्कार करणारा शाम कल्याण .. मध्यम आता तीव्र झालेला आहे. ते सगळं  तीव्र मध्यमाचं व्याकुळलेपण   ‘सुनिये अर्ज है” मध्ये व्यक्त झालेलं आहे.

या पुढचे प्रहर मिया मल्हार आणि चंद्रकंस रागातून बांधेसूदपणे  मांडले आहेत. चंद्रकंस रागातून ‘चंद्र हवा’ असा हट्ट करणाऱ्या बाल रामचंद्राची कथा मांडली आहे.     

श्री. सुहास जोशी हे न्यूजर्सी चे रहिवासी आणि न्यूजर्सी  येथील ‘पंडित जसराज संगीत विद्यालयातील’  पंडिता तृप्ती मुखर्जी यांचे  शिष्य.

 मेवाती ऑफरिंग्ज” ही सी. डी.  रागरंग संस्थेचे सुनील कुलकर्णी यांनी  प्रकाशित केली आहे.  प्रशांत पांडव       ( तबला) आणि उदय कुलकर्णी ( हार्मोनियम) यांची साथ असलेल्या या सी. डी. मध्ये मेवाती शैलीतील आठ राग बंदिशी अथवा भजन स्वरुपात सादर केले आहेत.

पारंपारिक मेवाती शैलीत भक्तिभावना, समर्पण, आणि स्वर तालाची वेगळ्या पातळीवरची जाणीव असणारे काव्यही महत्वाचे असते, हे जाणून श्री. सुहास जोशी यानी आठ पैकी पाच बंदिशी स्वत:च लिहिल्या आणि स्वरबद्ध केल्या आहेत.

मेवाती घराणे आणि पंडित जसराज हा संयोग सर्व परिचित आहे. मेवाती घराण्याचे उगमस्थान आहे ग्वाल्हेर घराणे. भास्करबुवा बखले यांचा लखलखीत स्वरसूर्य चमकला त्या ग्वाल्हेर घराण्याचे गायक द. राजस्थानात गेले. मूळ घरापासून काहीसे एकाकी  पडलेल्या या गाण्यावर किराणा शैलीच्या भावपूर्ण वैशिष्ठ्याने माया धरली. तशी जयपूरच्या रेखीव स्वर रचनेच्या शैलीनेही सावली धरली. एकोणिसाव्या शतकात जोधपूरच्या नाझीरखान यांनी या गोंडस गाण्याला ‘मेवाती’ असे नाव दिले आणि स्वत:ची एक नवी परंपरा सुरु केली. त्यात राजस्थानी लोकसंगीताची लय मिसळली. सूफी शैलीचा विरागीपणा आणि कीर्तनकार शैलीचा रंजक ठसा त्यावर उमटला. मेवातीचे शैलीचे व्याकरण  हिंदू वेदांच्या ऋचानी तोलले आहे पण शिया पंथाचा प्रभावही त्यावर दिसतो. यातून मेवाती संगीत परंपरेला पारमार्थिक आणि अध्यात्मिक रंग आला. रागाच्या स्वर मेळातून व्यक्त केलेली समर्पण आणि परमेश्वर दर्शनाची आर्त ओढ म्हणजे मेवाती शैली.

शैली कोणतीही असो, भारतीय संगीत्ताच्या सात स्वरात अशी काही जादू आहे की रसिकाच्या मनात पहाटेच्या पारिजातका पासून उत्तर रात्रीच्या मोगऱ्या पर्यंतच्या सर्व प्रहरापर्यंतच्या काळातील भावनांचे तरंग उमटू शकतात. दिवसाची वेळ, मनातले भाव आणि स्वर रचना यांचं परस्परांशी नात गुंफणारे भारतीय संगीतकार हे जादुगार असतात. पण त्यांनी  समयोचित सूर , ताल, शब्द यातून किमया साधली तरच  गाणे श्रवणीय होते. 

‘मेवाती ऑफरीन्ग्ज’ या सी.डी मधील  रचनांचा आस्वाद घेण्यापूर्वी श्री. सुहास जोशी यांचा संगीत प्रवास जाणून घेतला तर  आपल्यालाही त्यांच्या स्वर यात्रेत सामील होण्याचा आनंद मिळतो.

 श्री. सुहास जोशी जरी इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग  क्षेत्रातील  असले तरी संगीताची ओढ लहान पणापासूनची.   पुण्यात सुशिक्षित  मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या हुशार मुलाला शैक्षणिक प्रगती करताना आपल्या  अंतरंगात डोकावून पहाण्यासाठी फारसा वेळ हाताशी नसतो. महाविद्यालय, शिष्यवृत्ती, आय आय टीतली शिक्षणाची संधी आणि त्याबरोबर मिळालेली अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील सुसंधी  या यशाच्या पायऱ्या चढताना मनातली शास्त्रीय संगीताची ओढ सुप्तच राहिली.. भारतात संगीत शिक्षणाला वेळ नसल्यामुळे  संगीत शिकण्याची इच्छा राहून गेली असे काहीसे वाटत असतानाच, न्यू जर्सी मध्ये पंडित जसराज संगीत संस्थेने १९९५ मध्ये आपले दरवाजे उघडले. सुहासची संगीत यात्रा सुरु झाली. “संगीत हा परमेश्वर दर्शनाचा मार्ग आहे, आणि या यात्रेत आपल्यासारख्याच साधकांबरोबर चार पावले चालताना येणारा अनुभव अतिशय आनंदाचा असतो” ही श्री. सुहास जोशी यांची धारणा आहे आणि त्यांची व्यक्तिगत प्रवृत्ती संगीतातील  अध्यात्मिक पातळीची जाणीव सतत असण्याची आहे.   मेवाती शैलीतील संगीताची साधना करण्याची संधी त्यांच्या या मूल प्रकृतीला पोषक अशी आहे..  त्यामुळे पंडित जसराज यांनी त्यांची साधना ऐकली तेव्हा त्यांनी उद्गार काढले की,” सुहासच्या प्रकृतीत जे संगीत अडकून बंदिस्त  होते, ते अभिव्यक्तीची संधी मिळाल्यामुळे मुक्त होत आहे.” श्री. सुहास जोशी हे मेवाती परंपरेतील सातव्या पिढीचे गायक आहेत.  

 पंडित जसराज यांच्या साथीला गाण्याची संधी श्री. सुहास जोशी याना प्रथम २००८ मध्ये मिळाली. मेवातीच्या तीन पिढ्या म्हणजे पंडित जसराज, पंडिता तृप्ती मुखर्जी आणि सुहास जोशी त्यावेळी एका रंगमंचावर होत्या.  

श्री. सुहास जोशी  गाणे शिकत आहेत तसे  शिकवतही  आहेत. त्यांच्या गाण्याचे लहान मोठे कार्यक्रम गेली १० वर्षे होत असतात. त्यात नाट्य संगीत आणि भजने यांचाही समावेश असतो.  इ प्रसारण या इंटरनेट रेडीओ आणि अन्य रेडीयो वर  त्यानी संगीतावरील भाष्यव्याख्यानाचे  कार्यक्रम करून सर्वसामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे संगीताचे पाठ सादर केले.

  “संगीत साधना ही तीर्थ यात्रा” या भावनेने साधना करणाऱ्याला पारितोषिके, सन्मान यांचे महत्व कमी वाटते. पण श्री. सुहास जोशी याना अनेक सन्मान मिळाले आहेत हे रसिकाला सांगणे अगत्याचे आहे.

संगीत हा “परमेश्वरी प्रसाद” या भावनेने साधना करताना श्री. सुहास जोशी यानी स्वाभाविकपणेच आपला आनंद सर्वांबरोबर वाटून घेतला आहे. त्यांच्या संकेत स्थळावर (www.suhasdjoshi.com) काही बंदिशी सर्वांसाठी मुक्त उपलब्ध आहेत.

‘मेवाती ऑफरीन्ग्ज’ या सी.डी. मध्ये मेवाती शैलीची तिहाई, सरगम आणि आलाप ही वैशिष्ठ्ये प्रत्येक बंदिशीत उतरली आहेत. प्रत्येक बंदिशीच्या प्रारंभी रसिकाला राग भावात सहजतेने नेणारा ओम्कार आणि आलाप आहे. चालीत सहजता आहे आणि शब्दात प्रासादिकता आहे. समयोचित राग आणि शब्द, भावपूर्ण स्वररचना यामुळे श्रवणीयता वाढली आहे.

 गायकाच्या हातात त्याच्या किंवा तिच्या आवाजाची जातकुळी नसते. तो दैवदत्त प्रसाद असतो. पण आवाजाचा उपयोग कसा करावा, आवाजाच्या मर्यादांचा स्वीकार करून. रागाच्या अंतरंगात कसा सूर मारावा, आणि आवाजाचे गुणविशेष रागविस्तारासाठी कसे उपयोगात आणावेत याची जाणकारी असणे आणि गाणे फुलवणे यासाठी चिंतन आणि साधना असावी लागते. या सीडीतील बंदिशीतून  श्री. सुहास जोशी यांनी त्याची चुणूक दाखवली आहे. कुठेही उगाच रस्सीखेच नाही की विद्वत्तेचा आव नाही. म्हणूनच हा मेवाती मेवा रसिकांना नक्कीच आवडेल असा आहे.

                                                              विद्या हर्डीकर सप्रे