महाबंदीतल्या महिषासुरमर्दिनी

पुण्याजवळील फक्त ६५ किलोमीटर अंतरावरील भाग.. वेल्ह्यासारखी लहानमोठी पन्नास गाव. मुख्य व्यवसाय शेतीचा. काही गावात वीजआलेली तर काही गाव अजून अंधारात. ( एकविसाव्या शतकात , पुण्याजवळ  अजून वीज नाही यावर कुणाचा विश्वास बसणार नाही !)  काही ठिकाणी नेटवर्कचे  टॉवर्स .. काही ठिकाणी शाळा. काही गावात दुकाने …पण काही गावात अजून शाळा नाहीत. रस्ते नाहीत. म्हणून लोक पाच किलोमीटर चालत जाऊन  बस   पकडून  मोठ्या गावात जातात.

तीस वर्षे झाली. इथे  पुण्याहून  एक शिकलेली ताई आली.  सुवर्णा तिच नाव. गावातल्या बायकांशी बोलत बोलत , त्यांच्या अडचणी समजून घेत घेत  तिनं  हळू हळू  बचतगट बनवले. बायकांना हिशेब शिकवले. काही बायका बचतगटाचा कारभार करायला शिकल्या. त्यामुळे  आणखी गट वाढले.  ..  सुवर्णताईच काम  कमी झालं. मग तिनं  आजार आणि अडीअडचणींवर लक्ष  घातलं ..   तिच्याबरोबर  डॉकटर  ताई येऊलागल्या. गावातल्या बायका  ब्लडप्रेशर तपासायला शिकल्या. मग  नियमित तपासणी करून फॉर्म भरून फोनवरून पाठवायची जबाबदारी घेऊन  पुण्यातल्या रुग्णालयात पाठवायची व्यवस्था करू लागल्या. ‘ टेली मेडिसिन’ हा  शब्द माहिती नसताना  एक  यंत्रणा  गावच्या  बायकांनी उभी केली.  

शाळेपासून लांब रहाणाऱ्या   मुलींसाठी  एक लहानस वसतिगृह सुरु झालं. 

सावकाश का होईना बचतगटाच्या केंद्राभोवती “ नाही मी एकटी आता । मला मिळाल्यात सख्या । 

अशी भावना उभी होती.  एकेक बळकट  कवच गावाभोवती उभं रहात होत. ग्रामदेवतेच नव्हे तर गावातल्या या महिला देवतांच…. बायका धीट बनत होत्या. नवं  नवं  काही शिकत होत्या. प्रसंगी  एकजुटीने उभं राहून काम करत होत्या. रस्ते नाहीत, वीज नाही म्हणून रडत बसायचं नाही.आहे त्या परिस्थितीतून  मार्ग काढायचा.  एकमेकींच्या  विश्वासानं काम करायची. कोण बॉस नाही, कोणाचा दट्ट्या नाही.    काही अडलं तर सुवर्णाताई होत्याच की शिकवायला !    

एका गावात लहानसा पाण्याचा बंधारा देखील झाला. मग शेती कामाला बरकत आली.

गावातल धान्य पुण्याला जात होत…गावातल्या भाजीपाल्याची पुण्यात विक्री होत होती. कोणी फुलांचे मळे लावून फुल पाठवत होते..      सगळं सुरळीत  चाललं होत. .. 

आणि अचानक आक्रीत झालं.!

कोण कोण म्हणाले .,महामारी आली “ …  अचानक सगळं बंद झालं.  महामारी म्हणजे  काय कळायच्या आतच महाबंदी झाली.

गावात बस येईना. .. दुकान बंद. धान्य बंद.. 

गावातल्या भाज्या पुण्यात जाईनात. घरात पैसा येईना. 

गावातले आजारी गोंधळले. औषधे संपली. आता काय ?  ..  मोठे प्रश्न.  उत्तर कोणाला विचारायची ?  सगळेच गोंधळात.

काही म्हणाले, “ कोण तो करोना ? तो तिकडे दूर.. पुण्यात आहे. आपल्याला काय भय नाय. आपण काही काळजी घ्यायचं कारण नाय.. “  

एका गावात कोणी सापडला .. मग  गावा गावात  घबराट. काही गावकऱयांनी  बाहेरून कोणी येऊ नये म्हणून दगड टाकून रस्ते बंद केले ! … .   

‘महाराष्ट्र बंद झाला. महाबंदी झाली. आता महामारी की उपासमारी ? ‘ 

मग सुवर्णनाताईना फोन केले .. “ आता काय करायचं?  म्हणून नव्हे तर “ ताई आता आपण काय काय करूया असं  सांगण्यासाठी !” 

 बायका आपण होऊन पुढे आल्या. . 

“ जिथं कमी  तिथे आम्ही”

 म्हणून पदर खोचून उभ्या  राहिल्या.. 

गावात  काही मजूर  होते. बाहेरगावचे. ते अडकले.  त्यांच्याकडे  गावाची रेशन कार्डे नव्हती. सरकारने रेशन दिले तरी ते त्यांना  मिळण्याची सोय  नाही. मग काही बायकांनी त्यांची यादी केली. शिधा भरला. 

शिधा भरायचा तर प्लास्टिक पिशव्या नाहीत. दुकाने बंद. मग  काही पुढे आल्या. त्यांनी  साड्या फाडल्या. पिशव्या शिवल्या.  शिधा वाटप सुरु झाले. 

बचत गटाच्या कामाची शिस्त होती. पाहणी करायची.  यादी करायची. हिशेब ठेवायचे.  प्रत्येकीने आपापल्या पाड्यात आणि वस्तीवर  पाहणी करत करत बचतगटाच्या जाळ्याचा उपयोग करत  माहिती जमवली. 

गावात एकल महिला होत्या. म्हातारे होते. गरजू होते. त्यांना शिधा वाटप करताना ३०० कुटुंबात शिधा वाटप झाले. त्यासाठी गावच्या दुकानदारांनी  उधारीवर सामान दिले. कारण बचतगट कामाबद्दल विश्वास. 

पण आता वाणसामान कमी पडायला लागले. लोकांकडे पैसे होते. पण सामान नाही. 

मग सुवर्णताईनी पुण्याहून सामान पाठवले.  सुवर्णताईंचे काम  म्हणताना  गाडीसाठी  पोलिसांनी  पास दिला. वेशीपर्यंत सामान आले.  बायकांनी ते दुकानात पोहोचवले. गावातले दुकान चालू झाले. लोकांची सोय  झाली. 

काही लोकांना औषधे मिळत नव्हती. मग ती पुण्याहून पाठवण्याची व्यवस्था झाली. 

बचतगट महिला, अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर ताई या सर्वानी काम सुरु केले. लक्षात आले,” गावात  घबराट. सांगायला कोणी नाही.”

झटपट सुवर्णनाताईंनी ठरवले, की  आधी ब चत गट प्रमुखाना शिक्षण द्यावे आणि त्यांनी गावागावात जाऊन लोकांना सांगावे.. ‘जाणीव जागृती’  ची मोहीम सुरु करण्यापूर्वी प्रमुखांचे शिक्षण कसे करावे ?  सगळीकडे संचार बंदी. आधी फोनवरून व्हाट्स अप शिकवले. मग झूम मिटिंग कशी करावी याचे शिक्षण दिले. 

महिलांना इंग्रजी येत नव्हते. मग  सुवर्णताईनी  सूचनांची ( instructions )  मराठीत रचना केली.( म्हणजे “ इथे टिक करा”  अशासारखे ) आणि व्हाट्स अप वर धाडून दिले.    

काहींना रेंज येत नव्हते. त्या  वर्गासाठी  पाच सहा किलो मीटर  चालून धरणापर्यंत जात . पण  “आपण हे करायचेच “ हा निश्चय .  गटप्रमुख शिकल्या, त्यांनी  आपापल्या गटाला शिकवले.  मग  सर्वांचे  क रो  ना बद्दल शिक्षण केले. प्रत्येकीला  मास्क आणि  स्वच्छता किट दिले.या करोना योध्या तयार झाल्या.  

“काळजी करु  नका. काळजी घ्या”  या मंत्र घेऊन या आपल्या  साखळी पद्धतीने २० गावातल्या  १५०० लोकांपर्यंत पोहोचल्या.  एका गाडीचा पास काढण्यापासून खटपट करुंन एक  स्पीकर लावलेली गाडी गावागावात फिरवली. शेतावरच्या मजुरांपर्यंत  या कर्णा  गाडीचा संदेश पोहोचला.   काही बायकांनी  माहिती देणारी पत्रके , पोस्टर्स तयार केली.  ग्रामपंचातीसमोर भिंतीवर लावली.  

वेल्हे भागात शाळेपासून लांब असणाऱ्या मुली साठी एक वसतिगृह आहे. ज्ञानप्रबोधिनी ने बांधलेलं. तिथल्या मुलींनी आपापल्या गावात फोन करून अडचणी समजावून घेतल्या. त्यातून बरीच कल्पना आली.      

बाकी ठिकाणी लोकांना काय पाहिजे आहे, काय  अडचणी आहेत    हे समजून घेण्यासाठी एक गुगल फॉर्म तयार केला आणि तो लोकांकडून भरून घेण्याचे काम केले. प्रत्येकीने रोज पाच कुटुंबात जाऊन हा फॉर्म भरून घेतला. 

हे कामही सोपे नव्हते. अगदी शिकलेल्या लोकांनी विचारले की “ आम्हाला करो ना नाही झाला तर फॉर्म कशाला ?” 

काही लोकांना वाटलं की  फॉर्म भरला तर आपल्याला कुठेतरी घेऊन जातील.  काहींना वाटलं ,” आपल्याला हा आजार झाला तर रुग्णालयाची फी परवडणार नाही.. मग आपण लपवून ठेऊ.”    

फॉर्म भरून घेताना लक्षात आलं की  लोकांचे गैरसमज आणि अज्ञान पुष्कळ आहे. सर्वत्र काळजी, आणि संशयाचं वातावरण होतं .  काही ठिकाणी तर दहशत ग्रस्त भागात असल्या सारखं वातावरण. 

त्यामुळे लोकशिक्षण करण्याची गरज जास्त जास्त जाणवत होती. वरच्या स्तरावरून भराभर निर्णय होतात. आदेश काढले जातात. पण अगदी तळाच्या नागरिकापर्यंत ते नीट पोहोचत नाहीत. त्यासाठी हे बचत गटांचं जाळं  किती महत्वाचं आणि उपयुक्त आहे हे पुन्हा एकदा लक्षात आलं.   

सुदैवाने गावोगावच्या पाटलांनी पाठिंबा दिला आणि काम सोपं झालं. 

” तंत्रज्ञानामुळे  व्हाट्स अप वरून गुगल  फॉर्म  पुण्यात गेला. तो पुण्यात बसून सुवर्णताईना   पहाता  येऊ लागला. तसतसे अडचणी निवारण करण्याचे उपाय सुचू लागले.    

सगळ्या  बचत गट महिला माहिती  देऊ लागल्या. मास्क का घालायचा आणि हात का धुवायचे हे नीट समजू लागलं. .  तशात एका अंगणवाडी ताईला करोना ची लागण झाली. पुन्हा घबराट , आणि अफवा ! 

काही अडाणी लोकांनी तिला  कायमच वाळीत टाकावं असं ठरवलं. .. 

शेवटी ती ताई ‘बरी’ होऊन आली आणि स्वतः:च एका झूम मीटिंगमध्ये बोलली.   मग गावकऱ्याना भरवसा वाटू लागला. 

गावातल्या काही लोकांची दारूची पंचाईत… मग घरात मारहाणी सुरु झाल्या. मग झूम मिटिंग वर पोलीस कमिशनरना बोलावलं. त्यांनी काही विषयांवर माहिती दिली. त्यात कौटुंबिक हिंसाचार होता, मुलांचं आरोग्य होत आणि कोविद १९ ची माहिती होती. 

ज्या महिला टेलिमेडिसिन साठी तपासणी करत होत्या, त्या कोविद -१९ साठी तपासणी करून अहवाल पुण्याच्या हॉस्पिटलला पाठवत होत्या. 

काही बायका मास्क बनवू लागल्या. काही म्हणाल्या, “ आपण गावची भाजी पुण्यात विकूया. “ 

सगळी व्यवस्था त्यांनी केली. सकाळी घरोघर  जाऊन भाजी गोळा करायची आणि संध्याकाळी विक्रीचे पैसे चोख पणे घरोघर द्यायचे. वेशीवर भाजीच्या पिशव्या घेऊन जाणारी गाडी थांबे. 

गाडी पुण्यात जाई. तिथून पुढे ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी  घरोघर जात. भाजी देत. भाजीच्या ऑर्डरी एक दिवस आधीच घेतल्या जात. कशा ?  व्हाट्स अप गट करून ! वेल्हे भागातल्या बचत गट महिला आणि पुण्याचे विद्यार्थी यांचा हा संयुक्त उपक्रम. साधी सुधी व्यावसायिक तंत्र वापरून आणि व्हाट्स अँप च तंत्र ज्ञान वापरून ६५०० किलोचा भाजीपाला विकला. आणि दोन लाखांची उलाढाल करून गावात रोख रक्कम आली. 

ना अडत ( दलाली  )  ना गाडीभाडे ..  भाजी वाया गेली नाही. शेतकऱयांचा फायदा वाढला. पुण्यातल्या काही भागातल्या सोसायट्यात ताजी भाजी घरपोच !  

संचारबंदी मुळे  पुण्यातलया सोसायट्यामध्ये “पाव भाजीवर लोणी मिळत नाही “ अशा अडचणींची यादी वाचणारे आणि  तक्रार करणारे सुखवस्तू  ग्राहक खूष  झाले. सर्वानाच सुखाचं झालं. 

तशीच मध्यस्तीची काम सरकारचं  कर्ज  वाटप करून केली. 

पण अजूनही काही घरात उत्पनाच साधन नव्हतं. मग काय ? आणखी काही महिला पुढे आल्या.  कुरडया , पापड आणि गावात पैदा होणारी हळद दळून  पुड्या तयार केल्या. पुन्हा ऑर्डरी घेतल्या आणि पुण्यात विक्री केली. पुन्हा काही लाखांची विक्री केली. 

“आपल्याला मदत करायला सुवर्णताई, बचत गट आणि पुण्याची ज्ञानप्रबोधिनी आहे” हा दिलासा गावकऱ्या ना आला.  युद्धपातळीवर काम करण्याऱ्या  महिला आपल्या गावात आहेत, याची जाणीव झाली. 

‘हातचे ना हात हे कधी सुटायचे । बिकट वाट ही  त री पुढेच  जायचे ।।’ 

या उमेदीनं या महिला  उभ्या राहिल्या आणि त्यांनी उभारी दिली. त्यांनाही वेगळा आत्मविश्वास आला. 

गेल्या तीस वर्षांच्या कामाच्या तपस्येमधून उभं राहिलेलया ग्रामीण स्त्री च वेगळं दर्शन सुवर्णनाताईना झालं !

“business management , needs analysis , resource allocation,  supply chain management, tele medicine.. motivation , commitment,” इत्यादी शब्द न वापरता आलेली ही  आत्मनिर्भरता  !   प्रसंगी आपल्याला लागण होण्याचा धोका पत्करून काम करण्याची हिम्मत आणि निर्भयता !

रुग्णालयातले कर्मचारी, पोलीस, त्यांच्यासारख्याच याही   करोना योध्या !  

 शिधा वाटप आणि अन्य कामासाठी अनेक लोकांनी आर्थिक मदतीचे हात पुढे केले. 

 ज्ञान प्रबोधिनी फौंडेशन (www.jnanaprabodhinifoundation.org)

अमेरिका ही  संस्था ( ५०१ सी अंतर्गत नोंदणी केलेली)   अशा गावोगावच्या कामासाठी निधिसंकलन  करत आहे.यातून महाराष्ट्रात मदत केली जात आहे.

 हे युद्ध अजून संपले नाही. आता काही दीर्घ मुदतीच्या कामांची आवश्यकता आहे. गावोगावच्या शाळा सुरु ठेवायच्या आहेत. ‘लर्न इंडिया’ ही  मोहीम आम्ही सुरु केली आहे. 

संचारबंदीत आणि विपरीत परिस्थितीत या महिलांनी संधी कशा शोधल्या, जनसंपर्क कसा केला, आणि ‘मायक्रोलेव्हल’ वर  विधायक कामांच जाळं  कसं विणल   ही कहाणी म्हणजे महिषासुर मर्दिनीची कहाणी . 

विद्या हर्डीकर सप्रे

 

एक अनोखी नर्मदा जयंती

कोणाबरोबर कसे धागे जुळतात ते बाहेरून नाही सांगता येत.. कालिदासाच्या एका श्लोकाचा चरण आठवतो आहे. कालिदास म्हणतो ,” ‘ भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि॥ “
या श्लोकाचा मतितार्थ असा आहे, की काही पूर्व जन्मीच्या परस्पर संबंधांचे संस्कार आपल्या जीवावर कोरलेले असतात. त्यामुळे ‘ कुणाशी आपले कसे धागे जुळतात ते सांगता येत नाही.
भारती ठाकूर यांचेशी माझे धागे जुळले ते असेच.. २०१८ ! पुण्यात कोणाघरी त्यांचे नर्मदा परिक्रमा पुस्तक हाती पडले.
“आयुष्यात आपण कधीतरी नर्मदा परिक्रमा करू “ असा एक विचार मी लहानपणी कुण्या एकाची भ्रमण गाथा नावाचं गो. नि. दांडेकरांचं पुस्तक वाचून केला होता. त्यामुळे हे पुस्तक मी प्रेमाने वाचायला घेतलं.
परिक्रमेचे विलक्षण अनुभव वाचून मी भारावले काय आणि लेखिकेला इमेल लिहून कळवले काय ! माझी इमेल वाचून भारती ठाकूर यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या,” तुम्ही या ना आमच्या N. A. R . M .A .D A ला भेट द्या ..
मी नकळत बोलून गेले, “ यंदा वेळ नाही. पण पुढच्या वेळी भारतात आले की नक्की !”
योगायोग असा की , २०१९ मध्ये अचानक भारतभेटीचा योग आला. मनात कुठेतरी माझे आश्वासन तरळत होते. पण इंदूर, नर्मदा हे सर्व आमच्या वेळापत्रकात कुठे नव्हते.. “पुढच्या वेळी बसवू “ असे मी मनाला आश्वासन देत होते, त्याच दिवशी घरी एक विवाह निमंत्रण पत्रिका आली. विवाह इंदूरला होता. पाच फेब्रुवारी २०२० चा मुहूर्त.. रात्रीच्या अवंतिका एक्क्सप्रेस चे ३१ जानेवारीचे आरक्षण मिळाले. मी गुगल नकाशा उघडून “लेपा “ इंदूरच्या किती जवळ ते शोधू लागले. दोन दिवस हातात होतेच.. भारती ठाकूर यांना दूरध्वनी लावला.
“अहो, काय योगायोग ! १ फेब्रुवारीला नर्मदा जयंती आहे.. आमच्याकडे कार्यक्रम आहे. तेव्हा तुम्ही गाडीतून उतरलात की इकडेच या.. “
नर्मदा जयंतीचा योग. म्हणजे नर्मदेला साडी नेसवून तिची पूजा करतात आणि रात्री तिच्या पात्रात दिवे सोडतात. हजारो परिक्रमावासी जा ये करत असतात.
ते सगळं पुस्तकात वाचलं होत. पण ते .वाचताना तेव्हाही मला भारतीलाच भेटावं का वाटलं ? कारण परिक्रमेच्या वाटेवरची माणसं वाचत जाताना महाराष्ट्रातल्या भारतींनं नर्मदामैयाच्या कुशीतल्या निरागस बालकांना आपल्या कुशीत घेतलं आणि तिथे मध्यप्रदेशात शाळा सुरु केल्या, ते अनुभव मला जास्त आपलेसे वाटले !.

नर्मदा जयंतीची सकाळ.

अवंतिका एक्स्प्रेसमधून इंदूरला उतरलो आणि प्रवासी गाडी करून थेट लेपा गावात पोहोचलो तेव्हापासूनचा हा दिवस …शाळेचं उत्सवी सभागृह.. अभ्यागतांच्या गर्दीने सजलेलं. नर्मदा जयंतीच्या समारंभात भिजलेलं. सुमित्रा महाजन प्रमुख पाहुण्या .बोलत होत्या नर्मदेबद्दल. स्त्री शक्तीला केलेलं तेआवाहन. नंतर भारती ठाकूर उभ्या राहिल्या आणि त्यांनी नर्मदा महात्म्य निमित्ताने इको सिस्टीम उलगडून दाखवली… तेव्हा मनात आलं, अरे हीच ती नर्मदा मैया ! तिच्या दर्शनासाठी तर आपण आलो. ती माझी भारतीताई ठाकुरांशी प्रत्यक्ष भेट.

सकाळचा कार्यक्रम संपला आणि आम्ही सगळेच भोजनाला निघालो. भारतीताई सगळीकडे लगबग करत होत्या.पाहुण्यांना हवं नको पहात होत्या. त्यांचे सगळे विद्यार्थी चोख व्यवस्था ठेवत होते. भारतीताईंच्या कामाचं स्वरूप न सांगताही दिसत होत. संध्याकाळचा कार्यक्रम सुरु व्ह्यायला मध्ये वेळ होता. तेवढ्या मधल्या वेळात भारतीताई आम्हाला प्रार्थना मंदिरात घेऊन आल्या. मंदिरात रामकृष्ण आणि शारदादेवी ठाकूर यांची छायाचित्र. “जनता जनार्दनाची सेवा ही खरी सेवा “ सांगणाऱ्या रामकृष्णांनी आपला वरदहस्त भारतीताईंवर ठेवला आहे! नंतर स्वामी रंगनाथानंदानी आशीर्वाद देतानाही “ राष्ट्र हीच तुझी देवता आहे, तिचीच सेवा कर”, असा आशीर्वाद दिला.

स्वामी विवेकानंदांचे विचार वाचत वाचत माणसाचं माणूसपण शोधत त्यांनी आसामच्या दुर्गम भागात विवेकानंदकेंद्राची शाळा चालवण्याचा अनुभव घेतला, ती कदाचित त्यांच्या सेवेची पहिली पायरी असेल… नंतर स्वतःचं शिक्षण आणि उत्तम सरकारी नोकरी आणि नाशिकला मजेत आयुष्य चाललं होत; ते सोडून देऊन नर्मदेच्या तीरावर कुठेतरी जंगलात एकटीनं शाळा सुरु करण्याचं धाडस आणि धडपड म्हणजे त्यांच्या जीवनव्रताची अखंड परिक्रमा!

भारतीताईच्य या जीवन परिक्रमेची सुरवात झाली एका नर्मदापरिक्रमेच्या निमित्ताने !
खरं म्हणजे एका सुखवस्तू कुटुंबातल मजेत चाललेलं आयुष्य आणि संरक्षण खात्यातली उत्तम नोकरी चालू असताना चार सहा महिने काट्याकुट्यातून आणि जंगलातून चालत जाण्याची नर्मदा परिक्रमा करण्याचा विचारसुद्धा कोणी करत नसेल. कोणी निसर्गप्रेमी असेल तर फार फार म्हणजे पक्षी निरीक्षण, गिर्यारोहण, असे धाडसी बेत लोक करतात.
भारतीताई सुट्ट्या घेऊन हे सगळे उद्योग करत होत्याच. पण आतमध्ये काहीतरी खटकत होत. दोन हजार पाच मध्ये त्यांना वाटू लागलं की आयुष्यात काय मिळवलं, काय करायचं आहे? याचं काही चिंतन करावं… कालिदासाचा एक श्लोक आहे की ‘सगळं छान चालू असताना माणसाला सुखासुखी एक अनामिक हुरहूर लागते.. ‘ तशी ती हुरहूर होती.. ओढ होती. कुठल्यातरी अंतस्थ प्रेरणेने त्यांना मग नर्मदा परिक्रमेचा विचार आला. धाडस, पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग … सगळ्या हौशी पूर्ण करण्याची ती एक संधी होतीच. मग निघाली भारती आपल्या आणखी दोन मैत्रिणींना घेऊन ..
नर्मदेकाठी अनेक स्तिमित करणारे अनुभव येतात, अनेक माणसे भेटतात. परिक्रमेनंतर आपलं आयुष्य बदलत असं लोक सांगतात. पुस्तक लिहितात. “ हे पुस्तक वाचून मलाही परिक्रमा करावीशी वाटली” असे उमाळे येणारे आणि अभिप्राय देणारे माझ्यासारखे वाचक असतात. ( गो. नी . दांडेकरांचं पुस्तक वाचल्यावर बाळपणीच मलाही तस वाटलं होत.!!) . पाण्यावर मारलेली रेघ मिटून जाते आणि तिकडे नर्मदा मैया संथ वाहात रहाते आणि इकडे आपलं आयुष्यही सुखासीनपणे वाहात असत….
भारतीताईनाही अनेक अनुभव आले.. त्यांनी अनेक माणसे वाचली…पण त्याचवेळी डोळसपणे परिस्थिती पहात होत्या.जग एकविसाव्या शतकात चालले आहे त्याचा तिथे मागमूसही नाही. अंधाराचं निबिड जंगल आहे. दारिद्र्य तर मुंबईच्या रस्त्यावरही दिसतच. आपण ते पहात निर्ढावलेले असतो. पण इथल्या गावागावातली परिस्थिती अस्वस्थ करणारी ! दारू, जुगार स्त्रियांवर होणारे अत्याचार, बाल-विवाह, कुपोषित मुले, स्त्रियांचे आरोग्य हे सगळं बघून त्यांचं संवेदनाशील अंत:करण व्यथित होत होत. उपासमारीने गांजलेल्या मुलांना बोथट करण्यासाठी गुटका दिला जातो आणि त्या व्यसनाचा विळखा बघताबद्घता त्यांना आवळतो … सरकारी शाळांची अवस्था दयनीय! आठवी पर्यंत शिक्षण झालेल्या मुलांना स्वत:च नावही लिहिता येऊ नये ही अवस्था! या सर्व चक्रातून बाहेर पडण्याची कुणाची इच्छा शक्ती नाही, तो विचारही नाही. “गांव में तो ऐसा ही होता है दीदी’, असं सांगणारे अगतिक आणि लाचार लोक!. ताईंना जाणवलं, की या गोष्टींवर वरवरच्या मलमपट्टीचा काही उपयोग होणार नाही. यांच्या मुळावरच घाव घालायचा आणि त्यासाठी शिक्षण हा एकच उपाय आहे. त्यातूनच विचार प्रक्रिया घडेल तेव्हा परिवर्तन होईल…
बाह्य परिक्रमा पूर्ण झाली , पण ही अंतर्मनातील परिक्रमा परतल्यावरही चालू राहिली. शेवटी चार वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये उत्तम नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन नाशिकचा सुखवस्तू आयुष्याचा बंगला सोडून मध्यप्रदेशात निमाड प्रांतातील मंडलेश्वर येथे एक खोली भाड्याने घेऊन रोज 16 किलोमीटर पायी चालत जाऊन ‘लेपा’ येथे.लेपा येथील 6 मुलांना शिकवण्याचे काम भारतीने सुरु केले. नाशिकची गोदावरी मध्यप्रदेशातल्या नर्मदेला येऊन मिळाली. सौम्य स्वभाव; पण कणखर इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी हे भांडवल बरोबर .
स्वतः:साठी जगणे सोडले आणि खऱ्या अर्थाने त्यांची नर्मदा परिक्रमा – नर्मदा सेवा सुरु झाली. ‘नर्मदालयाचा ’ तो उगम ! गरिबी ,अज्ञान ,कुपोषण याने पिचलेल्या कुटुंबात मुलांना शाळेत न घालता शेती,पशुपालन, घरकाम व लाकूडफाटा गोळा करणे अशा कामांना लावून शालेय शिक्षणापासून वंचित ठेवले जाते; त्या मुलांना शाळेची ओढ लावणे आणि त्यांच्या पालकांना पटवणे हे काम दुर्गम होते.
आठ-आठ दहा-दहा मैल पायपीट करायची, कारण या गावांमधे बसेस देखील नव्हत्या आणि आजही नाहीत. घरोघरी जाऊन गावातील स्त्रियांना भेटून मुलांना शाळेत पाठविण्याचा आग्रह करायचा. लेपा नावाच्या गावात त्यांना कष्टानेच एका धर्मशाळेचा हॉल मिळाला व सकाळी आठ ते साडे दहा या वेळेत शाळा सुरु झाली. गाणी, कविता, नृत्य खेळ, छोटी गणितं इ. त्या शिकवू लागल्या. स्वच्छतेचं महत्व सांगू लागल्या. त्याच गावातील थोडया फार शिकलेल्या मुलींची मदत त्यांना मिळू लागली. मुलांना शाळा आवडू लागली. ‘ इथं काही तरी छान घडतयं’ असं गावात लोकांना जाणवलं … आसपासच्या गावापर्यंत या कामाचा दरवळ पसरला. ‘आपल्या गावातही अशी शाळा पाहिजे ‘ असं लोकांना वाटलं. आता हे काम एकट्या माणसाचं नव्हतं. मग ,काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन “नर्मदा” या नावानं संस्थेची नोंदणी केली. (Narmada-Nimar Abhyuday Rural Management and Development Association)
भारतीताईंचे परिक्रमेचे अनुभव गौतमी प्रकाशन तर्फे पुस्तक रूपात प्रकाशित झाले. बघता-बघता पुस्तकाच्या आठ नऊ आवृत्या संपल्या. लोकांना पुस्तक आवडले व ते वाचून मदतीचे हातही संस्थे कडे

येऊ लागले .गावातल्याच एका साधुबाबांनी ताईंचं काम बघून पाच हजार चौरस फूट जागेवर बांधलेला एक आश्रम त्यांना दानपत्र लिहून दान म्हणून दिला! ‘जनता जनार्दनाने’ दिलेला तो आशीर्वाद !
कुपोषित मुलांस अभ्यासात रुची निर्माण व्हावी म्हणून माध्यान्ह सकस व गरम भोजन मुलांना दिले जाऊ लागले.मुलांना खरूज असे , दारूची देखील व्यसने लावलेली असत.. बाजूला नर्मदेचा अथांग प्रवाह.. पण आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही प्रवाहांपासून ही मुले कोसो दूर आहेत. हसत खेळत शिक्षणाने त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला. आणि व्यसनमुक्तीही होऊ लागली. मुलांच्या शेती, मजुरी च्या कामातूनच त्यांना जीवनशिक्षण कसे मिळेल याचा विचार भारती ताईनी केला. ‘त्यातून संस्कार होतात आणि आपुलकी सारख्या माणुसकीच्या भावना रुजतात. बेगडी शिक्षणातून जीवनविकास खुंटतो.’ यावर भारतीताईचा विश्वास आणि तसा भर त्यांनी त्यांच्या शिक्षणात दिला आहे.
गावातील मुलांचे शिक्षण आठवी-नववी नंतर थांबते. गावात शाळा नाही हे लक्षात घेऊन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचीही सुरुवात झाली आहे. काही हुशार मुलांना पाबळ (महाराष्ट्र) येथे विज्ञानाश्रमात तांत्रिक शिक्षणासाठी पाठविले. भाभा परमाणु अनुसंधान केंद्र, मुंबई यांच्या ग्रामीण तंत्रज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सोलर ड्रायरचे उत्पादन देखील ही मुले करतात. भाभा परमाणु अनुसंधान केंद्राच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाशी संलग्नता असलेलं संपूर्ण मध्य भारतातलं हे एकमेव केंद्र आहे. या केंद्राचे उद्घाटन देखील पद्म विभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं.
आदिवासी मुलांमध्ये ताल आणि संगीत उपजतच रुजलेले असते. म्हणून लेपाच्या शाळेत मुलांना संगीताचे शिक्षण सुरु केले. . पहिली ते आठवीच्या सरकारी शाळेच्या पाठ्य पुस्तकातल्या सर्व हिंदी कविताना चाली देऊन त्याचा एक सुरेख वाद्यवृंद या मुलांचा तयार झाला आहे. त्याचे कार्यक्रम महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये अनेक ठिकाणी झालेत. कवितां बरोबरच आदी शंकराचार्य आणि स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या अनेक स्तोत्त्रं स्वर बद्ध करून त्याचाही एक वाद्यवृंद ही मुलं सादर करतात. अशा प्रकारचा हा भारतातला पहिला वाद्यवृंद असावा. अनेक नामवंत कलाकारांनी आणि गुणीजनांनी या वाद्यवृंदाचे भरपूर कौतुक केलेले आहे नर्मदालय या संस्थेचा प्रवाह गेली दहा वर्षे असा समाजाच्या पाठबळावर व स्वतः भारती ताईंच्या तन मन धन या बळावर होत आहे.
२००9 सालापासून सुरु झालेला हा प्रवाह कधी धडधडत, कधी थोडा हळू तर कधी अडथळे पार करीत निरनिराळी वळणे घेऊन आज इथवर येऊन पोहचलाय !
आज नर्मदालयात सतराशे मुले शिकतात. पंधरा खेड्यात हा शिक्षणाचा प्रवाह पोहोचला आहे. नर्मदालय परिवारामधे 40 शिक्षिका व 8 प्रकल्प समन्वयक आणि 8 अन्य सहकारी आहेत. मध्य प्रदेश शिक्षण मंडळाशी संलग्न तीन औपचारिक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. . 60 मुले आश्रमात राहून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेताहेत. शिक्षक म्हणून आजूबाजूच्या महिलांनाच प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. मुलांना शिक्षण दिल्यावर त्यांनी पुढे कुठे जायचे ? त्यासाठी गावात आणि परिसरातच त्यांना काय काम देता येईल याचा विचार केला जातो. खेड्यातून शहरात जाणारे स्थलांतर थोपवले जाते.
संस्थेने स्वतःची गोशाळा राखून त्या गुरांची देखभाल मुले करतात. मुले संस्थेतील फर्निचर उत्तम बनवतात, राघव तर कमर्शिअल पायलट असून संस्थेचे कार्य सांभाळतात, राघव व शंकर यांचा सोलर ड्रायर वरील शोध निबंध सातासमुद्रापार पोर्तुगाल येथे 80 देशांच्या प्रतिनिधींसमोर सादर केला गेला.

मुले रझया,पिशव्या,स्कार्फस,विणकाम,भरतकाम केलेल्या वस्तू यांच्या प्रदर्शनातून व विक्रीतून संस्थेच्या खर्चास हातभार लावतात.

जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांनी लेपा येथे शाळेची अत्यंत डौलदार अशी वास्तु उभारून दिली आहे. भटयाण नावाच्या गावात नर्मदा मैयाच्या तटावर नर्मदालयाची स्वत: ची सुंदर वास्तू डौलात उभी राहिली आहे. रोजचा 400 मुलांना रोज पौष्टिक आहार दिला जातो. २०१५ सालापासून ‘रामकृष्ण सारदा निकेतन’ या नावाने या तिन्ही शाळा आहेत. भारतीताईच्या कल्पनेतील या शाळा आहेत . निसर्गाच्या सान्निध्यात झाडं, फुलं, फुलपाखरं, पाऊस, भुंगे, हिरवळ इ. बरोबर हसत खेळत शिक्षण, ही कल्पना, मुलांच्यात असलेल्या मूलभूत प्रवृत्ती ओळखून, त्यांच्यातील कलागुणांचा विचार करून त्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं जावं, असं शिक्षण.
थोडक्यात, संगणक,विज्ञान,प्रयोग,जीवन शिक्षण,स्वावलंबन,व औपचारिक शिक्षण यांच्या सुंदर मिलाफातून एक आदर्श अभ्यासक्रम भारती ताईंनी निर्माण केला आहे.
एकेकाळी नाशिकहून आलेल्या या ‘परक्या’ असलेल्या ‘ एकट्या’ भारतीताईना आज सगळ्या भागातल्या लोकांचा विश्वास आणि पाठबळ मिळालं आहे. हा प्रवास सोपा नव्हता ; तर नर्मदा परिक्रमेइतकाच दुर्गम होता. . भारती ताईंचे अथक परिश्रम, प्रत्येक मुलाला समजून घेण्याची त्यांची हातोटी, सौम्य स्वभावाच्या असूनही आवश्यक तेथे कठोर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता, गुरु निष्ठा इत्यादी बघून थक्क व्हायला होतं. भागात कोणाला काही झालं, कोणी बाळंतीण होणारी बाई अडली तर स्वतः: ट्रक द्राईव्ह करून जाण्याची त्यांची हिंमत आहे. जनताजनार्दनाची सेवा त्यांच्या नसानसात आहे.

नर्मदा जयंतीची संध्याकाळ.

आम्ही लेपाहून महेश्व्रर ला पोहोचलो आहोत. अस्ताला टेकलेला सूर्य नर्मदेच्या पाण्यात सूर मारायच्या तयारीत आहे.. शांत, निर्मल आणि भव्य असं संथ पाणी.. मध्यभागी एक चिमुकलं मंदिर दिसत आहे.. पलीकडे एक लहानसा घाट आणि दोन लहान नावा..

आज नर्मदा जयंतीचा योग. नर्मदेला साडी नेसवून तिची पूजा झाली आहे.. मर्मदेच्या पात्रात दिवे सोडायची वेळ.. . आम्ही रात्री मुद्दामच महेश्ववरर घाटावरच्या मुख्य गर्दीपासून दूर एका लहानशा घाटावर थांबलो आहोत. . नर्मेदेच्या आरतीचे स्वर पाण्यात तरंगत आहेत आणि मनात दिवसभराचा नाद घुमतो आहे. हळूहळू पाण्यावर चिमुकले दिवे दिसू लागले आहेत. मी सुद्धा नर्मदे हर म्हणत पाण्यात एक दिवा सोडून देते. मनात एक चिन्मय शांत दिवा तेवत आहे…

त्या भारलेल्या मनाने आम्ही आमच्या मुक्कामाच्या आश्रमाच्या दिशेने वळतो. पुण्याच्या वृंदाताईचा हा आश्रम. रमणीय आणि शांत. मध्यभागी उपासनामंदिर. दाराला कदंब वृक्षाचे चित्र. आकाश चांदण्यांनी लखलखलेले. आम्ही सगळे एक एक दिवा ठेवत अंगणात दिव्यांची रांगोळी काढतो.

“Amidst your numberless stars | let me place my own little lamp” अशी रवींद्रनाथ ठाकुरांची कविता मनात लुकलुकतेआहे. तशी भारती ठाकूर च्या आठवणींची तेजस्वी तारकाही. दिवसभराची सगळीच क्षणचित्र त्यात उजळून गेली आहेत आणि मनात त्यांच्या आठवणी झंकारत आहेत.

तमाकडून तेजाकडे जाणारे हे इवले दिवे पहाताना मला भारतीताईनी नर्मदेच्या पात्रात सोडलेल्या दिव्यांचा विलक्षण प्रवास डोळ्यासमोर येतो आहे. .. त्यांचं पुस्तक वाचताना मला नर्मदा परिक्रमा करण्यापेक्षा .. नर्मदा मैयाची भेट घेण्यापेक्षा या.. लेखिकेलाच भेटावं का वाटलं ? कारण परिक्रमेच्या वाटेवरची माणसं वाचत जाताना महाराष्ट्रातल्या भारतींनं मैयाच्या कुशीतल्या निरागस बालकांना आपल्या कुशीत घेतलं आणि तिथे मध्यप्रदेशात शाळा सुरु केल्या, ते अनुभव मला जास्त आपलेसे वाटले !.
.भारतीताई आणि त्यांची संस्था पहाण्याची लहानशी इच्छा यंदा इतक्या योगायोगाने पूर्ण झाली ,की ते दिवे पहाताना आजच्या सगळ्या दिवसाच्या प्रवासावर विश्वासच बसत नाही !


विद्या हर्डीकर सप्रे, कॅलिफोर्निया

टीप : भारतीताईच्या कामासाठी कोणाला देणगी पाठवायची असल्यास आता अमेरिकेत IDRF या संस्थेतर्फे ती पाठवता येते. ( www.idrf.org) देणगी पाठवताना N. A R M A D A साठी आहे असे नमूद करावे. नर्मदालयाला भेट अवश्य द्यावी.
‘नर्मदा’ ( N. A R M A D A ) या संस्थेचा पत्ता:
Address : Narmadalaya, Plot 149, Lepa Punarvas, Tehsil- Kasrawad, District- Khargone, Madhya Pradesh, India. email: naramdalaya@gmail.com, www.narmadalaya.org