महाबंदीतल्या महिषासुरमर्दिनी

पुण्याजवळील फक्त ६५ किलोमीटर अंतरावरील भाग.. वेल्ह्यासारखी लहानमोठी पन्नास गाव. मुख्य व्यवसाय शेतीचा. काही गावात वीजआलेली तर काही गाव अजून अंधारात. ( एकविसाव्या शतकात , पुण्याजवळ  अजून वीज नाही यावर कुणाचा विश्वास बसणार नाही !)  काही ठिकाणी नेटवर्कचे  टॉवर्स .. काही ठिकाणी शाळा. काही गावात दुकाने …पण काही गावात अजून शाळा नाहीत. रस्ते नाहीत. म्हणून लोक पाच किलोमीटर चालत जाऊन  बस   पकडून  मोठ्या गावात जातात.

तीस वर्षे झाली. इथे  पुण्याहून  एक शिकलेली ताई आली.  सुवर्णा तिच नाव. गावातल्या बायकांशी बोलत बोलत , त्यांच्या अडचणी समजून घेत घेत  तिनं  हळू हळू  बचतगट बनवले. बायकांना हिशेब शिकवले. काही बायका बचतगटाचा कारभार करायला शिकल्या. त्यामुळे  आणखी गट वाढले.  ..  सुवर्णताईच काम  कमी झालं. मग तिनं  आजार आणि अडीअडचणींवर लक्ष  घातलं ..   तिच्याबरोबर  डॉकटर  ताई येऊलागल्या. गावातल्या बायका  ब्लडप्रेशर तपासायला शिकल्या. मग  नियमित तपासणी करून फॉर्म भरून फोनवरून पाठवायची जबाबदारी घेऊन  पुण्यातल्या रुग्णालयात पाठवायची व्यवस्था करू लागल्या. ‘ टेली मेडिसिन’ हा  शब्द माहिती नसताना  एक  यंत्रणा  गावच्या  बायकांनी उभी केली.  

शाळेपासून लांब रहाणाऱ्या   मुलींसाठी  एक लहानस वसतिगृह सुरु झालं. 

सावकाश का होईना बचतगटाच्या केंद्राभोवती “ नाही मी एकटी आता । मला मिळाल्यात सख्या । 

अशी भावना उभी होती.  एकेक बळकट  कवच गावाभोवती उभं रहात होत. ग्रामदेवतेच नव्हे तर गावातल्या या महिला देवतांच…. बायका धीट बनत होत्या. नवं  नवं  काही शिकत होत्या. प्रसंगी  एकजुटीने उभं राहून काम करत होत्या. रस्ते नाहीत, वीज नाही म्हणून रडत बसायचं नाही.आहे त्या परिस्थितीतून  मार्ग काढायचा.  एकमेकींच्या  विश्वासानं काम करायची. कोण बॉस नाही, कोणाचा दट्ट्या नाही.    काही अडलं तर सुवर्णाताई होत्याच की शिकवायला !    

एका गावात लहानसा पाण्याचा बंधारा देखील झाला. मग शेती कामाला बरकत आली.

गावातल धान्य पुण्याला जात होत…गावातल्या भाजीपाल्याची पुण्यात विक्री होत होती. कोणी फुलांचे मळे लावून फुल पाठवत होते..      सगळं सुरळीत  चाललं होत. .. 

आणि अचानक आक्रीत झालं.!

कोण कोण म्हणाले .,महामारी आली “ …  अचानक सगळं बंद झालं.  महामारी म्हणजे  काय कळायच्या आतच महाबंदी झाली.

गावात बस येईना. .. दुकान बंद. धान्य बंद.. 

गावातल्या भाज्या पुण्यात जाईनात. घरात पैसा येईना. 

गावातले आजारी गोंधळले. औषधे संपली. आता काय ?  ..  मोठे प्रश्न.  उत्तर कोणाला विचारायची ?  सगळेच गोंधळात.

काही म्हणाले, “ कोण तो करोना ? तो तिकडे दूर.. पुण्यात आहे. आपल्याला काय भय नाय. आपण काही काळजी घ्यायचं कारण नाय.. “  

एका गावात कोणी सापडला .. मग  गावा गावात  घबराट. काही गावकऱयांनी  बाहेरून कोणी येऊ नये म्हणून दगड टाकून रस्ते बंद केले ! … .   

‘महाराष्ट्र बंद झाला. महाबंदी झाली. आता महामारी की उपासमारी ? ‘ 

मग सुवर्णनाताईना फोन केले .. “ आता काय करायचं?  म्हणून नव्हे तर “ ताई आता आपण काय काय करूया असं  सांगण्यासाठी !” 

 बायका आपण होऊन पुढे आल्या. . 

“ जिथं कमी  तिथे आम्ही”

 म्हणून पदर खोचून उभ्या  राहिल्या.. 

गावात  काही मजूर  होते. बाहेरगावचे. ते अडकले.  त्यांच्याकडे  गावाची रेशन कार्डे नव्हती. सरकारने रेशन दिले तरी ते त्यांना  मिळण्याची सोय  नाही. मग काही बायकांनी त्यांची यादी केली. शिधा भरला. 

शिधा भरायचा तर प्लास्टिक पिशव्या नाहीत. दुकाने बंद. मग  काही पुढे आल्या. त्यांनी  साड्या फाडल्या. पिशव्या शिवल्या.  शिधा वाटप सुरु झाले. 

बचत गटाच्या कामाची शिस्त होती. पाहणी करायची.  यादी करायची. हिशेब ठेवायचे.  प्रत्येकीने आपापल्या पाड्यात आणि वस्तीवर  पाहणी करत करत बचतगटाच्या जाळ्याचा उपयोग करत  माहिती जमवली. 

गावात एकल महिला होत्या. म्हातारे होते. गरजू होते. त्यांना शिधा वाटप करताना ३०० कुटुंबात शिधा वाटप झाले. त्यासाठी गावच्या दुकानदारांनी  उधारीवर सामान दिले. कारण बचतगट कामाबद्दल विश्वास. 

पण आता वाणसामान कमी पडायला लागले. लोकांकडे पैसे होते. पण सामान नाही. 

मग सुवर्णताईनी पुण्याहून सामान पाठवले.  सुवर्णताईंचे काम  म्हणताना  गाडीसाठी  पोलिसांनी  पास दिला. वेशीपर्यंत सामान आले.  बायकांनी ते दुकानात पोहोचवले. गावातले दुकान चालू झाले. लोकांची सोय  झाली. 

काही लोकांना औषधे मिळत नव्हती. मग ती पुण्याहून पाठवण्याची व्यवस्था झाली. 

बचतगट महिला, अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर ताई या सर्वानी काम सुरु केले. लक्षात आले,” गावात  घबराट. सांगायला कोणी नाही.”

झटपट सुवर्णनाताईंनी ठरवले, की  आधी ब चत गट प्रमुखाना शिक्षण द्यावे आणि त्यांनी गावागावात जाऊन लोकांना सांगावे.. ‘जाणीव जागृती’  ची मोहीम सुरु करण्यापूर्वी प्रमुखांचे शिक्षण कसे करावे ?  सगळीकडे संचार बंदी. आधी फोनवरून व्हाट्स अप शिकवले. मग झूम मिटिंग कशी करावी याचे शिक्षण दिले. 

महिलांना इंग्रजी येत नव्हते. मग  सुवर्णताईनी  सूचनांची ( instructions )  मराठीत रचना केली.( म्हणजे “ इथे टिक करा”  अशासारखे ) आणि व्हाट्स अप वर धाडून दिले.    

काहींना रेंज येत नव्हते. त्या  वर्गासाठी  पाच सहा किलो मीटर  चालून धरणापर्यंत जात . पण  “आपण हे करायचेच “ हा निश्चय .  गटप्रमुख शिकल्या, त्यांनी  आपापल्या गटाला शिकवले.  मग  सर्वांचे  क रो  ना बद्दल शिक्षण केले. प्रत्येकीला  मास्क आणि  स्वच्छता किट दिले.या करोना योध्या तयार झाल्या.  

“काळजी करु  नका. काळजी घ्या”  या मंत्र घेऊन या आपल्या  साखळी पद्धतीने २० गावातल्या  १५०० लोकांपर्यंत पोहोचल्या.  एका गाडीचा पास काढण्यापासून खटपट करुंन एक  स्पीकर लावलेली गाडी गावागावात फिरवली. शेतावरच्या मजुरांपर्यंत  या कर्णा  गाडीचा संदेश पोहोचला.   काही बायकांनी  माहिती देणारी पत्रके , पोस्टर्स तयार केली.  ग्रामपंचातीसमोर भिंतीवर लावली.  

वेल्हे भागात शाळेपासून लांब असणाऱ्या मुली साठी एक वसतिगृह आहे. ज्ञानप्रबोधिनी ने बांधलेलं. तिथल्या मुलींनी आपापल्या गावात फोन करून अडचणी समजावून घेतल्या. त्यातून बरीच कल्पना आली.      

बाकी ठिकाणी लोकांना काय पाहिजे आहे, काय  अडचणी आहेत    हे समजून घेण्यासाठी एक गुगल फॉर्म तयार केला आणि तो लोकांकडून भरून घेण्याचे काम केले. प्रत्येकीने रोज पाच कुटुंबात जाऊन हा फॉर्म भरून घेतला. 

हे कामही सोपे नव्हते. अगदी शिकलेल्या लोकांनी विचारले की “ आम्हाला करो ना नाही झाला तर फॉर्म कशाला ?” 

काही लोकांना वाटलं की  फॉर्म भरला तर आपल्याला कुठेतरी घेऊन जातील.  काहींना वाटलं ,” आपल्याला हा आजार झाला तर रुग्णालयाची फी परवडणार नाही.. मग आपण लपवून ठेऊ.”    

फॉर्म भरून घेताना लक्षात आलं की  लोकांचे गैरसमज आणि अज्ञान पुष्कळ आहे. सर्वत्र काळजी, आणि संशयाचं वातावरण होतं .  काही ठिकाणी तर दहशत ग्रस्त भागात असल्या सारखं वातावरण. 

त्यामुळे लोकशिक्षण करण्याची गरज जास्त जास्त जाणवत होती. वरच्या स्तरावरून भराभर निर्णय होतात. आदेश काढले जातात. पण अगदी तळाच्या नागरिकापर्यंत ते नीट पोहोचत नाहीत. त्यासाठी हे बचत गटांचं जाळं  किती महत्वाचं आणि उपयुक्त आहे हे पुन्हा एकदा लक्षात आलं.   

सुदैवाने गावोगावच्या पाटलांनी पाठिंबा दिला आणि काम सोपं झालं. 

” तंत्रज्ञानामुळे  व्हाट्स अप वरून गुगल  फॉर्म  पुण्यात गेला. तो पुण्यात बसून सुवर्णताईना   पहाता  येऊ लागला. तसतसे अडचणी निवारण करण्याचे उपाय सुचू लागले.    

सगळ्या  बचत गट महिला माहिती  देऊ लागल्या. मास्क का घालायचा आणि हात का धुवायचे हे नीट समजू लागलं. .  तशात एका अंगणवाडी ताईला करोना ची लागण झाली. पुन्हा घबराट , आणि अफवा ! 

काही अडाणी लोकांनी तिला  कायमच वाळीत टाकावं असं ठरवलं. .. 

शेवटी ती ताई ‘बरी’ होऊन आली आणि स्वतः:च एका झूम मीटिंगमध्ये बोलली.   मग गावकऱ्याना भरवसा वाटू लागला. 

गावातल्या काही लोकांची दारूची पंचाईत… मग घरात मारहाणी सुरु झाल्या. मग झूम मिटिंग वर पोलीस कमिशनरना बोलावलं. त्यांनी काही विषयांवर माहिती दिली. त्यात कौटुंबिक हिंसाचार होता, मुलांचं आरोग्य होत आणि कोविद १९ ची माहिती होती. 

ज्या महिला टेलिमेडिसिन साठी तपासणी करत होत्या, त्या कोविद -१९ साठी तपासणी करून अहवाल पुण्याच्या हॉस्पिटलला पाठवत होत्या. 

काही बायका मास्क बनवू लागल्या. काही म्हणाल्या, “ आपण गावची भाजी पुण्यात विकूया. “ 

सगळी व्यवस्था त्यांनी केली. सकाळी घरोघर  जाऊन भाजी गोळा करायची आणि संध्याकाळी विक्रीचे पैसे चोख पणे घरोघर द्यायचे. वेशीवर भाजीच्या पिशव्या घेऊन जाणारी गाडी थांबे. 

गाडी पुण्यात जाई. तिथून पुढे ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी  घरोघर जात. भाजी देत. भाजीच्या ऑर्डरी एक दिवस आधीच घेतल्या जात. कशा ?  व्हाट्स अप गट करून ! वेल्हे भागातल्या बचत गट महिला आणि पुण्याचे विद्यार्थी यांचा हा संयुक्त उपक्रम. साधी सुधी व्यावसायिक तंत्र वापरून आणि व्हाट्स अँप च तंत्र ज्ञान वापरून ६५०० किलोचा भाजीपाला विकला. आणि दोन लाखांची उलाढाल करून गावात रोख रक्कम आली. 

ना अडत ( दलाली  )  ना गाडीभाडे ..  भाजी वाया गेली नाही. शेतकऱयांचा फायदा वाढला. पुण्यातल्या काही भागातल्या सोसायट्यात ताजी भाजी घरपोच !  

संचारबंदी मुळे  पुण्यातलया सोसायट्यामध्ये “पाव भाजीवर लोणी मिळत नाही “ अशा अडचणींची यादी वाचणारे आणि  तक्रार करणारे सुखवस्तू  ग्राहक खूष  झाले. सर्वानाच सुखाचं झालं. 

तशीच मध्यस्तीची काम सरकारचं  कर्ज  वाटप करून केली. 

पण अजूनही काही घरात उत्पनाच साधन नव्हतं. मग काय ? आणखी काही महिला पुढे आल्या.  कुरडया , पापड आणि गावात पैदा होणारी हळद दळून  पुड्या तयार केल्या. पुन्हा ऑर्डरी घेतल्या आणि पुण्यात विक्री केली. पुन्हा काही लाखांची विक्री केली. 

“आपल्याला मदत करायला सुवर्णताई, बचत गट आणि पुण्याची ज्ञानप्रबोधिनी आहे” हा दिलासा गावकऱ्या ना आला.  युद्धपातळीवर काम करण्याऱ्या  महिला आपल्या गावात आहेत, याची जाणीव झाली. 

‘हातचे ना हात हे कधी सुटायचे । बिकट वाट ही  त री पुढेच  जायचे ।।’ 

या उमेदीनं या महिला  उभ्या राहिल्या आणि त्यांनी उभारी दिली. त्यांनाही वेगळा आत्मविश्वास आला. 

गेल्या तीस वर्षांच्या कामाच्या तपस्येमधून उभं राहिलेलया ग्रामीण स्त्री च वेगळं दर्शन सुवर्णनाताईना झालं !

“business management , needs analysis , resource allocation,  supply chain management, tele medicine.. motivation , commitment,” इत्यादी शब्द न वापरता आलेली ही  आत्मनिर्भरता  !   प्रसंगी आपल्याला लागण होण्याचा धोका पत्करून काम करण्याची हिम्मत आणि निर्भयता !

रुग्णालयातले कर्मचारी, पोलीस, त्यांच्यासारख्याच याही   करोना योध्या !  

 शिधा वाटप आणि अन्य कामासाठी अनेक लोकांनी आर्थिक मदतीचे हात पुढे केले. 

 ज्ञान प्रबोधिनी फौंडेशन (www.jnanaprabodhinifoundation.org)

अमेरिका ही  संस्था ( ५०१ सी अंतर्गत नोंदणी केलेली)   अशा गावोगावच्या कामासाठी निधिसंकलन  करत आहे.यातून महाराष्ट्रात मदत केली जात आहे.

 हे युद्ध अजून संपले नाही. आता काही दीर्घ मुदतीच्या कामांची आवश्यकता आहे. गावोगावच्या शाळा सुरु ठेवायच्या आहेत. ‘लर्न इंडिया’ ही  मोहीम आम्ही सुरु केली आहे. 

संचारबंदीत आणि विपरीत परिस्थितीत या महिलांनी संधी कशा शोधल्या, जनसंपर्क कसा केला, आणि ‘मायक्रोलेव्हल’ वर  विधायक कामांच जाळं  कसं विणल   ही कहाणी म्हणजे महिषासुर मर्दिनीची कहाणी . 

विद्या हर्डीकर सप्रे