2015 च्या आसपासचे वर्ष. . कॅलिफोर्नियातील एका महामार्गावरून आमची गाडी पळत होती . दुतर्फा “पळती झाडे पाहूया “ अशी बदाम, पिस्ते आणि फळ झाडे. पण काही भागात मात्र बने च्या बने वाळून पिवळी झालेली! विषण्णा करणारे दृश्य होते.
कॅलिफोर्नियातील दुष्काळाचे ते दृश्य स्वरूप. पाण्याचा दर परवडो की न परवडो ; पाणी बंद करून झाडांना मारणे अपरिहार्य झाले होते. वर्षानुवर्षे मशागत करून जगवलेली आणि सोन्यासारखं पीक देणारी ती बने मारताना शेतकऱ्याना काय वाटले असेल ?
भारतातील सुके, ओले आणि कृत्रिम असे सर्व प्रकारचे दुष्काळ; पाणी वाटप प्रश्न; सरकारी मदत; शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा उहापोह; शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मदतीचे हात, संस्थाचे आणि मदतीचे राजकारण …. असे अनेक विषय डोक्यात येऊन गेले आणि आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिकन शेतकऱ्यांबद्दल कुतूहल निर्माण झालं.
.
“अमेरिकन शेतकऱ्यांपैकी जवळ जवळ प्रत्येकाकडे शेकडो एकर जमिनी असतात. आधुनिक यंत्र आणि तंत्रे असतात! समृद्ध देशातील सर्व सुविधा हात जोडून उभ्या असतात. आणि शिवाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी सवलतींची रेलचेल तर असणारच! तेव्हा समृद्ध अमेरिकेतील शेतकरीसुद्धा समृद्ध असणार. त्याला कसली चिंता?” असा एक गैरसमज असतो.
“ अमेरिकेतील शेती म्हणजे सरकारी अंदाजपत्रकातील लठ्ठ गाय “अशी माझीच काय पण अनेक अमेरिकन लोकांचीही समजूत असते. या समजुतीला धक्का देणारी एक माहिती समजली. ती म्हणजे, अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणाचे स्थान प्रमाण एकूण आत्महत्यांच्या प्रमाणात सर्वात वरच्या स्थानावर आहे.
दर शंभर हजार शेतकऱ्या तील सुमारे 85 शेतकरी शेतीच्या चिंतेने आत्महत्या करतात!
कोणत्याही व्यवसायातील माणसाला असहाय वाटणारा तणाव (स्ट्रेस) आला तर आत्महत्येचे विचार डोकावून शकतात. “आत्महत्येच्या सात एक कारणातील एक कारण म्हणजे तणाव आणि चिंता”, असे तज्ञ सांगतात आत्महत्या हा मदतीसाठी केलेला एक प्रकारचा आक्रोश असतो पण मदत कशी मिळवता येईल हे समजल्यामुळे हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो. त्या दृष्टिकोनातून पाहिले तर कोणत्याही व्यवसायातील कोणीही माणूस या मार्गाने जाऊ शकतो. मग तो जगातील कोणत्या का देशाचा असेना! .
त्याच प्रमाणे चिंतातूर होण्याची काही कारणे जगातल्या कोणत्याही शेतकऱ्याला लागू पडू शकतात.
उदारणार्थ: १. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त म्हणून कर्जबाजारी होणे
२ . कर्जापायी किंवा अन्य कारणांमुळे जमीन हातची जाणे.
शेतकऱ्याचं स्वत्व म्हणजे जमीन. तीच सरकली पायाखालून तर काय उरणार ? शून्य. कारण शेतकऱ्याची जमिनीशी भावनिक बांधिलकी (म्हणजे emotional attachment) असते.
स्वत्व गेलं, उत्पन्न गेलं आणि अन्य कोणतीच अर्थार्जनाची कौशल्य नाहीत . अशावेळी कर्जाच ओझ वाटू शकतं तस जगण्याचां ओझ वाटू शकतं..
अर्थातच अमेरिकन शेतकरी सुद्धा या समस्यांना सामोरे जात असतात. एवढेच नव्हे , तर शेती व्यवसायात आत्महत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
त्याची काही कारण मीमांसा करता येते.
उदाहरणार्थ अमेरिकन शेतकऱ्यांकडे जमीन बरीच असली तरी पैसे बरेच मिळतात असे नाही. कारण जमिनीच्या प्रमाणात अवजारे, बी बियाणे, जंतुनाशके हे सर्व लागते. त्यासाठी लागणारे कर्जही मोठे असते.
सरकारी दराच कर्जाचे दर वाढतच असतात त्यामुळे तोही चिंतेचा विषय. कधी उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येते.
कधी उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा विक्रीचा दर कमी मिळतो. तो ठरवणे अर्थात शेतकऱ्याच्या हातात नसते. त्यामुळे उत्पन्नात घट होते
शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असतात ते हवामानात होणारे पराकोटीचे बदल. पृथ्वीचे वाढते तपमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हे एक कारण. इतर नैसर्गिक आपत्तीही उत्पादनावर अक्षरशः पाणी फिरवू शकतात. त्यामुळे अर्थातच उत्पादन घटते. अशा घटनांचे अंदाज येत नाहीत म्हणून त्यासाठी तरतुदी आणि योजना करता येत नाही.
अमेरिकेतील आरोग्य सेवा प्रचंड महाग असते. ती खेड्यात उपलब्धही नसते. त्यामुळे तो खर्च हाताबाहेर जाऊ शकतो. व्यक्तिगत आरोग्य विमा खूप महाग असतो. कंपनीत काम करणाऱ्या लोकांना हा विमा स्वस्त दरात मिळतो. त्यामुळे जवळजवळ 75% शेतकरी शेतीच्या बरोबरच . दुय्यम नोकऱ्या शोधतात म्हणजे बिगर शेती उत्पन्नावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात.
कुटुंबातील सगळेच लोक शेती करतात; म्हणजे त्यांना फक्त शेतीवरच अवलंवबून रहावे लागते.
20१3 पासून शेती उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. 20१३ चे उत्पन्न आज १०१८ मध्ये ३५ % घसरले आहे.
त्यातून सध्या गाजत असलेल्या आयात करामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दुहेरी भर पडली आहे. उदाहरणार्थ अमेरिकेने आयात मालावर कर बसवल्याने अवजारे महाग झाली आहेत तर सोयाबीनवर चीनने कर लादल्यामुळे सोयाबीन पिकवून चीनला निर्यात करणारे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत असे प्रश्न अंगावर येऊ लागले की काही शेतकरी दिवाळखोरी जाहीर करतात. त्या कायदेशीर प्रक्रियेत त्यांची सर्व जमीन सरकार जमा होते.
शेकडे एकर जमीन असलेला शेतकरी भूमिहीन होतो.
1920 च्या सुमाराला आर्थिक मंदीचे संकट होते त्यावेळी आणि 1980 मध्ये शेती प्रश्न इतके गंभीर झाले की शेतकरी निराश होऊ लागले आणि त्यावेळी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असे आकडेवारी सांगते
आत्महत्या रोखण्यासाठी काही सरकारी प्रयत्न असतात. तसेच काही संस्थांनी ‘समुपदेशन दूरध्वनी सेवा’ म्हणजे फोन हॉट लाइन सुरू केल्या आहेत. त्या काही काळ चालतात पण सरकारकडून पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने बंद पडतात. उदाहरणार्थ 2000साली डॉ. रोजमन या कार्यकर्त्या समुपदेशकाने “sowing the seeds of hope” या नावाची एक मोहीम सुरू केली. त्या मोहिमेचा भाग म्हणून सात राज्यात मानसिक आरोग्य सेवा देणारे जाळे विणले त्यात समुपदेशन दूरध्वनी सेवा सुरू केल्या. आर्थिक समस्या आणि कोर्टकचेऱ्या यासारखी मूलभूत कारणे शोधून काढून त्यावर घाव घातले की तणाव हा नियंत्रित करता येतो. परिणामी आत्मघाताने होणारी जीवित हानी कमी करता येते., हे डॉ. रोजमन यांचे म्हणणे. त्यांच्या मोहिमेला चांगले यश आलेही.
परंतु तो कार्यक्रम 2014 मध्ये पैशाअभावी बंद करावा लागला
रोजमनसारख्या अनुभवी मानसशास्त्रद्न्यचे निरीक्षण असे की शेतकऱयांची केवळ भूमीशी निष्ठा एवढेच नाही तर , ते अन्न आणि वस्त्र निर्मितीचे कामही समर्पित भावनेने करत असतात. अशी मानसिक गुंतवणूक असल्यामुळे
यातून पैसे मिळवणे त्यांना अशक्य होते तेव्हा ते मानसिक दृष्ट्या कमकुवत होतात.
तात्पर्य काय तर देश गरीब असो की श्रीमंत ! शेतकऱ्यांचा प्रश्न जगभर असतो. वातावरणातील बदला (ग्लोबल वॉर्मिंग आलेच) मुळे हा प्रश्न दिवसेदिवस तीव्र होण्याची शक्यता वाढतच आहे !
———–विद्या हर्डीकर सप्रे
( पूर्व प्रकाशन : महाराष्ट्र टाइम्स , जुलै २०१८)