अमेरिकेतील भव्य, प्रेक्षणीय स्थळ म्हटले की सहजपणे लोक ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्कचे नाव घेतात! हा देश सुमारे ५८ भव्य नॅशनल पार्कस्च्या सौंदर्याने नटला आहे. नावाप्रमाणेच असलेले, कोलोराडो नदीने लाखो वर्षे खोदून निर्माण केलेले हे ‘ग्रँड कॅन्यन’ आहे. तसेच युटा अणि अॅरिझोना राज्यांच्या सीमांवरचा प्रदेश अनेक अद्भुत निसर्गशिल्पांनी आणि लाल, केशरी, गुलाबी, पिवळ्या रंगच्छटांनी उजळून गेलेला आहे. त्यातील एक सुमारे २३० चौरस मैलाचा भव्य आणि नेत्रदीपक चमत्कार म्हणजे ‘झायॉन नॅशनल पार्क’! (Zion National Park) समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फुटांवर या चमत्काराचा तळ आहे. आणि ८००० फुटांवर याचा पहाडी शिरपेच आहे! माणसाला नम्र करणारे उत्तुंग पाषाणांचे पहाड, उंचीवरून स्तिमित करणारी विस्तीर्ण पठारे आणि उसळत, कोसळत खळाळणारे प्रपात! (त्यांना धबधबे म्हणणं म्हणजे नायगाऱ्याला ‘नळ’ म्हणण्यासारखं वाटतं!) –
खरं तर ‘उत्तुंग’, ‘भव्य’, ‘प्रपात’ वगैरे शब्दसुद्धा खुजे वाटावेत असं या भागाचं स्वरूप आहे. ‘झायॉन नॅशनल पार्क’ हे तिथे प्रत्यक्ष जाऊनच अनुभवावं असं आहे. हजारो नव्हे, तर लाखो वर्षांपूर्वी इथे होती एक नदी (अजूनही आहे). ‘व्हर्जिन रिव्हर’ हे तिचं नाव! खळखळ धावत, फेसाळत, उसळत जाता जाता इथल्या ‘सॅन्डस्टोन’च्या प्रदेशात तिनं खोदली पाषणशिल्पं! कदाचित काही भूकंप झाले असतील, कुठे पहाड कोसळले असतील.. इतिहासाच्या खाईत! कधी पाण्यातून उभे राहिले असतील पर्वत! त्या सर्व घटनांच्या नोंदी इथल्या पहाडांवर, दगडांवर निसर्गत:च उमटल्या आहेत. पहाडांवर दिसणाऱ्या लाटांच्या जन्मखुणा, पर्वतांचे कातीव कंगारे, निळ्याभोर आकाशावर रेलून राहिलेली लाल- केशरी गोपुरांनी नटलेली रेखीव शिखरे हे सर्वच अंतर्मुख करून जाणारं! दरवर्षी तीन दशलक्ष लोकांना विविध प्रकारे गुंतवून ठेवणारा हा प्रदेश १९१९ च्या सुमाराला ‘नॅशनल पार्क’ म्हणून ठरवला गेला. आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी रस्ते बांधले गेले. राहण्याच्या सोयी केल्या गेल्या. संग्रहालय बांधले. आणि ३५-४० पायवाटाही बांधल्या! त्याशिवाय पाठीवर बॅगपॅक घेऊन ट्रेकिंग करणाऱ्या साहसवीरांसाठी सुमारे १०० मैलांच्या रानवाटाही शोधून, नोंदवून नकाशे बनवण्यात आले. त्यांच्यासाठी चाळीसेक विश्रांतीस्थळांच्या सोयी करण्यात आल्या. निसर्गाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचं हे एक दालन आणि साधनही आहे याचा विचार अर्थातच केला गेला. आणि पर्यटक, साहसवीर यांच्याप्रमाणेच संशोधक आणि अभ्यासकांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सुरू आहेत. –
त्यात इथला भूगोल, भूगर्भशास्त्र, पर्यावरण, निसर्गसंपत्ती, वनसंपदा, आणि वन्यप्राणीजीवन असे
सर्वच विषय आहेत. चित्रकार, छायाचित्रकार
अशा कलाकारांसाठी
तर हा खजिनाच आहे. या सर्वाना सेवा मिळण्यासाठी सरकारी आणि स्वयंसेवक असे सर्वच
कार्यकर्ते हसतमुखाने तत्पर असतात. पार्कचा काही भाग पाहण्यासाठी आणि
प्रदूषण कमी करण्यासाठी मोफत बसची व्यवस्था आहे. कधी पायी जावं आणि हजार
प्रकारच्या वनस्पती पाहाव्यात. तर कधी २०० प्रकारचे पक्षी असलेल्या या प्रदेशात
पक्षीनिरीक्षणाचा आनंद घ्यावा. कधी रानफुलांचे नमुने गोळा करावेत. वाटेत
एखादा ‘टॅरंच्युला’ (tarantula) म्हणजे मोठ्ठा विषारी कोळी दिसला तर
घाबरावे; पण
आश्चर्यचकित होऊ नये!
जरा जास्त साहसी ट्रेकर्सना खुणावतो तो ‘नॅरोज’ हा भाग. नावाप्रमाणेच
हा झायॉन
पार्कमधील सर्वात अरुंद भाग! म्हणजे भोवती हजार- दीड हजार फुटांची उंच पर्वताची रांग
आणि मधे जेमतेम २० फुटांची वाट. काही भाग व्हर्जिन नदीचा. या प्रवाहातून
उलटय़ा दिशेने जाण्याचा हा ट्रेक आहे. तसा खूप अवघड नव्हे. पण आव्हान
देणारा आणि त्याचवेळी डोळ्यांचे पारणे फेडणारा! अचानक वेगाने पूर येऊन धोका
देणाराही! दोन-तीन महिन्यापूर्वीच या नॅरोजने सात साहसवीरांचा बळी
घेतला. –
‘झायॉन’चा भाग ‘भीमरूपी’, ‘भव्यरूपी’ आहे, तसाच महारौद्ररूपीही आहे. पहाडांचे कातळ कोसळणे हा प्रकार कधी कधी होतो.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ातली गोष्ट. आमच्या इंग्लंडहून आलेल्या मित्रांना ‘ग्रँड कॅन्यन’, ‘ब्राईस कॅन्यन’ आणि ‘झायॉन कॅन्यन’ अशा तीन नॅशनल पार्कची सफर घडवण्याचा बेत आम्ही केला होता. ग्रँड कॅन्यनहून निघून आठ तासांचा प्रवास करून आम्ही झायॉनच्या एका प्रवेशद्वाराच्या दिशेने चाललो होतो. २३ सप्टेंबरची ती संध्याकाळ. तिथून प्रवेश करून तासभर प्रवास करून ‘झायॉन’ची झलक पाहुण्यांना दाखवायची आणि दुसऱ्या टोकाच्या प्रवेशद्वारामार्गे बाहेर पडून स्प्रिंगडेल या चिमुकल्या गावात मुक्काम करायचा, असा बेत! पण प्रवेशद्वारी गाडय़ांची मोठ्ठी रांगच रांग! कोणाला आत जाऊ देत नव्हते. द्वारपालांनी सांगितले की, आत रस्त्यावर १९ फूट ७ २० फूट ७ १५ फूट आकाराचा दोनशे टनांचा एक दगड कोसळला आहे आणि रस्ता बंद आहे! आता तो दगड सुरुंगाने उडवून फोडायचा की यंत्राने ढकलून बाजूला करायचा, या प्रश्नाची सोडवणूक चालू आहे. आता मार्ग बदलून वळसा घालून स्प्रिंगडेलला पोहोचण्यास तीन तास लागले असते. आमच्यासारखे अनेक प्रवासी व पर्यटक मागे परतून जवळपासचे हॉटेल शोधत होते. आम्हीही तेच केले. रात्री एका शेतावरच्या फार्म हॉटेलवर मुक्काम केला. ‘कंट्री म्युझिक’ ऐकत शेकोटीजवळ बसलो. नंतर खोलीच्या बाहेर पायऱ्यांवर – बसून सुंदर चांदणे अंगावर घेतले. आकाशगंगेचे दर्शन घेतले. इंग्लंडच्या पाहुण्यांना अमेरिकेच्या निसर्गरम्यतेचा वेगळा अनुभव मिळाला. ‘झायॉन’च्या ‘भव्य’त्वाची प्रचीती मग दुसऱ्या दिवशी वेगळ्या मार्गाने जाऊन घ्यावी लागली. काही भाग सोडला तर उरलेल्या सर्व ‘झायॉन’ पार्कचा अनुभव पाहुण्यांनी घेतला. प्रत्येक भागाचे दर्शन त्यांना ‘आश्चर्य’चकित करीत होते. आमची ही झायॉनानंदाची पाचवी-सहावी सफर असेल. पण दरवेळी होतो तसा ‘आ’ वासण्याचा आनंद तेवढाच प्रत्ययकारी आणि ‘कर माझे जुळती’ची प्रचीतीही!
विद्या हर्डीकर सप्रे
(पूर्व प्रसिद्धी: लोकसत्ता , नोव्हेंबर 15, 2015)