शांत, नितळ तळ्यात कोणी दगड टाकल्यावर पाणी ढवळून निघतं, लाटा उसळतात आणि तळाशी असलेली घाण वर येऊन सगळं तळं गढूळतं!
वेगळा दिसला तरी तो आपल्याच देशाचा असू शकतो याचा विचार न करता वंशद्वेषाने आंधळ्या झालेल्या कुण्या अमेरिकनाने भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचिभोतला याला गोळ्या घातल्या आणि ‘तुझ्या देशात परत जा’ म्हणत आम्हा भारतीय अमेरिकनांना मानसिक जखम केली. त्यातून दु:ख, हळहळ, राग, वैताग, भय, आत दडपलेली उपरेपणाची भावना, हतबलता, असुरक्षितपणा, आधारयंत्रणा चाचपून पाहण्याचे प्रयत्न, चिंता आणि चिंतनाच्या बऱ्याच लाटा विविध माध्यमांतून वेगवेगळ्या स्वरूपात उसळल्या.
ही घटना तशी अनपेक्षित नाही. अचानक झालेली नाही. शाळेतल्या ‘वेगळ्या’ दिसणाऱ्या, ‘विचित्र’ नावांच्या मुलांना चिडवणे, मंदिरासमोरच्या गाडय़ांवर ‘गो बॅक टू युवर कंट्री’चे स्टिकर्स लावणे अशा किरकोळ घटना अधूनमधून इथे घडतात आणि नंतर विसरल्याही जातात. १९८० च्या सुमारास न्यूजर्सीत ‘डॉट बस्टर’वाल्यांनी भारतीयांना त्रास देण्याचे प्रकार घडले. 11 सप्टेंबरच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यांनंतर अविश्वासाच्या वातावरणात फेटे घालणाऱ्या शिखांना (आतंकवादी समजून की परके म्हणून?) गोळ्या घालण्याच्या घटना घडल्या. तर २०१२ मध्ये गुरुद्वारावर केलेल्या वर्णद्वेषी हल्ल्यात भारतीय शिखांचे हत्याकांड झाले. या काही ठळक घटना. त्यावर काळाच्या मलमपट्टय़ा होतात. लाटा विरतात. वर आलेली घाण तळाला जाते. पाणी पुन्हा नितळ आणि सुंदर दिसतं. आम्ही भारतीय अमेरिकन पुन्हा निर्धास्त होऊन सुरक्षित, सुस्थापित, संपन्न जीवन जगू लागतो..
स्थलांतराची ओळख आम्हाला बालपणापासूनचीच. कधी नव्या गावी, नव्या शाळेत मिळालेली उपरेपणाची वागणूक आम्ही सहन केलेली असते. तशी ‘मद्रासी’ महाराष्ट्रात आले आणि त्यांनी आमच्या नोकऱ्या घेतल्या- या असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांना हुसकावून लावण्याची भाषा आमच्यातल्या काहींनी आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांविरोधात केली होती!
..तेच आम्ही भारतीय नव्या संधी शोधत नव्या आकाशात भरारी मारण्यासाठी किंवा अन्य कारणांनी अमेरिकेत स्थलांतरित झालो. इथे आमच्या शिवाजी महाराजांना कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे पूर्वजांची पुण्याई नि बढाई उपयोगाची नव्हती. आपली लढाई आपणच करण्याची आव्हानं झेलत आपली वाट निर्माण करण्याचे प्रयत्न करणारे, कष्टाळू, शांतताप्रेमी.. कोणी विद्यार्थीदशेतले, कोणी तात्पुरत्या कामासाठी आलेले वा कंपनीने बदली केल्यामुळे आलेले, कायमचे स्थलांतरित- ग्रीन कार्डवाले, जबाबदारीनं कर भरणारे म्हणून नंतर नागरिकत्वाचा हक्क मागणारे.. असे सर्व प्रकारचे भारतीय अमेरिकन!
आम्हाला अमेरिकेत पाठवण्याची आमच्या देशानं सक्ती केली नव्हती. त्यामुळे विस्थापित नव्हे. आम्हाला कोणी गुलाम म्हणून बांधून नाही आणलं म्हणून सन्मानित, जगातील दोन मोठय़ा प्रजासत्ताक देशांत राहण्याचं भाग्य लाभलेले, दोन्ही देशांत सुस्थापित असे आम्ही भारतीय अमेरिकन! नऊ सप्टेंबरला भुईसपाट होणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरने घायाळ होणारे आणि मुंबईत ताज हॉटेलवरील दहशतवाद्यांचा हल्ला पाहताना झोप उडालेले. दोन्ही देशांतील अशा अनेक अभागी घटनांचे खोल पडसाद अनुभवणारे आम्ही भारतीय अमेरिकन!
पण एकदा जन्मभूमी सोडली की आपण कायमच स्थलांतरित. स्थलांतरितांच्या इतिहासाचा आम्हीही एक भाग आहोत. आणि म्हणूनच स्थलांतरितांच्या सर्व प्रश्नांतून आम्हालाही वाट काढावी लागते.
माणसाला जगात कोठेही यशस्वीरीत्या जगण्यासाठी दोन पातळ्यांचे टेकू लागतात : मानसिक साहाय्य यंत्रणा आणि सामाजिक साहाय्य यंत्रणा. अमेरिकेत मराठी, तेलगू, गुजराती लोकांच्या मंडळांची भारतीय अधिष्ठाने निर्माण करून आम्हाला मानसिक आधार यंत्रणा मिळाली. तर सामाजिक आधार यंत्रणेचा टेकू अमेरिकन समाजव्यवस्थेने दिला. अशा समाजव्यवस्थेला समजावून घेऊन तिच्यात सामावून जाण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची जबाबदारी मुख्यत: स्थलांतरितांचीच. काही अंशी ती समाजव्यवस्थेचीही (त्यात शासनही येते!) असते. पण या सर्वाचा समतोल अवघड आणि वेळखाऊ असतो. तो साधण्यासाठी काही पिढय़ा जाव्या लागतात. एकमेकांबद्दलचे अज्ञान, अविश्वास, असुरक्षितता, असूया (उपरे आमच्या पुढे गेले, श्रीमंत झाले, इ.) अशा अनेक गुंतागुंतीच्या भावना परस्परांबद्दल असतात.
उदा. काळे-गोरे हा वंशवाद गेली ३०० वर्षे प्रचलित आहे. २१ व्या शतकातही काळा अध्यक्ष पचवणे अमेरिकन गोऱ्यांना जड गेले. वर्णाने गोरे, पण धर्माने ज्यू असलेलेसुद्धा अजून इथे पूर्णपणे समरस झालेले नाहीत. त्यांच्याही दफनभूमीवर हल्ले होत आहेत.
आम्ही भारतीय तर अमेरिकन वर्ण, भाषा, उच्चार, संस्कृती, अन्न, शिष्टाचार, धर्म- सर्वातच वेगळे. त्यात आणखी भर म्हणजे आम्ही कोणाला मेक्सिकन वाटतो, कोणाला काळे वाटतो, कोणाला मध्यपूर्वेतले आतंकवादी वाटतो. यामागे अज्ञान आणि समजून न घेण्याची बेमुर्वतखोर वृत्ती आणि इतरही कारणे असतील; परंतु परिणामांच्या हल्ल्यातून आम्ही आमची मुलेही वाचवू शकत नाहीत. मग ती मायक्रोसॉफ्ट-गुगलचे पदाधिकारी का असेनात!
मुळात अमेरिका हा स्थलांतरितांचा देश. तोही जगभरातील स्थलांतरितांच्या योगदानामुळे श्रीमंत झालेला. स्थलांतरित म्हणजे पैसे देऊन आणलेली निर्जीव यंत्रे नव्हेत. तीही माणसेच असतात. त्यांच्या मानवी गरजांची देखभाल करणे, किमान त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणे ही शासन यंत्रणेची जबाबदारी असते.
स्थलांतरे जगभर हजारो वर्षे चालू आहेत. पण गेल्या काही वर्षांतील स्थलांतरांचा वेग आणि त्याच्याशी जुळवून घेण्याची सर्व देशांची व समाजांची तारांबळ यांच्या व्यस्ततेचे परिणाम जगभर (उदा. ब्रिटनचे ‘ब्रेग्झिट’) दिसत आहेत. त्यातून एक अस्वस्थता दिसते आणि असुरक्षितताही. देशोदेशीच्या शासनांच्या बदलत्या धोरणांनुसार अशा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी जगातील सर्वच स्थलांतरितांना याउप्पर करावी लागणार आहे.
मात्र, सध्या अमेरिकेत जाणवते आहे ती झुंडशाहीवाद्यांची दडपशाही! प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करून ज्या शासनाचे राज्य सुरू होते त्याची परिणती कशात होते, हे आम्ही भारतीय अमेरिकनांनी १९७५ मध्ये अनुभवले आहे. त्यापेक्षाही भयानक प्रकार जर्मनीत झाले, हे सारे जग जाणते.
‘कोणाला ठार मारले, परक्या दिसणाऱ्यावर अत्याचार केले तर चालते’ अशी शासनाची चिथावणी समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांत वाऱ्यासारखी पसरते. याची भीती मेक्सिकन, मध्यपूर्वेतील शरणागत आणि सुजाण अमेरिकनांनाही आहे. अशांची संख्या जास्त आहे. तेव्हा आम्ही एकटे नाही. परंतु या देशात ४० -५० वर्षे राहिलेल्या भारतीय अमेरिकनांना आजवर कधीच वाटले नाही ती असुरक्षिततेची भावना आज वाटते आहे, हे सत्य! त्यात आताची लाट वेगळी व भयावह आहे. आणखीही अशा काही घटना घडण्याची शक्यता आहे. कारण यामागे अनेक घटनांची, गोष्टींची, त्यांच्या अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि मानवतेच्या परिणामांची गुंतागुंतीची साखळी गुंतलेली आहे.
सध्या जे काही चालले आहे त्यातून नुसतेच तात्त्विक विचारमंथन नव्हे, तर ठोस कृतीचे विचार येथील सोशल मीडिया व संघटनांतून होत आहेत. यातून पुढील गोष्टींवर भर देण्यात येत आहे.. * अमेरिकेत सध्या एकमेकांशी फारसे संबंध नसलेल्या मराठी, बंगाली इ. भारतीय भाषिक मंडळांनी परस्परसंवाद आणि एकजुटीने काम करण्याची गरज. * भारतीय अमेरिकनांनी अमेरिकेच्या संपन्नतेत महत्त्वाचे योगदान दिल्यामुळे त्यांना आवाज आहे. तो वापरून; अमेरिकेत नोकरी करण्यासाठी योग्य व्हिसा आणि अन्य गोष्टींवर अमेरिकेशी वाटाघाटी करण्यासाठी भारतीय शासनाला मदत आणि प्रेरणा. * अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात आपले अधिक जोरकस अस्तित्व तथा मंच निर्माण करण्याची गरज. * वंशद्वेष आणि अन्य संकटांत भारतीय नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यासठी वकिलातींची बळकटी. * अमेरिकन समाजाशी समरसतेसाठी, दुर्बलांच्या मदतीकरता, लोकशिक्षणासाठी आणि अमेरिकन लोकांची अविश्वासाची भावना कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. * शिक्षणसंस्था आणि ‘इंटर-फेथ’ संवाद साधणाऱ्यांच्या कामात सहभाग, लोकशिक्षणासाठी मदत. * भारतीय अमेरिकनांवर घरवापसीची वेळ आली तर अनेक पातळ्यांवर होणाऱ्या तात्कालिक व दूरगामी परिणामांचा व उपायांचा विचार.
हे काहीही असलं तरी ज्या देशाला आपण आपलं म्हटलं, आपलंसं केलं, त्या संपन्न, प्रजासत्ताक, ‘जगा आणि जगू द्या’ ही भूमिका असणाऱ्या देशात कायम भयगंडाने जगणं हे कोणत्याच समाजाच्या हिताचं नाही. दुसऱ्या बाजूला ‘माझ्या देशात संधी नाही म्हणून मला देश सोडण्याची वेळ येते’ असं म्हणण्याची वेळच भारतीयांवर येऊ नये, असा प्राचीन संपन्न भारत कदाचित भविष्यात पुन्हा जन्माला येईलही..
कोणी सांगावं? —-विद्या हर्डीकर-सप्रे
( पूर्व प्रकाशन : लोकसत्ता )