अमेरिकन कोर्टाची पायरी

शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात! भारतात असताना कोर्टकचेरीचा प्रसंगच आला नसल्याने कोर्ट, वकील, आरोपी, साक्षीदार वगैरे शब्दसुद्धा अर्थापुरतेच माहिती! अमेरिकेत मात्र मला चार कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. तेही मी वकील, जज्ज, साक्षीदार नसताना! मी नुकतीच अमेरिकेत

आले होते तेव्हा पोस्टानं एक पत्र आलं. त्यावर लिहिलं होतं, ‘समन्स!’ बापरे! ही काय भानगड? त्या समन्सवर ‘ते पाळलं नाही तर..’ अशा बऱ्याच धमक्या दिलेल्या होत्या. गुन्हेगारी केल्यासारख्या पडेलपणे मी पुढे वाचलं आणि समजलं- ‘ही ज्युरी डय़ुटी आहे. आणि ती अमेरिकन नागरिकांसाठी असते!’ मी तेव्हा अमेरिकन नागरिक नव्हते,

पण ही ‘ज्युरी डय़ुटी’ काय असते, ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याच्या संकल्पनेतून या ‘ज्युरी डय़ुटी’चा जन्म झाला. न्यायाधीशाचा खटल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायद्याच्या चौकटीतला असतो. तर सर्वसामान्य माणूस खटल्याकडे जीवनाभिमुख चौकटीतून पाहतो. रोजच्या जगण्यात आपला दृष्टिकोन काय असतो? आपली मूल्यं कोणती? ज्याला ‘कॉमन सेन्स’ म्हणतात, त्या संवेदनेतून खटल्याचा विचार कसा व्हावा? हे सर्वसामान्य माणसाला दिसतं. थोडक्यात- खटला, आरोपी इ. बाबत सर्वसामान्य माणसाने दिलेला निर्णय.

आरोपी सुटला म्हणून तो जनतेच्या दृष्टीनं निर्दोष असेलच असं नाही. उलट, कोणी कायद्याच्या कचाटय़ात अडकला म्हणून तो दोषी असेल असंही नाही. या दोहोंच्या चष्म्यातून आरोपीकडे पाहावे व शिक्षा ठरवावी, यासाठी हा ‘पंच’ किंवा ज्युरी मंडळाचा वापर जगातल्या अनेक न्यायसंस्थांनी सुरू केला. भारतातही ब्रिटिश राजवटीत न्यायालयाने ज्युरीचा वापर केला होता. पुढे हा प्रकार भारतातून नाहीसा झाला.
अमेरिकेतील न्यायदानात प्रत्येकाला ‘ज्युरी’ची मदत घेण्याचा हक्क घटनेने दिला आहे. आरोपीला दोषी अथवा निदरेष ठरवण्याचे, दोषी आरोपीला शिक्षा किती द्यावी, हे ठरविण्याचे किंवा खटल्यात नक्की काय घडले, हे शोधून तो तपशील कोर्टाला पुरवण्याचे असे तीन वेगळ्या स्तरांवरचे काम ज्युरी मंडळाला करावे लागते. तुम्ही १८ वर्षांच्या वरचे अमेरिकन नागरिक असाल आणि इंग्रजी समजत असले की झाले! अमेरिकेत बहुसंख्य खटले ज्युरी मंडळाच्या मदतीने चालतात. फारच थोडे ज्युरीविना म्हणजे ‘बेंच ट्रायल’ पद्धतीने चालतात. आता एवढी प्रचंड (?) माहिती मिळवल्यावर ज्युरी डय़ुटीचं ‘समन्स’ पाहून मी “‘वा! आपण फार महत्त्वाचे अमेरिकन नागरिक आहोत! आणि सरकारने फारच महत्त्वाची जबाबदारी दिली तर ती चोख पूर्ण करावी,’ “या उत्साहाने मी ऑफिसात साहेबासमोर ‘समन्स’ नाचवले. त्याने नाक मुरडलं- ‘हं! म्हणजे तू आठ दिवस तरी कामाला दांडी मारणार आणि तुझं काम मला करावं लागणार. वर पुन्हा तुला पगार द्यायचा! तू असं कर- मी देतो ते पत्र त्यांना पाठव, म्हणजे तुझी सुटका होईल.’ आणि मग ‘हिच्यावाचून कंपनीचं काम अडतं..’ वगैरे त्यानं लिहून दिलं. ऑफिसातले बाकीचे काम करणारेही ‘ज्युरी डय़ुटी कशी टाळावी?’

यावर माझं बौद्धिक घेऊ लागले. ‘अगं, तिथे अडाणी माणसांना घेतात!’ ‘तुझ्यासारख्या डिग्रीवाल्यांचं हे काम नाही. तिथं ‘होमलेस’ वगैरे माणसं येतात व दिवसाला पाच डॉलरचा सरकारी भत्ता घेऊन जातात!’ ‘सरळ सांग त्यांना, की मी तेव्हा गावाला जाणारेय, तेव्हा ही डय़ुटी करायला मला वेळ नाही!’ ‘नाहीतर सरळ सिक लिव्ह मार!’ (वा! म्हणजे  तुम्हीही अशी ऑफिसला दांडी मारता वाटतं? मला वाटलं होतं, अमेरिकन लोक भारतीयांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात!)
तीन-चार ‘समन्स’ या ना त्या कारणाने मी यशस्वीपणे परतवली. मग गावातल्या छोटय़ा कोर्टाचं एक दिवसाच्या ज्युरी डय़ुटीचं एक समन्स आलं. ‘अगं, जा ना. कळेल तरी काय गंमत असते! मला ज्युरी डय़ुटी करायची आहे, पण समन्सच येत नाही!’ अशा नवऱ्याच्या आग्रहखातर मी कोर्टात गेले.
एका खोलीत ज्युरी उमेदवारांना कोंबून ठेवलं होतं. एक बाई कोणालाही न कळेल अशा उच्चारात रूक्षपणे सूचना देत होती. जरब अशी, की आपण चुकून गुन्हेगारांच्या खोलीत तर नाही ना आलो, असं सर्वाना वाटावं! इथे दिवसभर थांबायचं तर ‘लघुशंका’ आली तर जाऊ देतात की नाही, या शंकेनंच मला ‘जावंसं’ वाटू लागलं.

आम्हाला गडबड करायला परवानगी नव्हती. चूपचाप आपलं काम, वाचन करत बसायचं. मधूनमधून पुकारा येई. पाच-दहा नावं पुकारत. ‘हाजीर है!’सारखं ‘येस!’ म्हणत पाच-दहा मेंढरं आत जात. ‘त्यांचं काय होणार आत?’ अशी मला उगाचच भीती! जणू काही जज्ज नामे सिंह त्यांना खाऊनच टाकणार! मी चुळबुळत बसलेली. दुपारी १२ ते १ जेवायला ‘सोडलं.’ एकला पाच मिनिटं असताना सर्वानी आलंच पाहिजे- असं फर्मान! मग सर्वाची पुन्हा हजेरी!
तीनच्या सुमाराला आम्हाला सांगितलं गेलं की, ‘तुमची डय़ुटी पूर्ण झाली. घरी जा. जाताना पलीकडल्या खिडकीतून पाच डॉलरचा दिवसाचा भत्ता घेऊन जा!’ त्या काळी अमेरिकेतलं किमान वेतन तासाला पाच डॉलर असताना मला आठ तासांचे फक्त पाच डॉलर्स असं नगण्य वेतन सरकारकडूनच मिळालं. अशा तऱ्हेने पहिल्या ज्युरी डय़ुटीवर शिक्का बसला.
दुसरी ज्युरी डय़ुटी आली काऊंटीच्या कोर्टात! एका मुलीने शॉपिंग मॉलमधल्या एका प्रख्यात दुकानातून ‘शॉप लिफ्टिंग’ केलं होतं. थोडक्यात, ती चोरीची आरोपी होती. यावेळी बोलावलेल्या ५०-६० लोकांना एकदम कोर्टरूममध्येच खेचण्यात आलं. न्यायाधीशानं ठोकठोक करून सर्वाना चूप बसवलं. तंबी दिली- ‘याद राखा.. काही करून बाहेर पडायचा प्रयत्न केलात तर! इथून बाहेर पडलेल्यांना दुसऱ्या कोर्टरूममध्ये हजर राहावं लागेल. ही केस मी एका दिवसात उडवणार आहे! बाकीच्या रूममध्ये सगळ्या आठ-दहा दिवसांच्या केसेस आहेत!’

मग त्यांनी केस समजावून सांगितली. ‘कोणी चोरी केली असेल (म्हणजे कोणावर केस झाली असेल) तर त्यांना ज्युरी होता येणार नाही. त्यांनी बाहेर पडावे. कोणी पूर्वी या दुकानात किंवा त्यांच्या कंपनीत काम केलेलं असेल तर त्यांनाही ज्युरी होता येणार नाही..’  न्यायाधीश महाराज यादी वाचत होते. अर्थात खऱ्या-खोटय़ाची शहानिशा केल्याशिवाय सोडत नव्हतेच. म्हणजे तशी सुटका नव्हतीच! या केसवर काम करून एका दिवसात कोर्टाचा अनुभव, सुटका (आणि भत्ता!) असा एका दगडात थवा मारावा असा विचार होता. पण मी पूर्वी त्या कंपनीत काम केलं होतं. म्हणजे मी या ज्युरी डय़ुटीसाठी योग्य नव्हते. आता ‘खरं सांगू नये नि खोटं बोलू नये’ अशा कात्रीत माझी बाकबूक सुरू झाली. एव्हाना ५० पैकी बाकीचे निघून गेले होते. आम्ही पाचजण शिल्लक होतो. तेव्हा मी सरळ गुपचूप राहायचं ठरवलं. (न्यायाधीशालाही सटकायचं होतं!)
केस सुरू झाली. ती पोरगी निर्ढावलेली होती. पूर्वी चार वेळा तिला चोरीवरून शिक्षा झालेली! शिवाय आम्हाला चार-पाच वेळा तिच्या ‘शॉप लिफ्टिंग’चा रंगेहाथ पुरावा म्हणून व्हिडीओ दाखवण्यात आला. (आता एवढा सबळ पुरावा असताना हा कोर्टरूम ड्रामा कशाला, असा प्रश्न मला पडला.) दोन्ही बाजूंचे वकील क्लिष्ट अशा कायद्यांचा कीस काढत होते. मला पेंग येऊ लागली. पण तरी मी सगळं आज्ञाधारकपणे आणि कर्तव्यभावाने ऐकत होते. दोन तासांनी ‘ठकठक’ करत न्यायाधीश महाराजांनी आज्ञा दिली- ‘आता ज्युरी मंडळानं चर्चा करावी आणि निर्णय घेऊन बाहेर यावं!’

माझा निर्णय झालेला होता. ‘स्वच्छ पुरावा होता. तेव्हा आरोपी दोषी!’ पण अन्य पाचजणांची चर्चा सुरू झाली. एकाच घटनेकडे प्रत्येकजण कसं निरनिराळ्या नजरेनं पाहतो याची ती झलक होती. आरोपीचं वय, वर्ण, तिची उत्तरं द्यायची पद्धत, तिचे शब्द.. एक ना दोन, अनेक बाजूंनी उलटसुलट चर्चा! तो व्हिडीओ त्याच स्टोअरचा की पूर्वीच्या चोरीचा, हा मुद्दा कोणीतरी काढला. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण निदरेष माणसाला शिक्षा होता कामा नये, हा मुद्दाही चर्चेत आला. ज्युरी मंडळाचे सर्व सदस्य आपली ‘डय़ुटी’ अतिशय गंभीरपणे बजावत होते. माझ्यातला सक्षम, कर्तव्यदक्ष ‘ज्युरी’ जागा झाला. ही कोणाला तुरुंगात धाडण्याची केस आहे. आमच्या सहीच्या फटक्यानिशी एका माणसाचं भविष्य बदलणार आहे! (मग ते एका दिवसाचं का असेना!) चांगली दोन तास चर्चा करून, तीन वेळा व्हिडीओ पाहून खात्री केल्यावरच आमचं एकमत झालं. ‘ज्युरी डय़ुटी’चा अर्थ मला तेव्हा खरा समजला!
मला तिसरी ज्युरी डय़ुटी आली ती एका मोठय़ा कोर्टात! ज्युरी निवड कशी चालते, याची कल्पना असल्यानं मी जरा बिनधास्तच होते. माझी पहिल्या फेरीत निवड झाली. पुन्हा ५० जण कोर्टरूममध्ये! समोर आलेली केस खुनाची होती! बापरे! हादरायलाच झालं! न्यायाधीश महाराज एकेकाला प्रश्न विचारून पास-नापास करून निवडत होते. आरोपी समोर बेडरपणे आमच्याकडे पाहत होता. मला मनातल्या मनात चळाचळ कापायला होत होतं. ‘देवा, मला नापास कर..’ अशी मी मनातल्या मनात प्रार्थना करत होते.

यायाधीश महाराजांनी काय विचारलं नि मी काय बोलले, देवास ठाऊक! पण तिसऱ्या प्रश्नाला ‘खून करणं हे पाप आहे!’ असं उत्तर मला सुचलं. माझी तातडीने बाहेर रवानगी करण्यात आली. नंतर दोन रात्री मला झोप लागली नाही. हा माणूस खुनी असला आणि आरोपातून सुटला तर आपल्या मागे लागेल असं वाटत राहिलं.
काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा मला डय़ुटीचं समन्स आलं. पुन्हा कोर्टाची पायरी चढले. हे न्यायाधीश महाराज अजबच! त्यांनी ४५ मिनिटांचा इतिहासाचा तास घेऊन अमेरिका, अमेरिकन नागरिक, सैनिक, युद्धे, त्यांनी देशासाठी केलेला त्याग असं बरंच सुनावून आपल्या देशासाठी ज्युरी डय़ुटी करणं हे कसं महत्त्वाचं आहे, हे पटवून दिलं. मी आज्ञाधारकपणे ज्युरी डय़ुटी करावी म्हटलं. पण तेवढय़ात मला परिणामकारक उत्तर सुचलं, ‘मी सेल्फ एम्प्लॉइड असून डय़ुटी केली तर उत्पन्न बुडेल व माझा पोटापाण्याचा प्रश्न येईल, तेव्हा मायबाप सरकारने तो सोडवावा. मी जन्मभर रोज कोर्टात येईन. कोर्टाचा दिवसाचा १५ डॉलरचा भत्ता ( आता वाढला आहे) मला पुरत नाही!’
माझं उत्तर ऐकून न्यायाधीश महाराजांनी विचारलं, ‘काय आहे तुझा पोटापाण्याचा व्यवसाय?’ मी उत्तरले, ‘मी आठवडय़ातून एक तास योगासनांचे वर्ग चालवते!’  मास्तराने अभ्यासाचं महत्त्व सांगणारं तासभर लेक्चर देऊनही एखाद्या पोरानं ‘सर, मी अभ्यास नाही केला. कारण माझ्या पापणीचा केस दुखत होता,’ म्हणावं, तसं हे माझं उत्तर ऐकून न्यायाधीश महाराज स्तब्धच झाले. पुढच्या क्षणी त्यांनी पुकारा केला- “excused! go home!” 
 -विद्या हर्डीकर-सप्रे, कॅलिफोर्निया     

( पूर्व   प्रसिद्धी: लोकसत्ता)