मेवाती मेवा.

भारतीय शास्त्रीय संगीतात सूर, समय आणि मनात प्रकटणारे भाव यांचे एक तरल नाते आहे. ‘मेवाती ऑफरीन्ग्ज’ ही श्री. सुहास जोशी यांची सी.डी. ऐकताना ते  उलगडत जाते.    

उष:काल होण्याआधीचे प्रसन्न पण धुक्यात वेढलेले वातावरण.. फुलांचा मंद दर्वळ आणि खलाटीतून येणाऱ्या धुक्याच्या लाटा… “भस्म माखिले दिसे चराचर” असं शिवरूप घेऊन कोमल रिषभ- च्या अवगुंठनातून हलकेच उमलणारा  बैरागी भैरव ‘ललित लाल श्री गोपाल’ ही या सी.डी. मधील पहिली बंदिश.   

 विरागी भैरव नंतर येते, कलिंगडा रागातील “प्रभुं प्राणनाथ” हे संस्कृत भजन. कलिंगडा हा राग भैरव रागाला अगदी जवळचा आहे. या भजनात भगवान शिवाला अर्पण केलेली स्तुती मनाला प्रसन्न करून जाते.       

नंतर येतो राग मधुवंती.  पहाटेच्या भैरवातील शुद्ध गांधार आता कोमल झाला आहे. अंतर्मुख बनवणारा आणि भक्तिभावी.  या रागाला असलेली उत्कट धार ही तीव्र मध्यमाची किमया!

मधुवंती रागाचा हा उत्कट आणि भक्तिभावी  गोडवा ‘देवी सरस्वती’ या बंदिशीत  प्रारंभीच्या अलापापासून दिसतो. या बंदिशीचा बांधेसूदपणाही लक्षात येण्याजोगा.. 

हाच तीव्र मध्यम ‘शुद्ध’ म्हणजे सौम्य  झाला की रागात प्रसन्नता येते. तसा धैवत शुद्ध असेल तर तेजस्वी दिसतो. दुपारच्या झळाळत्या सूर्यासारखा.. अमृताहुनी गोड असा गोडवा आणि झळाळत्या सूर्याचा तेजस्वीपणा म्हणजे दुपारचा राग भीमपलासी ! ‘मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड ,अंगणात झाड कैवल्याचे ‘ अस, त्याचं वर्णन कराव, आणि ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ म्हणून त्या रागाला हाक मारावी. मेवाती घराण्याचे लोकप्रिय गायक पंडित जसराज यांची ही भीमपलासी रागातील प्रसिद्ध बंदिश.  ती गाऊन सुहास यानी ‘बडे गुरु’ पंडित जसराज याना गुरुवंदना दिली आहे. अर्थातच भीमपलासीने  या  सी. डी. चा असा औचित्यपूर्ण  समारोप केला असला तरीही काही अन्य काही प्रहरांचे प्रातिनिधिक रागही या सी.डी. मध्ये आहेत.        

उदा:  ‘जयति जयति भूमी भारत की” ही देशभक्ती पर बंदिश.  देशभक्तीची अभिव्यक्ती करणाऱ्या  देस रागाचे कोंदण या अभिव्यक्तीसाठी अगदी योग्य आहे.

रात्रीचा पहिला प्रहर म्हणजे दिवेलागणीची व्याकूळ वेळ.. ती व्याकुळता, समर्पण, भक्ती या भावनांचा आविष्कार करणारा शाम कल्याण .. मध्यम आता तीव्र झालेला आहे. ते सगळं  तीव्र मध्यमाचं व्याकुळलेपण   ‘सुनिये अर्ज है” मध्ये व्यक्त झालेलं आहे.

या पुढचे प्रहर मिया मल्हार आणि चंद्रकंस रागातून बांधेसूदपणे  मांडले आहेत. चंद्रकंस रागातून ‘चंद्र हवा’ असा हट्ट करणाऱ्या बाल रामचंद्राची कथा मांडली आहे.     

श्री. सुहास जोशी हे न्यूजर्सी चे रहिवासी आणि न्यूजर्सी  येथील ‘पंडित जसराज संगीत विद्यालयातील’  पंडिता तृप्ती मुखर्जी यांचे  शिष्य.

 मेवाती ऑफरिंग्ज” ही सी. डी.  रागरंग संस्थेचे सुनील कुलकर्णी यांनी  प्रकाशित केली आहे.  प्रशांत पांडव       ( तबला) आणि उदय कुलकर्णी ( हार्मोनियम) यांची साथ असलेल्या या सी. डी. मध्ये मेवाती शैलीतील आठ राग बंदिशी अथवा भजन स्वरुपात सादर केले आहेत.

पारंपारिक मेवाती शैलीत भक्तिभावना, समर्पण, आणि स्वर तालाची वेगळ्या पातळीवरची जाणीव असणारे काव्यही महत्वाचे असते, हे जाणून श्री. सुहास जोशी यानी आठ पैकी पाच बंदिशी स्वत:च लिहिल्या आणि स्वरबद्ध केल्या आहेत.

मेवाती घराणे आणि पंडित जसराज हा संयोग सर्व परिचित आहे. मेवाती घराण्याचे उगमस्थान आहे ग्वाल्हेर घराणे. भास्करबुवा बखले यांचा लखलखीत स्वरसूर्य चमकला त्या ग्वाल्हेर घराण्याचे गायक द. राजस्थानात गेले. मूळ घरापासून काहीसे एकाकी  पडलेल्या या गाण्यावर किराणा शैलीच्या भावपूर्ण वैशिष्ठ्याने माया धरली. तशी जयपूरच्या रेखीव स्वर रचनेच्या शैलीनेही सावली धरली. एकोणिसाव्या शतकात जोधपूरच्या नाझीरखान यांनी या गोंडस गाण्याला ‘मेवाती’ असे नाव दिले आणि स्वत:ची एक नवी परंपरा सुरु केली. त्यात राजस्थानी लोकसंगीताची लय मिसळली. सूफी शैलीचा विरागीपणा आणि कीर्तनकार शैलीचा रंजक ठसा त्यावर उमटला. मेवातीचे शैलीचे व्याकरण  हिंदू वेदांच्या ऋचानी तोलले आहे पण शिया पंथाचा प्रभावही त्यावर दिसतो. यातून मेवाती संगीत परंपरेला पारमार्थिक आणि अध्यात्मिक रंग आला. रागाच्या स्वर मेळातून व्यक्त केलेली समर्पण आणि परमेश्वर दर्शनाची आर्त ओढ म्हणजे मेवाती शैली.

शैली कोणतीही असो, भारतीय संगीत्ताच्या सात स्वरात अशी काही जादू आहे की रसिकाच्या मनात पहाटेच्या पारिजातका पासून उत्तर रात्रीच्या मोगऱ्या पर्यंतच्या सर्व प्रहरापर्यंतच्या काळातील भावनांचे तरंग उमटू शकतात. दिवसाची वेळ, मनातले भाव आणि स्वर रचना यांचं परस्परांशी नात गुंफणारे भारतीय संगीतकार हे जादुगार असतात. पण त्यांनी  समयोचित सूर , ताल, शब्द यातून किमया साधली तरच  गाणे श्रवणीय होते. 

‘मेवाती ऑफरीन्ग्ज’ या सी.डी मधील  रचनांचा आस्वाद घेण्यापूर्वी श्री. सुहास जोशी यांचा संगीत प्रवास जाणून घेतला तर  आपल्यालाही त्यांच्या स्वर यात्रेत सामील होण्याचा आनंद मिळतो.

 श्री. सुहास जोशी जरी इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग  क्षेत्रातील  असले तरी संगीताची ओढ लहान पणापासूनची.   पुण्यात सुशिक्षित  मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या हुशार मुलाला शैक्षणिक प्रगती करताना आपल्या  अंतरंगात डोकावून पहाण्यासाठी फारसा वेळ हाताशी नसतो. महाविद्यालय, शिष्यवृत्ती, आय आय टीतली शिक्षणाची संधी आणि त्याबरोबर मिळालेली अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील सुसंधी  या यशाच्या पायऱ्या चढताना मनातली शास्त्रीय संगीताची ओढ सुप्तच राहिली.. भारतात संगीत शिक्षणाला वेळ नसल्यामुळे  संगीत शिकण्याची इच्छा राहून गेली असे काहीसे वाटत असतानाच, न्यू जर्सी मध्ये पंडित जसराज संगीत संस्थेने १९९५ मध्ये आपले दरवाजे उघडले. सुहासची संगीत यात्रा सुरु झाली. “संगीत हा परमेश्वर दर्शनाचा मार्ग आहे, आणि या यात्रेत आपल्यासारख्याच साधकांबरोबर चार पावले चालताना येणारा अनुभव अतिशय आनंदाचा असतो” ही श्री. सुहास जोशी यांची धारणा आहे आणि त्यांची व्यक्तिगत प्रवृत्ती संगीतातील  अध्यात्मिक पातळीची जाणीव सतत असण्याची आहे.   मेवाती शैलीतील संगीताची साधना करण्याची संधी त्यांच्या या मूल प्रकृतीला पोषक अशी आहे..  त्यामुळे पंडित जसराज यांनी त्यांची साधना ऐकली तेव्हा त्यांनी उद्गार काढले की,” सुहासच्या प्रकृतीत जे संगीत अडकून बंदिस्त  होते, ते अभिव्यक्तीची संधी मिळाल्यामुळे मुक्त होत आहे.” श्री. सुहास जोशी हे मेवाती परंपरेतील सातव्या पिढीचे गायक आहेत.  

 पंडित जसराज यांच्या साथीला गाण्याची संधी श्री. सुहास जोशी याना प्रथम २००८ मध्ये मिळाली. मेवातीच्या तीन पिढ्या म्हणजे पंडित जसराज, पंडिता तृप्ती मुखर्जी आणि सुहास जोशी त्यावेळी एका रंगमंचावर होत्या.  

श्री. सुहास जोशी  गाणे शिकत आहेत तसे  शिकवतही  आहेत. त्यांच्या गाण्याचे लहान मोठे कार्यक्रम गेली १० वर्षे होत असतात. त्यात नाट्य संगीत आणि भजने यांचाही समावेश असतो.  इ प्रसारण या इंटरनेट रेडीओ आणि अन्य रेडीयो वर  त्यानी संगीतावरील भाष्यव्याख्यानाचे  कार्यक्रम करून सर्वसामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे संगीताचे पाठ सादर केले.

  “संगीत साधना ही तीर्थ यात्रा” या भावनेने साधना करणाऱ्याला पारितोषिके, सन्मान यांचे महत्व कमी वाटते. पण श्री. सुहास जोशी याना अनेक सन्मान मिळाले आहेत हे रसिकाला सांगणे अगत्याचे आहे.

संगीत हा “परमेश्वरी प्रसाद” या भावनेने साधना करताना श्री. सुहास जोशी यानी स्वाभाविकपणेच आपला आनंद सर्वांबरोबर वाटून घेतला आहे. त्यांच्या संकेत स्थळावर (www.suhasdjoshi.com) काही बंदिशी सर्वांसाठी मुक्त उपलब्ध आहेत.

‘मेवाती ऑफरीन्ग्ज’ या सी.डी. मध्ये मेवाती शैलीची तिहाई, सरगम आणि आलाप ही वैशिष्ठ्ये प्रत्येक बंदिशीत उतरली आहेत. प्रत्येक बंदिशीच्या प्रारंभी रसिकाला राग भावात सहजतेने नेणारा ओम्कार आणि आलाप आहे. चालीत सहजता आहे आणि शब्दात प्रासादिकता आहे. समयोचित राग आणि शब्द, भावपूर्ण स्वररचना यामुळे श्रवणीयता वाढली आहे.

 गायकाच्या हातात त्याच्या किंवा तिच्या आवाजाची जातकुळी नसते. तो दैवदत्त प्रसाद असतो. पण आवाजाचा उपयोग कसा करावा, आवाजाच्या मर्यादांचा स्वीकार करून. रागाच्या अंतरंगात कसा सूर मारावा, आणि आवाजाचे गुणविशेष रागविस्तारासाठी कसे उपयोगात आणावेत याची जाणकारी असणे आणि गाणे फुलवणे यासाठी चिंतन आणि साधना असावी लागते. या सीडीतील बंदिशीतून  श्री. सुहास जोशी यांनी त्याची चुणूक दाखवली आहे. कुठेही उगाच रस्सीखेच नाही की विद्वत्तेचा आव नाही. म्हणूनच हा मेवाती मेवा रसिकांना नक्कीच आवडेल असा आहे.

                                                              विद्या हर्डीकर सप्रे