समाजरंग

महाबंदीतल्या महिषासुरमर्दिनी
समाजरंग

महाबंदीतल्या महिषासुरमर्दिनी

पुण्याजवळील फक्त ६५ किलोमीटर अंतरावरील भाग.. वेल्ह्यासारखी लहानमोठी पन्नास गाव. मुख्य व्यवसाय शेतीचा.

एक अनोखी नर्मदा जयंती
समाजरंग

एक अनोखी नर्मदा जयंती

कोणाबरोबर कसे धागे जुळतात ते बाहेरून नाही सांगता येत.. कालिदासाच्या एका श्लोकाचा चरण आठवतो आहे. कालिदास म्हणतो ,” ‘ भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि॥ “
या श्लोकाचा मतितार्थ असा आहे, की काही पूर्व जन्मीच्या परस्पर संबंधांचे संस्कार आपल्या जीवावर कोरलेले असतात. त्यामुळे ‘ कुणाशी आपले कसे धागे जुळतात ते सांगता येत नाही.
भारती ठाकूर यांचेशी माझे धागे जुळले ते असेच.. २०१८ ! पुण्यात कोणाघरी त्यांचे नर्मदा परिक्रमा पुस्तक हाती पडले.
“आयुष्यात आपण कधीतरी नर्मदा परिक्रमा करू “ असा एक विचार मी लहानपणी कुण्या एकाची भ्रमण गाथा नावाचं गो. नि. दांडेकरांचं पुस्तक वाचून केला होता. त्यामुळे हे पुस्तक मी प्रेमाने वाचायला घेतलं.
परिक्रमेचे विलक्षण अनुभव वाचून मी भारावले काय आणि लेखिकेला इमेल लिहून कळवले काय ! माझी इमेल वाचून भारती ठाकूर यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या,” तुम्ही या ना आमच्या N. A. R . M .A .D A ला भेट द्या ..

समाजरंग

सर्जनशील साहसांना…..

“आयुष्य हे एक साहसी योगायोगांची मालिका आहे”, डॉ. उदय देवासकर सांगत होते. योगायोगाने भेटलेल्या  एका गुजराथी कुटुंबाने बडोद्याहून अमेरिकेत येण्यासाठी READ MORE

समाधी संजीवन ..

——-विद्या हर्डीकर सप्रे 

बराच वेळ नकाशातून वाट काढत काढत  मी आणि अशोक (माझा नवरा)  एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती झाली, “ Are  you  here   for  Dr  Joshi ?”   मी चकितच झाले. “ How do you know ?” मी विचारले..

तिन सांगितलं की ,” तू भारतीय  दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर   या दफन भूमीत सर्वात  जास्त  भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “

डॉ. आनंदीबाई जोशी यांचे छायाचित्र

आणि आमच्या वॉकिंग टूर मध्ये आम्ही या समाधीचाही सामावेश केलाआहे.”

हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं !

त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie  लॉट’ कुठे आहे त्याची खूण  नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला.  आमचे  मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! ( Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या माहेरचे नाव. )

  मी  त्यांच्या नोंदणीपत्रकात मोठ्या अभिमानाने आमची नाव नोंदवली आणि आम्ही मार्गस्थ झालो.

कार्पेन्टर लॉट तसा मोठा आहे. आता इतक्या सगळ्या थडग्यातून आनंदीबाईंची समाधी कशी शोधायची असा विचार करत आम्ही चालत होतो. तेवढ्यात मला’ ती’ दिसली.  मी समाधीचा फोटो पाहिला होता. त्यामुळे चटकन दिसली. “ भेटलीस ग बाय ..” असं म्हणत मी   भराभर   उंचवटा चढून लहानशा   टेकाडावर गेले, ..काहीशा  अधीरपणे!

 समाधीच्या दगडाच्या एका बाजूला अक्षर अस्पष्ट होती. पण दुसऱ्या  बाजूला सुस्पष्ट अक्षरात

 “The First Brahmin Woman to Leave India to obtain an education” (द फर्स्ट ब्राह्मण वुमन टू  लीव्ह इंडिया टू ऑबटेन  ऍन एज्युकेशन )  असे आनंदीबाईंबद्दल कोरून ठेवले आहे.

माझ्या डोळ्यांसमोरून दीडशे वर्षांपूर्वीचा आनंदीबाईंच्या जीवनाचा  सगळा पट उलगडला होता…. कादंबऱ्या आणि चरित्रातून वाचलेला.. पण  मनावर त्याचा सुस्पष्ट अक्षरातला खोल ठसा उमटवून गेलेला.

समोरून  उतरत्या सूर्याची  किरणे समाधीवर पडली होती. बाजूला काही हिरवळ, काही पाचोळा होता.  आम्ही ते सर्व बाजूला करून  आमच्या बरोबर आणलेली फुले  समाधीसमोर ठेवली.  काही फुले समाधीवर छान रचून ठेवली. कातर मनाने , भरल्या डोळ्यांनी मी तिला वाकून  नमस्कार केला… आणि मग  तिच्या जवळ थोडा वेळ निशब्द पणे बसून राहिले. मध्ये उलटलेल्या काळाचा वारा मनात सळसळत होता. 

किती वर्षे या भेटीची आस लागून राहिली होती !

मन काही वर्षे मागे गेले. .. १९९१ पर्यंत..

मी फिलाडेल्फयाला  एका स्नेह्यांकडे गेले होते, तो दिवस आठवला.  त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी मलाही मुद्दाम बोलावले होते.  जवळच्याच एका लहान गावात रहाणारे अशोक आणि मनीषा गोरे आणि त्यांच्याबरोवर आलेल्या त्यांच्या नातेवाईक ‘अंजली कीर्तने !’  हे नाव मी ऐकलं होत. मला वाटत चेरी ब्लॉसम की  अशा काही नावाचं त्यांचं पुस्तक वाचलं होत. अंजलीताई मुद्दाम आल्या होत्या त्या आनंदीबाई जोशींवर संशोधन करायला. फिलाडेल्फियातल्या कॉलेज मध्ये आनंदीबाईंची डॉक्टर ची डिग्री झाली होती. तिथे  अंजलीताईना घेऊन जाऊन श्री. गोरे यांनी तिथल्या पुरातत्व विभागात कागदपत्रे शोधायला सुरवात केली होती. आजवर कधीच माहिती नव्हता तो माहितीचा खजिना तिथे मिळाला होता. त्यात एक पुस्तक हाती आलं. कॅरल डॉल ने लिहिलेलं आनंदीबाईंचं चरित्र !   त्यात एका वाक्याचा उल्लेख होता : आनंदीबाईंची अमेरिकेत  कार्पेन्टर मावशींकडे पाठवलेली रक्षा कुठे जतन केली जाणार आहे त्याचा.

तेवढ्या धाग्यावरून ती समाधी शोधून काढण्याचा खटाटोप चालू होता.  गोपाळराव जोशी यांनी  आनंदीबाईंचा रक्षाकलश बोटीने अमेरिकेत पाठवल्याचे उल्लेख आहेत. पण त्याच पुढे काय झालं ते कोणाला माहिती नव्हतं.

मी  अमेरिकेत आल्यावर त्यांची समाधी शोधून काढण्याचा विचारही  मी कधी केला नव्हता !  पण आपल्याला देवतेसारख्या वाटणाऱ्या आनंदीबाईंच्यासाठी चाललेल्या या    प्रकल्पाबद्दल आता मात्र मलाही उत्सुकता वाटायला लागली.

गोरे पतिपत्नी आणि अंजलीताई यांची ओळख  नुकतीच झाली होती, पण पहिल्याच भेटीत  त्यांच्याशी कुठेतरी  सूर जुळले .त्यामुळे  न्यूयॉर्क राज्या मध्ये एका लहानशा गावात कुठेतरी असणारा तो   कार्पेन्टर लॉट शोधण्यात त्यांना कशी मदत करता येईल याचा विचार मी करु  लागले.  गुगल , विकिपीडिया आणि इंटरनेट  यांच्या आधीचे ते दिवस.  म्हणजे “आपल्या ओळखीचं कोण कोण आहे न्यूयॉर्क राज्यात” अशी आठवणींची साखळी बांधून माझी विचारांची साखळी सुरु झाली.    योगायोग असा की  कार्पेन्टर लॉटबद्दल चा उल्लेख  आहे त्या गावाच्या आसपास   माझे एक मित्र विराज आणि लीना सरदेसाई रहात होते, हे मला एकदम आठवलं. 

मी लगेच  विराज ला फोन केला. गावातल्या दफन भूमी विंचरून हा कार्पेन्टर लॉट शोधण्याची  आणि तिथेच रक्षाकलश असण्याचे पुरावे शोधण्याची जबाबदारी विराजने घेतली. पुष्कळ परिश्रम करून त्याने हे इतिहास संशोधन केलं. त्यामुळे  अंजलीताईना तिथे पोहोचता आलं. मला त्यावेळी जण शक्य नव्हतं. पण अंजलीताईनी समाधीचा फोटो  आठवणीने मात्र पाठवला.( मी तो अजूनही जपून ठेवला आहे. )….

शंभर वर्षे उलटून गेल्यावरही आनंदीबाईंची समाधी तिथे होती .. वादळ वारे , हिमवर्षाव सहन करत होती. खोदलेली अक्षरे पुसट  झाली होती. (‘त्यात खडू भरून त्या अक्षरांना उठाव देत कोरलेली वाक्ये वाचावी लागली.’,  असे अंजलीताई सांगत होत्या. )

दफनभूमीवरील यादीत आनंदीबाईंचं नाव होत. पण बाकी माहिती कुणालाच नव्हती. ती अंजलीताईनी दिली आणि कागद प्रत्रातले रिकामे रकाने भरले गेले.  इतिहासाच्या अक्षरांना पुन्हा  उठाव मिळाला.

आनंदीबाई आली अमेरिकेत तेव्हा इथे कोणी नव्हतं.  पण आनंदीबाईनी इथे जात, धर्म, भाषा यांचे तट ओलांडत  कॅरल डॉलशी मैत्रीचे बंध  जुळवले. कार्पेन्टर मावशीनं तर तिला कुटुंबातच सामावून घेतलं आणि  माहेरच्या दफनभूमीत तिच्यासाठी खास जागा निर्माण केली. तिची समाधीशिळा उभारली.

       त्याकाळच्या मराठी बाईची चाकोरी माजघर, स्वयंपाकघर ते मागील आंगण एवढीच होती. ती ओलांडून आनंदीबाई वेगळ्या वाटेने चालल्या.

ती वाट शिक्षणाची होती. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे .. म्हणजे केवळ चाकोरीबाहेरची वाट चोखाळणे नव्हते, तर व पायवाट सुद्धा नव्हती तिथे राजमार्ग उभारणे होते.. पहिली  भारतीय डॉकटर स्त्री होण्याचा सन्मान घेताना आनंदीबाईंच्या या अलौकिक कार्याचं सार्थक झालं खरं; पण त्या राजमार्गावरून पुढे जाण्यापूर्वीच त्यांना  मृत्यूने कलाटणी दिली आणि त्यांच्या रक्षा या  न्यूयार्क  मधल्या आडगावात एका दफनभूमीत एकाकी होऊन पडून राहिल्या होत्या. नंतर इतके मराठी लोक आले, त्यांनाही याचा पत्ता  नव्हता. ..

बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या झाशीच्या राणीच्या समाधीस्थळी

 ‘रे हिंद बांधवा थांब  या स्थळी  अश्रू दोन ढाळी …..”

अशी भा रा तांबे यांनी घातलेली साद …

तशी बाविसाव्या वर्षी  पराक्रम करून गेलेल्या आनंदीबाईच्या समाधीस्थळी 

अंजली कीर्तने , विराज , लीना सरदेसाई, अशोक, मनीषा गोरे यांनी घातलेली ही  साद …

मराठी, भारतीय  लोकांपर्यंत हळू हळू पोहोचली. आणि आता  इथे लोक दर्शनाला येऊ लागले.

हे सगळं आठवत मी समाधीपाशी स्तब्ध झाले होते…..

माझी ही  तीर्थ यात्रा पूर्ण झाली ती विराज आणि लीना यांच्या घरी जाऊनच.. लीना आणि विराज आता त्या गावात रहात नाहीत. ते आता दूरच्या एका गावात असतात.  मधल्या काळात  आमच्या भेटी झाल्या होत्या, काही प्रकल्पसुद्धा आम्ही एकत्रित पणे केले होते.

  पण तरीही समाधीदर्शनानंतर लगेच  त्यांना भेटल्याशिवाय तीर्थयात्रा पूर्ण होणार नव्हती. म्हणून आम्ही पुढे निघालो.  त्या दोघांनाही  आमच्या या विशेष भेटीचा  खूप आनंद झाला. .पुष्कळ जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.  

तेव्हाच्या आठवणी विराजने सांगितल्या. संशोधनाचं आव्हान, समाधी सापडल्याचा आनंद, कितीतरी गोष्टी.! आम्ही ऐकताना भारावून गेलो होतो.. .

समाधीच्या शिळेवरची अक्षर पुसट  झाली, ती महत्प्रयासाने परवानग्या काढून विराजने पुन्हा खोल करून घेतली. त्यामुळे एका बाजूला आता सुस्पष्ट खोदकाम दिसते.  हा ऐतिहासिक दुवा मला कळला.

आनंदीबाईंवर अंजलीने पुस्तक लिहिले. लहान माहितीपट केला. लेख लिहिले. (अलीकडेच आनंदीबाई गोपाळरावांवर एक चित्रपटही निघाला)

   या समाधी संशोधनानंतर अनेक लोकांनी  समाधीला भेट द्यावी अशी तिची इच्छा होती आणि आहे. तिच्या संशोधनाचे आणि धडपडीचे सार्थक झाले.  आज खरोखरच जास्तीत जास्त लोक येऊन या समाधीला भेट देतात.

 अमेरिकेत आलेल्या प्रत्येक भारतीय  डॉकटर ने विशेषतः: महिला डॉक्टरने समाधीला  भेट द्यावी असे मला मनोमन वाटते. त्यासाठी मी आणखी काही लेख लिहून समाधीचा पत्ता प्रसिद्ध केला. आमच्या दुसऱ्या पिढीच्या  मुलींनी ही  समाधी  पहावी  आणि काही प्रेरणा त्यांना मिळावी! कारण आनंदीबाईनी  चाकोरीचे आणि परंपरांचे अवघड घाट ओलांडून,  आमचे मार्ग सोपे केले. आम्ही आज इथे आहोत, ते त्यांच्यामुळे आणि आमच्या मुली आज मोठ्या मोठ्या भराऱ्या  घेत आहेत , त्या त्यांच्याचमुळे !  आम्ही आनंदीबाई जोशींच्या लेकी आहोत !  

तेव्हा आनंदीबाईनी विराज, लीना, अशोक, मनीषा , अंजली आणि मी यांचे बंध अनुबंध  जुळवले, आज अंजली कीर्तने नाहीत. तसे अशोक गोरे सुद्धा नाहीत. पण त्यांनी मोलाचे काम केले त्याची चिरंतन स्मृती या समाधीच्या पायाशी विसावलेली आहे.   आमचे मैत्र आनंदीबाईंच्या संजीवन नामाने नामांकित झालेले आहे.!   

                              ——-विद्या हर्डीकर सप्रे 

समाधीस्थळ :  Poughkeepsie Rural Cemetery,  342 Sounth Ave,  N.Y. 12602

 दूरध्वनी: (845) 454-6020   https://poughkeepsieruralcemetery.com/

या दफनभूमीच्या वॉकिंग टूर मध्ये आनंदीबाईंच्या समाधीला स्थान असते.

Her ashes were sent to Theodicia Carpenter, who placed them in her family cemetery at the Poughkeepsie Rural Cemetery in Poughkeepsie, New York. The inscription states that Anandi Joshi was a Hindu Brahmin girl, the first Indian woman to receive education abroad and to obtain a medical degree

आपली माती आपली माणसं ..

आपली माती आपली माणसं

विद्या हर्डीकर सप्रे

आपल्याला आपलं एक नाव असत.. एक आडनाव असतं.  एक गाव असत. तिथे आपलं कुलदैवत असत. कधी  तिथे आपली शेती आणि घर असत. त्या लहानशा गावात आपण कधी काळी गेलेले असतो. आपली ‘रूट्स ‘ शोधल्याचा आनंद घेतलेला असतो. तिथल्या मातीचा सुगंध हुंगल्याची आठवण आणि त्यात असते गावाबद्दलंच्या आपुलकीची साठवण! “ ‘गावात हल्ली ‘एस टी’ येते हो !”  अशा गावाकडल्या बातम्या सुखावणाऱ्या असतात. त्या गावासाठी आपण काही तरी करावं अशी उर्मी येते, पण आपण एकटे काही फार करू शकत  नाही.

पण आपण सर्वानी मिळून ते गाव आपलं मानलं तर ? मग तिथे आपली ‘रूट्स’ निर्माण होतील. तिथली ग्रामदेवता म्हणजे तिथली स्त्री. तिच्या सुखासाठी काही योजना कराव्यात. तिच्यासाठी विहिरी बांधाव्यात. तिच्या लेकरांसाठी  शाळा बांधावी. त्यांना पोटभर जेवण मिळावं. अंगभर कपडे असावेत. तिथे दवाखाना असावा. मग कधीमधी आपण त्या गावाला भेट द्यावी. “ कवा आलास वसंतराव? तेका वाईच. रातच्याला इथेच मुक्काम करा. “ असा आपुलकीचा झरा झुळझुळावा.. ही आपुलकीची भावना येते, तेव्हा आपण गावासाठी काही मोठं काम उभं करू शकतो.हे काम उभं करण्याची योजना म्हणजे “गाव दत्तक योजना !

विकासाच्या वाटा:

मूल दत्तक घेतात, तेव्हा त्या मुलाच्या  शारीरिक, मानसिक, भावनिक  आणि आर्थिक विकासाची जबाबदारी घेऊन त्याच्या सर्वांगीण विकासाला वाव देतात.  त्या मुलाचा काही वर्षे भार वहातात आणि मग त्याला स्वतः:च्या पायावर उभे रहाण्यासाठी मदत करतात. ते करताना त्या मुलाच्या कुवतीचा आणि ताकदीचा विचार केला जातो; तसा दत्तक घेणाऱ्याच्या कुवतीचा आणि ताकदीचासुद्धा विचार केला जातो.

‘गाव किंवा खेडे दत्तक योजना ‘ म्हणजे हेच मोठ्या प्रमाणात करायचं ! खेड्याच्या गरजा  समजावून घ्यायच्या. काही वर्षे तिथल्या विकासावर लक्ष केंद्रित करून तेथील लोकांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करायची. आरोग्य, शिक्षण, उद्योग, दळणवळण आणि निरोगी जीवनासाठी सांडपाणी,  स्वच्छतागृहे आणि पिण्याचे पाणी यांची व्यवस्था. या सर्व आत्मसन्मान आणि विकासाच्या वाटा!  त्यात मग आरोग्य शिबिरे, गोबर गॅस प्लांट्स,  व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, बचतगट, साक्षरता, कुटुंबकल्याण, शाळा  जातीयता निर्मूलन, कृषितांत्रिक शिक्षण असे अनेक प्रकल्प येतात.

पूरक उद्योगांसाठी भांडवल पुरवणे, , मालासाठी थेट बाजारपेठा उपलब्ध  करून देणे, ग्रामीण बँका, अशा काही योजना होऊ शकतात.

वंचितांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रयत्न, वैचारिक जाग्रणासाठी कार्यक्रम, गावकरी तरुण मंडळ, प्रेरणादायी उपक्रम अशातून आत्मसन्मान जागरण होऊ शकेल.

त्रिकोणाचे   तीन बिंदू:

‘खेडे दत्तक घेणे ‘यांच्या यशाचा मंत्र आहे: ‘ पार्टनरशिप इन डेव्हलपमेंट’ !

 गाव दत्तक योजना यशस्वी करण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे.

१. “आपला विकास व्हावा “ अशी गावकऱयांची इछा आणि त्यासाठी सहकार्य करण्याची त्यांची तयारी.

२. या विकासासाठी आर्थिक मदत करण्याची अमेरिकेतील मराठी समाजाची तयारी आणि प्रयत्न.

३.  ग्रामविकासाच्या योजना गावात यशस्वीपणे राबवण्यासाठी स्थानिक किंवा जवळपासची भारतातील सेवा संस्था. ( NGO ). ही विश्वस्त  म्हणून व्यवस्थापनाचे सर्व काम करू शकेल.

या तिन्ही बिंदूंच परस्पर सहकार्य आणि  सामंजस्याने काम करण्याची तयारी  सर्वात महत्वाची. “It takes a village to build a village”  !

कोणतंही कार्य केवळ सादिच्छेने सिद्धीस जात नाही.  गावकरी, विश्वस्त संस्था आणि अमेरिकेतील मराठी ( भारतीय) समाज यांनी परस्परांना ‘आपलं’ मानून एकजुटीने काम करावं लागत. उदा: तिथे रास्ता बांधायचा तर, अमेरिकेतील भारतीय समाजाने पैसे पाठवावेत आणि गावकरी श्रमदानाला तयार व्हावेत.

आज एकविसाव्या शतकात भारतात सुमारे सहा लाख खेडी आहेत. त्यातील कित्येक मागासलेली आहेत. बायाबापड्याना पाण्याच्या घागरी घेऊन मैल भर जावे लागते. मूलभूत सुविधा नाहीत.  

भारतात कितीतरी सेवा संस्था आहेत. त्यांच्याकडे कामाच्या दिशा आहेत.  तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. पण पैसे नाहीत. खेड्यातील तरुणांना पैस नाहीत आणि दिशा नाही.  अमेरिकेतील भारतीयांकडे पैसे आहेत, पण काम करण्यास वेळ नाही.   . या तीन बिंदूंनी एकमेकांना सहाय्यासाठी हात लांब  केले तर   अवघ्याना ना सुपंथ धरता  येईल.

मराठी मंडळ आणि खेडे दत्तक योजना !

माझी दत्तक खेड्याची संकल्पना आहे की प्रत्येक मराठी मंडळाने एक गाव दत्तक घ्यावे.

लॉस एंजेलिस मराठी समाजापुढे मी ही संकल्पना मांडली. निधिसंकलनाचा एक भव्य कार्यक्रम करण्याची योजना चालू झाली.

हराळीची कथा:

तेवढ्यात १९९३ मध्ये  मराठवाड्यातील खिलारी गावात भूकंप झाला. आणि अनेक गावे उध्वस्त  झाली. मग एका दिवसाच्या तयारीने आम्ही एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. तिथल्या तिथे दहा हजार डॉलर्स उभे राहिले. त्यातून आपण मराठी मंडळाने म्हणजे समाजाने खिलारीजवळील हराळी हे गाव दत्तक घेतलं. पुणे आणि सोलापूर  येथे काम करणाऱ्या ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने ग्रामविकासाची जबाबदारी घेतली.

तात्पुरती मदत न देता काहीतरी कायम स्वरूपाचं काम उभं करण्यासाठी हे पैसे वापरावेत असं ठरवलं.

उद्योग उभे रहाण्यासाठी सामानाचा वाटप सुरु केले. चायवाल्या चंदूला किटली आणि स्टोव्ह दिला. कसरणींना बांगड्या दिल्या. रिकाम्या हाताना काम मिळालं आणि गावगाडा सुरु झाला.

गावाला हुरूप आला. गावातल्या एका शेतकऱ्यानं आपल्या बारा एकर जमिनीतली नऊ एकर जमीन दिली आणि शाळा सुरु झाली.

जमीन देणारे शेतकरी

तिथं फळ देणारी रोप लागली . दुष्काळात ती जागवली. हळू हळू तिथे कृषितांत्रिक विद्यालय उभं राहिलं.  आजूबाजूच्या गावांसाठीसुद्धा  हा प्रगतीचा प्रकाश ठरला.  ग्रामविकसनाचा एक मोठा प्रयोग सुरु झाला. प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणी होत्या.पण निस्वार्थी कार्यकर्त्यांचं  काम पाहून आणखी संस्थानी देणग्या पाठवल्या.

 ज्ञानप्रबोधिनी हराळी चे शिल्पकार डॉ. ताह्मणकर आणि डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्याबरोबर 

लॉस एंजेलिस मधील काही लोक हराळी ला   गेले. त्यांनी भरघोस व्यक्तिगत देणग्या दिल्या. त्यामधून संगणक केंद्र आणि वसतिगृहे झाली.     दोन हजार सात मध्ये पुन्हा एकदा लॉस एंजेलिस मध्ये निधिसंकलन कार्यक्रम झाला. आणखी देणग्या पाठवल्या. आज तीस वर्षांनीही हरळीची वाटचाल उत्तम चालू आहे. यंदा म्हणजे २०२३ च्या एप्रिल महिन्यात मी हरळीला   भेट दिली.  जिथे उध्वस्त जग होत तिथे आज हिरवेगार मळे उभे आहेत. 

मांगवलीची   कथा:

१९९४ ला लॉस एंजेलिस मध्ये निधिसंकलनाचा आधी ठरलेला कार्यक्रम झाला. त्यानंतर १९९५ मध्ये एक झाला. तेव्हा रंगमंचावरून आवाहन केलं आणि लोकांसमोर काही गावांची माहिती मांडली. त्यातून लोकांनी निवडलं कोकणातलं मांगवली हे गाव.

मांगवलीच काम कोकण विद्या विकास ही संस्था करत होती. पुण्यातून लांबलचक प्रवास करून शांताराम काका जावडेकर मांगवलीला जात होते. स्वतः:चे पैस खर्च करून गावात सागवान आणि आंब्याची झाडे लावत होते. गावकऱ्यांशी गोडी गुलाबीने बोलून ग्रामविकसनाचा आराखडा बनवत होते.  पर्यावरण, वनीकरण असे कोणतेही शब्द न वापरता त्यांनी ‘सह्याद्री बचाओ’ मोहीम सुरु केली होती. त्यासाठी अनेक संस्थाना  एकत्र करून दोनशे लोकांचे शिबीर मांगवलीत घेतले. .. लॉस एंजेलिस ने हे गाव आपलं मानलं आणि आपला मांगवली बरोबरचा सदाहरित प्रवास सुरु झाला.

शांताराम काका आणि मांगवली.. सदाहरित प्रवास

मांगवलीला शाळा सुरु झाली. काही गृहोद्योग सुरु  झाले. गावाला भेट देण्यासाठी मला वेळ नव्हता, तेव्हा शांताराम काकानी गावातल्या सरपंच आणि मित्राना पुण्यात आणून माझी भेट घेतली. नंतर आपल्या गावातल एक कुटुंब मांगवलीला जाऊन आलं. आम्हीसुद्धा दोनदा जाऊन काम पाहिलं. मग २००० साली पुन्हा रंगमंचावर मांगवली साठी  निधिसंकलन कार्यक्रम झाला. आपल्या मुलाकडे अमेरिकेत आलेले शांताराम काका आणि सुधाताई जावडेकर या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आले. सुधाताईनी गावात  स्वछता गृहे बांधण्यासाठी आवाहन केलं. आणि लोकांनी भरघोस देणग्या दिल्या. मांगवलीची प्रगती आणखी वेगाने झाली. शासनाचे पुरस्कार मिळाले. ‘निर्मलग्राम’ पुरस्कार मिळाला.

एकता  नावाच्या मासिकात मी मांगवलीवर लेख लिहिला . तो वाचून डेलावेर राज्यातले  एक गृहस्थ प्रभावित झाले आणि मांगवलीला गेले. तिथे ग्रंथालयासाठी कपाटे नव्हती. ती त्यांनी घेऊन दिली.   

शांताराम काका आणि गावकरी यांचेशी गप्पा

मराठी मंडळाच्या संकेत स्थळावर मांगवलीचे अहवाल दिले जात होते. पण नवीन समिती येत असताना, मांगवलीचे ची माहिती संकेतस्थळावरून पुसली गेली. आताच्या नव्या लोकांना आपण असे काही गाव दत्तक घेतले हे माहितीच नाही !  मांगवलीची प्रगती आजही उत्तम चालू आहे. आपल्या मराठी लोकांनी “आपल्या’ गावासाठी मदत पाठवली तर आणखी प्रकल्प सुरु करता येतील.

मराठी समाजाचा हा कौतुक करण्यासारखा इतिहास आहे, आपल्या मातीशी आणि आपल्या माणसांशी नाळ जोडणारा  !

विद्या हर्डीकर सप्रे      

 .